Ashok Saraf Talks About Madhuri Dixit : अशोक सराफ यांनी फक्त मराठी चित्रपटांमध्येच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाच्या जोरावर एक खास ओळख बनवली आहे.

पद्मश्री अशोक सराफ यांनी मराठी, हिंदी सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. मराठीत ‘अशीही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’, ‘शेजारी शेजारी’, ‘साडे माडे तीन’ असे एकापेक्षा एक हिट चित्रपट त्यांनी दिले आहेत.

शिवाय हिंदीतही त्यांची दखल घेतली गेली. ‘करण अर्जुन’, ‘येस बॉस’, ‘अबोध’ अशा अनेक हिंदी सिनेमांमध्ये ते झळकले. नुकतेच मुलाखतीत अशोक सराफ यांनी कलाकारांबद्दल अनेक किस्से आणि आठवणी सांगितल्या आहेत. तसंच त्यांनी माधुरी दीक्षितबरोबरची आठवण देखील सांगितली आहे.

माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट म्हणजे राजश्री प्रोडक्शनचा १९८४ साली आलेला ‘अबोध.’ या चित्रपटावेळी माधुरी फक्त १० वीत होती. ‘अबोध’ या चित्रपटात अशोक सराफही होते. अशोक सराफ यांनी नुकतंच एका मुलाखतीत माधुरीबरोबरची आठवण सांगितली. चित्रपटावेळी शाळेत शिकणारी माधुरी दीक्षित कशी होती आणि आता कशी आहे, यावरही अशोक सराफ बोलले आहेत.

अशोक सराफ ‘रेडियो नशा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “राजश्रीबरोबर मी ‘अबोध’ चित्रपट केला, त्यात माधुरी पण होती; तेव्हा ती शाळेत शिकत होती. अगदी साधी मुलगी, शांत बसली होती. तिचा चेहरा, तिचं सौंदर्य कमाल होतं. माधुरी १० वी ११वीत होती. शूटिंगही तिच्या शाळेमुळे थांबवण्यात आलं होतं. आमचं शूटिंग माधुरीला सुट्टी मिळाल्यानंतर झालं होतं. तो तिचा पहिला चित्रपट होता. राजश्रीबरोबर तो माझाही पहिलाच चित्रपट होता. नंतर आम्ही अनेक चित्रपट केले. माधुरी अजिबात बदलली नाही. ती आजही तशीच साधी मुलगी आहे; मराठी कलाकारांना फक्त मेहनतीने काम करायचं असतं. माधुरीही अशीच होती आणि आजही ती तशीच साधी आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माधुरी दीक्षित आणि अशोक सराफ यांनी ‘कोयला’, ‘प्रेम दीवाने’ या चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. अशोक सराफही अनेक हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकेत झळकले. अशोक सराफ यांच्या ‘येस बॉस’, ‘करण अर्जुन’, ‘सिंघम’, ‘कोयला’, ‘बेनाम बादशाह’ या हिंदी सिनेमांमधील भूमिका विशेष गाजल्या. यावर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशोक सराफ सध्या ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत काम करत आहेत.