मित्र…! केवळ दोन अक्षरात तयार झालेल्या या शब्दाचा अर्थ मात्र खूप मोठा आहे, गरजेच्यावेळी आपण हक्काने ज्या व्यक्तीकडे मदतीची अपेक्षा करतो, तो पाठीराखा म्हणजेच मित्र! आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकांचे विघ्न दूर करणारा ‘विघ्नहर्ता’ हा देखील सच्च्या मित्रांच्या यादीत मोडतो. आयुष्याच्या वाटेवर दिशादर्शक ठरणारा हा ‘देव’ मित्र प्रत्येकाच्याच अंतर्मनात दडलेला असतो. अशा या बाप्पाने नुकतेच ‘यारी दोस्ती’ या आगामी सिनेमात एण्ट्री केली आहे. मैत्रीची परिभाषा मांडणाऱ्या या सिनेमाच्या टीमने एका कार्यक्रमात ‘गणू’ या नव्या मित्राचे स्वागत ढोलताशाच्या गजरात केले. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर वरळी येथील एन.एस.सी.आयमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात ‘यारी दोस्ती’ सिनेमातील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली होती. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचा माहोल आणि जल्लोष या कार्यक्रमात पाहायला मिळाला. फुलांची आरास, अत्तरांचा सुगंध आणि रांगोळी अशा प्रसन्न वातावरणात ‘बाप्पा’चे स्वागत करण्यात आले. सोबतीला आदर्श शिंदे यांच्या शाही आवाजातले ‘बाप्पा बाप्पा…’ हे गाणे होतेच. सिनेमातील गटर, नाला, लाडू आणि वन प्लस वन या मित्रांनी त्यांच्या पाचव्या मित्राचे भन्नाटरित्या स्वागत केले. या चौघांनी मिळून चिकण मातीची गणेश मूर्ती बनवत ‘बाप्पा’ला सगळ्यांसमोर आणले.
शांतनू अनंत तांबे लिखित आणि दिग्दर्शित ‘यारी दोस्ती’ हा सिनेमा किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित आहे. पॅशनवल्ड एंटरटेनमेंट्सची निर्मिती असलेल्या या सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार विजेता हंसराज जगताप हा मुख्य भूमिकेत आहे. तर ‘माझी शाळा’ या चित्रपटातून झळकलेला आकाश वाघमोडे याच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. आशिष गाडे, सुमित भोकसे हे कलाकार पदापर्णास सज्ज आहे.
या सिनेमात संदीप गायकवाड, मिताली मयेकर, नम्रता जाधव, श्रेयस राजे, निशा परुळेकर, अशोक पावडे, जनार्दन सिंग , मनीष शिंदे आणि मनीषा केळकर यांच्यादेखील ठळक भूमिका पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.