Ranbir Kapoor On Parents Fight : अभिनेता रणबीर कपूरने गेल्या काही वर्षांत विविध भूमिका साकारत बॉलीवूडमध्ये त्याचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. एकापेक्षा एक हिट चित्रपट आणि लक्षात राहणाऱ्या भूमिका यामुळे रणबीर कपूर सध्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो.
रणबीर हा अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. आई नीतू कपूर, बहीण रिद्धीमा कपूर, पत्नी आलिया भट्ट यांच्या वक्तव्यांमुळे रणबीर अनेकदा चर्चेत असतो.
रणबीर कपूरचे पालक ऋषी कपूर आणि नीतू कपूर हे बॉलीवूडमधील आवडत्या जोडप्यांपैकी एक होते. दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. चित्रपटाच्या सेटवर दोघांचे प्रेम झाले आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले. लग्नानंतर ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या आयुष्यात समस्या येऊ लागल्या. दोघेही खूप भांडायचे. रणबीर कपूरने स्वतः याबद्दल खुलासा केला होता.
रणबीर कपूरने स्वतः त्याचे पालक ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्यातील भांडण पाहिले आहे. ते रात्रभर भांडायचे. रणबीर त्याच्या पालकांच्या भांडणामुळे खूप अस्वस्थ झाला होता. त्याने एका मुलाखतीत ऋषी कपूर आणि नीतू यांच्यातील भांडणाबद्दल सांगितले होते.
“ते रात्रभर भांडायचे” : रणबीर कपूर
रणबीर कपूरने टीबीआयपीला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या पालकांच्या भांडणाबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता, “मी माझ्या पालकांबरोबर राहत होतो. मी त्यांना एका टप्प्यातून जाताना पाहत होतो. मीही त्या टप्प्याचा एक भाग होतो. मी त्यांच्याबरोबर एका बंगल्यात राहत होतो. ते खालच्या मजल्यावर राहत होते आणि मी वरच्या मजल्यावर राहत होतो. मला आठवते की रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मी ४ तास पायऱ्यांवर बसून त्यांचे भांडण ऐकत असे. मला अनेक वस्तू तुटल्याचा आवाजही ऐकू येत असे.” रणबीर पुढे म्हणाला की, त्याच्या पालकांच्या भांडणाच्या बातम्या चर्चेत असायच्या, त्यामुळे त्याला शाळेत लाज वाटायची. नंतर त्याच्या पालकांमध्ये सर्व काही ठीक झाले.
ऋषी कपूर यांचे एप्रिल २०२० मध्ये निधन झाले. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचे लग्न जानेवारी १९८० मध्ये झाले होते. एका चित्रपटादरम्यान दोघांचेही प्रेम झाले. नीतू कपूर आणि पती ऋषी कपूर यांची जोडी ऑनस्क्रीनही तेवढीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरायची.