Kishore Kumar Death Anniversary Marathi News: गाणं हा असा कला प्रकार आहे जो आपल्या कानांनाच नाही तर मनालाही सुखावून जातो. गाणं आवडत नाही असा माणूस भेटणं विरळाच. शास्त्रीय संगीत असो किंवा भावगीत, हिंदी गाणं असो किंवा मराठी अनेक गाणी अशी असतात जी त्या गायकामुळे लक्षात राहतात. हिंदी सिनेसृष्टीत किशोर कुमार हे असं एक नाव आहे ज्या नावाचा करीश्मा आजही कायम आहे. किशोर कुमार यांना जाऊन आज ३६ वर्षे झाली आहेत तरीही त्यांचा आवाज आपल्याला मुग्ध करतो. मात्र याच किशोर कुमार यांना गायक न मानणारे आणि त्यांच्याकडून फक्त एकच गाणं गाऊन घेतलेले आणि तेदेखील सिनेमात न वापरलेले संगीतकार होते ते म्हणजे नौशाद. नौशाद यांनी संगीतबद्ध केलेली गाणी लोकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. ती जादू किशोर कुमार यांच्याही आवाजाची आहे. मात्र नौशाद यांनी किशोर कुमार यांना कधी गायक मानलंच नाही. टोकाचा तिरस्कार नौशाद का करायचे? जाणून घेऊ हा किस्सा.
नौशाद हे किशोर कुमार यांना गायक मानतच नव्हते
“किसीसे इतनी नफरत मत करो की अंधे हो जाओ..” हा हिंदी भाषेत वापरला जाणारा वाक्प्रचार आहे. नौशाद यांना किशोर कुमार यांच्याविषयी अगदी असाच तिरस्कार वाटत होता. संगीत दिग्दर्शक नौशाद हे किशोर कुमार हा चांगला गायक आहे हे मान्यच करायला तयार नव्हते. १९५० ते १९६५ हा काळ नौशाद यांच्या आयुष्यातला सुवर्णकाळ होता. त्यांनी या काळात एकाहून एक अधिक चित्रपटांना सुंदर असं संगीत दिलं. मात्र त्या काळात त्यांनी एकही गाणं किशोर कुमार यांच्याकडून गाऊन घेतलं नाही. ७० चं दशक आलं तेव्हा त्या काळातल्या गाण्यांचा ट्रेंड बदलला. नौशाद यांनाही संगीत द्याल का? हे विचारणं दिग्दर्शकांनी कमी केलं होतं. ‘आराधना’ सिनेमातल्या गाण्यांनी किशोर कुमार यांची किमया सिद्ध झाली. तो काळ किशोर कुमार यांच्या करीअरचा आलेख उंचावणारा होता. त्यावेळी नौशाद यांनी एका गाण्यासाठी किशोर कुमार यांना गायला बोलवलं.
सुनहरा संसारचा किस्सा काय?
‘सुनहरा संसार’ या सिनेमाला नौशाद यांनी संगीत दिलं होतं. या चित्रपटात राजेंद्र कुमार आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमासाठी नौशाद यांनी एक गाणं हे आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्याकडून गाऊन घेतलं. मात्र सिनेमाच्या क्रेडिट लाइन बघितल्या तर नौशाद यांचं नाव आहे. मात्र पार्श्व गायकांच्या यादीत किशोर कुमार आणि आशा भोसले यांचं नावच नव्हतं. कारण ते गाणं रेकॉर्ड तर झालं पण त्यांनी ते गाणं त्यांनी सिनेमाच्या निर्माता दिग्दर्शकांना पाठवलंच नाही. हे गाणं वाईट झालं आहे असं त्यांनी स्वतःच ठरवलं आणि ते गाणं डब्यात बंद केलं. त्यामुळे हे गाणं या सिनेमात नव्हतंच. पण निर्मात्यांनी किशोर कुमार यांना पैसे दिले होते, नौशाद यांनाही पैसे दिले होते. त्यावेळच्या म्युझिक कंपनीने हे गाणं डिलिट करायचं नाही असं ठरवलं. सुनहरा संसारच्या LP डिस्कवर हे गाणं होतं. त्याचे बोल होते ‘हॅलो क्या हाल है’. किशोर कुमार यांच्याबाबत नौशाद असं का वागले? याचं महत्त्वाचं एकच कारण होतं ते म्हणजे नौशाद अली हे किशोर कुमार यांना गायकच मानत नव्हते. आपण ज्या पद्धतीचं संगीत देतो, चाली लावतो ते किशोर कुमार गाऊच शकणार नाही हे त्यांनी त्यांच्या मनात पक्कं ठरवलं होतं. त्यामुळेच ही घटना घडली.

