Zakir Khan Announced Break From Tours and Stage : झाकीर खान हा एक प्रसिद्ध कॉमेडियन आहे. आपल्या विनोदी शैलीनं लाखो प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या झाकीर खाननं त्यांच्या चाहत्यांना एक धक्कादायक बातमी दिली आहे. झाकीर खाननं त्याच्या व्यग्र कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत.
झाकीर खाननं सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. त्यानं यामागील कारणदेखील सांगितलं आहे. त्यानं कामापासून दूर राहण्याचा निर्णय का घेतला आहे ते जाणून घेऊया. झाकीर खाननं इन्स्टाग्रामवर ‘हेल्थ अपडेट’ शेअर केले. ३८ वर्षीय कॉमेडियननं सांगितलं की, सतत स्टेज शो आणि व्यग्र वेळापत्रक यांमुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. एक वर्षापेक्षा जास्त काळ तो आजारी होता; परंतु व्यावसायिक कामांमुळे तो काम करीत राहिला.
त्यानं सोशल मीडियावर लिहिले, “मी १० वर्षांपासून सतत दौरे करीत आहे. मला तुमचं प्रेम आणि आपुलकी मिळाली, हे माझं भाग्यच आहे; पण इतके दौरे करणं आरोग्यासाठी चांगलं नाही. लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न, दिवसाला २-३ शो, रात्री झोप नसणं, सकाळी लवकर विमानानं प्रवास आणि जेवणाच्या अनियमित वेळा यांमुळे एक वर्षापासून माझं आरोग्य बिघडलं आहे. तरीही कामाची गरज असल्यामुळे मी काम करीत राहिलो”.
झाकीरनं कबूल केलं की, त्याला लाइव्ह परफॉर्म करायला आवडतं; पण आता त्याला त्याच्या व्यग्र टूर शेड्युलपेक्षा त्याच्या आरोग्याला प्राधान्य द्यावं लागेल. तो पुढे म्हणाला, “मला स्टेजवर राहायला आवडतं; पण आता मला ब्रेक घ्यावा लागेल. माझं मन नाही आहे हे करायचं. खरं तर, मी ते एक वर्षापासून पुढे ढकलत होतो; पण आता मला वाटतं की, गोष्टी हाताबाहेर जाण्यापूर्वी मी ते सांभाळलं पाहिजे. म्हणून यावेळी मी भारतातील मर्यादित शहरांचाच दौरा करीन. मी जास्त शो करू शकणार नाही आणि हा खास रेकॉर्ड केल्यानंतर मला दीर्घ ब्रेक घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.”

झाकीरनं सांगितलं की, त्याच्या दौऱ्यात कमी शो असतील. इंदूरमध्ये शो होणार नाही, ज्यांना तो पाहायचा आहे त्यांना भोपाळला जावं लागेल. त्याचे शो २४ ऑक्टोबरपासून सुरू होतील आणि ते ११ जानेवारी २०२६ पर्यंत चालतील. तो वडोदरा, अहमदाबाद, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता, भोपाळ, उदयपूर, जोधपूर व मंगलोर येथे कार्यक्रम करणार होता; परंतु त्यांची संख्या कमी करण्यात आली आहे.