बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. करीनाशी लग्न करण्याापूर्वी सैफने बॉलीवूड अभिनेत्री अमृता सिंगबरोबर लग्न केले होते; पण काही कारणांमुळे त्यांच्याच मतभेद होऊ लागले आणि २००४ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.

अमृता सिंहने तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेता सैफ अली खानशी १९९१ मध्ये लग्न केले होते. त्यावेळी त्या दोघांच्या वयात १२ वर्षांचे अंतर होते. तरीदेखील त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अमृता सिंह ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. सुरुवातीला ते दोघेही आनंदात होते. मात्र, काही काळानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनाही सारा अली खान आणि इब्राहिम अली खान, अशी दोन मुले आहेत.

सैफबरोबर घटस्फोट झाल्यानंतर अमृता सिंह ही एकटी पडली होती. दोन्ही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी तिने एकटीने उचलली. अमृता सिंहने एकदा त्यांच्या घटस्फोटाबद्दल सांगितले होते. अभिनेत्री म्हणालेली, “घटस्फोटानंतर मला कामाची गरज होती. मला मानसिक आणि आर्थिक आधाराची गरज होती. मला दोन मुले होती. मला निराश होऊन घरी बसायचे नव्हते. मी पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला; अन्यथा मी खूप आळशी आहे. माझ्याकडे जे काही होते, त्यात मी समाधानी होते. सर्वप्रथम मला या टप्प्यातून बाहेर पडावे लागले. अभिनय सोडल्याबद्दल मला अजिबात पश्चात्ताप नाही. लग्न ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यात खूप खास गोष्ट आहे. लग्न करण्याचा अनुभव माझ्यासाठी अदभुत होता. मला दोन सुंदर मुले आहेत. माझे लग्न यशस्वी झाले नाही. मला त्याचा अजिबात पश्चात्ताप नाही. माझ्या १२ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात मला खूप काही मिळाले.”

अमृता सिंह पुढे म्हणाली, “घटस्फोटानंतर सर्वप्रथम मला माझ्या मानसिक स्थितीशी संघर्ष करावा लागला. नंतर मला माझ्या तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करावे लागले. माझ्या मुलांनी मला परिस्थितीसमोर पराभूत झालेले पाहू नये, असे मला वाटत होते. घटस्फोटामुळे मी खूप दुःखी होते. आता मी काही प्रकारे माझ्या आयुष्यात आनंदी आहे आणि काही प्रकारे दुःखी आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर हे घडते. फक्त एकच दुःख आहे की, मी मुलांना वेळ देऊ शकले नाही.” पुनर्विवाहाच्या प्रश्नावर अमृता म्हणाली होती, “आता मी १६ वर्षांची नाही. खरे सांगायचे तर, मी त्याबद्दल विचार करीत नाही. माझ्याकडे पती देऊ शकेल, असे सर्व काही आहे. काही गोष्टी वगळता म्हणून मला लग्नाची गरज नाही.”

अमृता सिंहने घटस्फोटाचे कारण उघडपणे कधीच सांगितले नाही; पण सैफ अलीने एका मुलाखतीत संकेतांद्वारे बरेच काही सांगितले होते. घटस्फोटानंतर लगेचच त्याने ही मुलाखत दिली होती. सैफ म्हणाला होता, “मला पोटगी म्हणून पाच कोटी रुपये द्यावे लागतील. मी आधीच २.५ कोटी दिले आहेत. उर्वरित पैसेही मी देईन. मी बंगला दिला आहे. माझ्या आई आणि बहिणीला टोमणे मारण्यात आले. त्यांना शिवीगाळ करण्यात आली. मी या सर्व गोष्टींमधून गेलो आहे.”