झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ नंतर ‘अग्गंबाई सूनबाई’ला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. आसावरी, अभिजीत राजे, शुभ्रा, सोहम, प्रज्ञा यांसोबतच मॅडीनेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत भक्ती रत्नपारखी मॅडीची भूमिका साकारत आहे. तिच्या या पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. भक्तीने नुकताच या मालिकेसाठी तिचा शेवटचा भाग शूट केला. त्यानंतर तिने तिच्या इन्स्टाग्रामद्वारे एक पोस्ट शेअर करत या मालिकेबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भक्ति रत्नपारखी ही सोशल मीडियावर चांगली सक्रिय आहे. तिने नुकतीच तिच्या इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या मालिकेबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. तिने या पोस्टला कॅप्शन देत लिहिले की, “आज अग्गंबाई सूनबाई मध्ये माझा शेवटचा सीन आहे…म्हणजे मॅडीचा..अग्गंबाई सासुबाई पासून हा प्रवास सुरू झाला होता ..मी खूप लकी आहे, मला मॅडी हे इतक गोड पात्र साकारायची संधी मिळाली…तिचा साधेपणा तिचा वेडेपणा  जगायला मिळाला..कशाचाही जास्त विचार न करणारी..सगळ्यांवर भरभरून निस्वार्थीपणे प्रेम करणारी..सगळ्यांशी मैत्री करणारी..आणि शेवटपर्यंत ती मैत्री टिकवणारी..आपल्यामधील लहान मुल नेहमीच जपुन ठेवणारी…इतकी निरागस मॅडी  आता मला परत करायला नाही मिळणार..याच खुप वाईट वाटतय…मॅडीवर सगळ्यानी खुप प्रेम केलं ..तुमच्या सगळ्यांचे यासाठी खुप खुप आभार.” याच बरोबर भक्तीने या पोस्टमध्ये संपूर्ण टीमचे देखील आभार मानताना दिसली आहे. तिने अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेता गिरीश ओक, मोहन जोशी यांचे पण आभार मानले आहेत. तसेच ती मॅडी या भूमिकेला मिस करणार असल्याचे ही तिने या पोस्टमध्ये लिहीले आहे.

भक्तीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट परिधान केल्याचे दिसत आहे. तसच तिने ही पोस्ट शेअर करताच तिचे चाहते भावूक होऊन त्यावर कमेंट करत आहेत. अनेक युजर्सने ते मॅडीला मिस करतील असं कमेंट सेक्शनमध्ये  लिहिलेले दिसत आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेचा दुसरा सिझन ‘अग्गंबाई सूनबाई’ देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.