ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज ७ जुलै रोजी निधन झाले आहे. वयाच्या ९८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जात आहे. अनेक सेलिब्रिटी दिलीप कुमार यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत.
दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ साली पेशावरमध्ये झाला होता. त्यांचे खरे नाव युसूफ खान होते. मात्र बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्यांनी त्यांचे नाव बदलून दिलीप कुमार असे केले होते. १९४४ साली प्रदर्शित झालेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून दिलीप कुमार यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. चांगल्या व्यक्तीची ओळख त्याच्याकडील संपत्तीवरून नव्हे, तर त्याच्या विनम्र स्वभावामुळे होते. दिलीप कुमार आणि जेआरडी टाटांच्या भेटीतून हे निदर्शनास आले. अभिनेते दिलीप कुमार आणि जेआरडी टाटा यांच्या भेटीदरम्यानचा हा किस्सा आहे. त्यावेळी दिलीप कुमार आघाडीचे अभिनेते होते आणि जेआरडी टाटा प्रसिद्ध व्यावसायिक.
बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये त्यावेळी दिलीप कुमार यांचे नाव घेतले जायचे. ते एकदा विमानाने प्रवास करत होते. विमानातील इतर प्रवासी त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले होते. काही जण त्यांच्याशी बोलण्यासाठी पुढे आले आणि त्यांचा ऑटोग्राफही घेतला. मात्र त्यांच्या बाजूला बसलेल्या एका व्यक्तीला या सर्व गोष्टींनी काहीच फरक पडत नव्हता. ती व्यक्ती शांतपणे बसून मासिक वाचण्यात व्यग्र झाली होती. ही व्यक्ती इतर कोणी नसून प्रसिद्ध व्यावसायिक जेआरडी टाटा होते. खरंतर दिलीप कुमार आणि टाटा हे दोघंही एकमेकांना ओळखूच शकले नव्हते.
दिलीप कुमार यांनाही या गोष्टीचे नवल वाटले होते. विमानातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्याशी बोलायला, ऑटोग्राफ घ्यायला येत होता, मात्र त्यांच्या बाजूलाच बसलेल्या व्यक्तीला या सर्व गोष्टींचा काहीच फरक पडत नव्हता. त्यांना वाटले की त्या व्यक्तीशी आपण बोलावं, पण काय बोलावं हेच दिलीप कुमार यांना सुचत नव्हते. इतक्यातच टाटा यांनी दिलीप यांच्याकडे पाहिले आणि त्यांना हॅलो म्हणाले. मग दिलीप कुमारही बोलू लागले. बोलता बोलता टाटा यांना त्यांनी एक प्रश्न विचारला की, तुम्ही सिनेमे पाहता का? टाटा यांनी उत्तर दिलं की खूप क्वचित पाहतो, वर्षभरापूर्वी एक सिनेमा पाहिला होता. तेव्हा दिलीप कुमार यांनी सांगितले की ते चित्रपटांमध्ये काम करतात. यावर टाटा यांनी विचारले की, ‘खूप छान, सिनेमात नेमके काय करता तुम्ही?’ टाटा यांच्या प्रश्नाने जराही आश्चर्यचकित न होता ‘मी एक अभिनेता आहे’ असे उत्तर दिले. अशा प्रकारे दोन दिग्गजांमध्ये विमान प्रवासादरम्यान चर्चा सुरु होती.