जवळपास प्रत्येक नटासाठी किशोर कुमार यांनी गायलं गाणं
किशोर कुमार यांचं गाणं हे आजही आपल्या मनावर गारुड करतं. किशोर कुमार हे उत्तम अभिनेतेही होते आणि त्यांनी उत्तम पार्श्वगायनही केलं. अमिताभ बच्चन, संजीव कुमार, राजेश खन्ना, देव आनंद जवळपास त्या काळातल्या प्रत्येक हिरोचा ते आवाज झाले. ‘अगदी पाच रुपया बाराह आना’, ‘इक लडकी भिगी भागीसी’, ‘चिल चिल चिल्लाके कजरी सुनाए’ या त्यांच्यावरच चित्रीत झालेल्या गाण्यांपासून ते पुढे राजेश खन्ना, अमिताभ, धर्मेंद्र, ऋषी कपूर, देवानंद यांच्या गाण्यांपर्यंत आपण हां हां म्हणता येऊन पोहचतो. किशोर कुमार यांचं खोडकर असणं, मनस्वी असणं, दांडगेपणा करत गाणी म्हणणं, उड्या मारणं सगळंच प्रेक्षकांना खूप आवडलं. मनाला पटेल तेच करणारा हा कलाकार होता. ‘फुलों के रंगसे, दिल की कलमसेट हे देवानंदच्या तोंडी असलेलं गाणं असो, ‘मेरे सपनो की रानी कब आयेगी तू’ हे राजेश खन्नाच्या तोंडी असलेलं गाणं असो किंवा ‘छु कर मेरे मन को किया तुने क्या इशारा’ हे अमिताभवर चित्रित झालेलं गाणं असो प्रत्येक नटासाठी ते वेगळ्या शैलीत गायचे.

लता मंगेशकर यांना दिलेल्या मुलाखतीत काय म्हणाले किशोर कुमार?
लता मंगेशकर यांना दिलेल्या एका मुलाखतीत किशोर कुमार म्हणाले होते, “लता, मला लहानपणापासूनच गाणं खूप आवडायचं. मी कुंदनलाल सैगल यांना माझे गुरु मानतो. मला अभिनय वगैरे काही करायचं नव्हतं. पण आमचे दादामुनी म्हणजेच अशोक कुमार यांनी मला भरीस पाडलं म्हणून मी अभिनय केला. अभिनय खोटा असतो आणि गाणं खरं असतं, कारण गाणं हृदयातून गायलेलं असतं. गाणं हा हृदयाचा हृदयांशी झालेला संवाद असतो. मला सा-रे-ग-प-ध-नि-सा हे काही येत नाही.. मी काही शिकलो नाही. लोकांना यावर विश्वास बसत नाही. पण मी गाणं शिकलेलो नाही.” असंही किशोर कुमार यांनी म्हटलं होतं.
अशोक कुमार हे किशोर कुमार यांच्याबाबत काय म्हणाले होते?
किशोर कुमार यांचे मोठे बंधू आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे दादा मुनी अर्थात अशोक कुमार यांनीही किशोर कुमारबाबत एका मुलाखतीत वक्तव्य केलं होतं. “किशोरला लहानपणापासूनच गाणं खूप आवडायचं. त्याचा जन्म जेव्हा झाला तेव्हा त्याचा आवाज कर्कश्य होता. किशोर पाच वर्षांचा होता तेव्हा एक वाक्य बोलला की खोकायचा. त्याला औषध वगैरे दिलं, त्यानंतर एकदा असं झालं की त्याचं बोट कापलं. त्यावर तो खूप वेळ रडला. त्या रडण्याने झालं की काय झालं ते माहित नाही.. पण त्याचा आवाज कर्कश्य वाटायचा तो वाटणं बंद झालं. किशोरला गाण्याची आवड होतीच. तो गाणं जेव्हा म्हणायचा तेव्हा त्याचा आवाज धनुष्यातून बाण जसा लक्ष्यभेद करतो अगदी तसाच चपखल वाटायचा. त्याच्या गाण्यातला सूर अगदी परफेक्ट, किशोर कधीच आऊट ऑफ ट्युन झाला नाही.” असं या मुलाखतीत अशोक कुमार म्हणाले होते.
किशोर कुमार यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, मन्ना डे, मोहम्मद रफी यांच्यासह दिग्गज गायकांसह गाणी म्हटली. किशोर कुमार आणि आशा भोसले यांचं हाल कैसा है जनाब का? हे गाणं आजही तितकंच फ्रेश वाटतं कारण त्याचं संगीत सुमधुर होतं. खेमचंद प्रकाश आणि ए.स. डी बर्मन यांना किशोर कुमार गुरु मानायचे. आर.डी. बर्मन यांच्याबरोबरही त्यांनी बरीच गाणी गायली आणि ती गाणी हिटही ठरली. आपल्या गाण्यातून आपल्या मनावर मोहिनी घालणारा किशोर कुमार आजही आपल्या मनात त्याच्या गाण्यांच्या रुपाने रुंजी घालतो आहे. आज त्यांचा स्मृतीदिन आहे, ते देहाने आपल्यात नसले तरीही त्याची गाणी अमर आहेत आणि अमर राहतील यात शंका नाही.