अभिनेता संजय दत्त या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटाची जितकी चर्चा झाली नाही, तितकी चर्चा संजय दत्तच्या वैयक्तिक आयुष्याची झाली. संजय दत्तने एकदा असेही म्हटले होते की, जर त्रिशाला अभिनय क्षेत्रात आली असती, तर त्याने तिचे पाय मोडले असते. त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा यांची मुलगी आहे. १९९६ मध्ये रिचाचा कर्करोगाने मृत्यू झाला.

त्रिशाला दत्त परदेशात राहते आणि आता ती फॉरेन्सिक सायंटिस्ट आहे. तिचे वडील आणि आई दोघेही चित्रपट स्टार होते; पण त्रिशालाने शोबिझपासून दूर एका वेगळ्या क्षेत्रात स्वतःचे नाव कमावले आहे आणि ती चांगली कामगिरी करीत आहे.

खरं तर बॉलीवूडमध्ये स्टारकिड्सचा बोलबाला दिसतोय. शाहरुख, सैफ, आमिर खानची मुलं सिनेमात झळकत आहेत. तर, रवीनाच्या मुलीनंदेखील १८ व्या वर्षीच बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. या स्टारच्या मुलांनाही याच क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. तशी संजय दत्तची मोठी मुलगी त्रिशाला हिचीपण होती. पण, या इंडस्ट्रीत करिअर करण्याचा, अभिनय करण्याचा त्रिशालाचा निर्णय संजय दत्तला आवडला नव्हता. आपल्या मुलांनी या इंडस्ट्रीत येऊ नये, अशी संजयची इच्छा आहे. त्रिशाला एकेकाळी अभिनेत्री बनू इच्छित होती; परंतु संजय दत्तने ते मान्य केले नाही. अभिनेत्याने २०१७ मध्ये एकदा याबद्दल बोलले होते.

संजय दत्त त्यावेळी ‘भूमी’ चित्रपटातील त्याची ऑनस्क्रीन मुलगी अदिती राव हैदरीबद्दल बोलत होता. अभिनेत्रीची तुलना त्याची मुलगी त्रिशालाशी करताना तो म्हणाला, “जर त्रिशालानं अभिनय क्षेत्र निवडलं असतं, तर मी तिचे पाय तोडले असते. पण, मी माझ्या ऑनस्क्रीन मुलीबरोबर म्हणजेच अदितीबरोबर असं कहीही करणार नाही…”

२०१३ मध्ये संजय दत्तने ‘फिल्मफेअर’ला सांगितले होते, “तिच्या डोक्यातही हे अभिनयाचं भूत बसलं होतं. पण आता मला समाधान आहे की, तिच्या डोक्यातून हे भूत गेलं. तिनं आता अभिनय करायचं डोक्यातून काढलंय. ती फार हुशार आहे. तिनं फॉरेन्सिक सायन्सचा अभ्यासही केलाय. तिनं त्याच क्षेत्रात काहीतरी मोठं करावं…”, असंही संजय दत्त म्हणाला होता.