प्रख्यात बॉलिवूड चित्रपट निर्माते अब्दुल गफ्फार नाडियादवाला यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. अनेक आजारांशी झुंज देणाऱ्या ए जी नाडियादवाला यांनी आज पहाटे १.४० वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा मुश्ताक नाडियादवाला यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

अब्दुल गफ्फार यांनी ९० च्या दशकात अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. चित्रपटसृष्टीत ते गफ्फारभाई म्हणून लोकप्रिय होते. १९८४ पासून त्यांनी विविध चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. अभिनेता धर्मेंद्र आणि रेखा यांचा झूठा सच हा त्यांचा पहिला निर्मिती चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी ‘लहू के दो रंग’, ‘आ गले लग जा’, ‘हेरा फेरी’, वेलकम यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. त्यांचे चित्रपट हे भारतीय चित्रपटसृष्टीत चांगलेच लोकप्रिय होते.

गफ्फारभाई हे मुंबई आणि गुजरातमधील स्टुडीओ असलेल्या नाडियादवाला चित्रपट बॅनरच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ अनेक चित्रपटांची निर्मिती केली. यात ‘आ गले लग जा’, ‘लहू के दो रंग’, ‘शंकर शंभू’, ‘झूठा सच’, ‘सोने पर सुहागा’, ‘वतन के’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांना प्रदीप कुमार आणि दारा सिंहची प्रमुख भूमिका असलेल्या ‘महाभारत’चे निर्माता म्हणूनही ओळखले जाते. याशिवाय त्याने अक्षय कुमारचा २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वेलकम’ या चित्रपटाची निर्मिती केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र गेल्या काही काळापासून त्यांना मधुमेह आणि दमा यांसारखे अनेक आजारांनी ग्रासले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु होते. मात्र काल त्यांची प्रकृतीत बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. पहाटे १.४० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना तीन मुले असून फिरोज, हाफिज आणि मुश्ताक अशी त्यांची नावे आहेत. ए जी नाडियादवाला यांचे वडील ए के नाडियादवाला हे देखील एक निर्माते होते. तर फिरोजचा चुलत भाऊ साजिद नाडियादवाला हा प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता आहे.