News Flash

२२८. सत्क्रिया

फाटलेलं वस्त्र आपण शिवतो ते दोऱ्यानंच. शिवल्यावर बाहेरची शिवण दिसते

फाटलेलं वस्त्र आपण शिवतो ते दोऱ्यानंच. शिवल्यावर बाहेरची शिवण दिसते तशी आतली शिवण मात्र दिसत नाही. पण या दोन्ही बाजू पक्क्य़ा असल्यानंच वस्त्र अखंड होतं. उत्तम शिवणारा जो असतो त्यानं बाहेरून घातलेले टाके दिसतही नाहीत. अगदी तसंच बहिरंग आणि अंतरंग साधनेनं भगवंताशी जोडलं जाणं आहे. क्रिया, भक्ती, उपासना, नित्यनेम या ‘दिसू’ शकणाऱ्या गोष्टी हळूहळू अंतरंग साधनेतच विलीन होत जातील आणि परम तत्त्वाशी एकरूप होण्यासाठीचा खरा प्रवास सुरू होईल. तर ‘मनोबोधा’च्या ५७व्या श्लोकात समर्थ रामनामानं या जगात धन्य व्हायला सांगत आहेत. आणि ‘जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा,’ असं जे गेल्या दहाही श्लोकांत त्यांनी वारंवार नमूद केलं आहे तसं साधकानं सर्वोत्तमाचा दास होऊन जीवन धन्य करावं, असंच त्यांना म्हणायचं आहे. म्हणजेच सर्वोत्तमाचा दास होण्यासाठी आता जीवन समर्पित करा, असंच हा ५७वा श्लोक साधकांना सांगत आहे. हा दास होण्यासाठी, परमतत्त्वाचं दास्यत्व अंगी बाणवण्यासाठी कोणती साधना अनिवार्य आहे, याचं सूचन हा ५७वा श्लोक करतो. या साधनेची सुरुवात वरकरणी अतिशय छोटय़ाशा भासणाऱ्या, पण प्रत्यक्षात व्यापक असलेल्या आणि साधकालाही व्यापक करणाऱ्या अशा नामानंच आहे! या घडीला संकुचित असलेल्या मला हे नामच खऱ्या अर्थानं व्यापक करणारं आहे. हे नाम रुजविण्याचे दोन मार्गही या श्लोकात आहेत. एक मार्ग आहे तो बहिरंग साधनेचा आणि दुसरा मार्ग आहे तो अंतरंग साधनेचा. जसं शुद्ध पाण्यानं स्नान करून शरीर स्वच्छ, सतेज होतं आणि वेगळीच स्फूर्ती लाभते आणि शुद्ध विचारांनी अंतरंग स्वच्छ, सतेज होतं आणि मनाला उभारी येते, तसंच या दोन्ही साधना एकरूप होत गेल्या की अंतर्बाह्य़ चिद्सुखानं साधक ओथंबून जातो. तर या श्लोकाच्या दुसऱ्या चरणात क्रिया, भक्ती, उपासना आणि नित्यनेम असे चार शब्द आहेत. मूळ चरण ‘‘क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमें।’’ असा असून त्यात उपासना हा शब्द ‘ऊपासना’ असा दीर्घ आहे आणि त्यामागेही विलक्षण कारण आहे! तर क्रिया, भक्ती, उपासना आणि नित्यनेम असे चार शब्द असले तरी प्रत्यक्षात भक्ती हीच क्रिया आहे, भक्ती हीच उपासना आहे आणि भक्ती हाच नित्यनेम आहे. म्हणजेच हे चारही शब्द वेगवेगळे असले तरी परमतत्त्वाशी, व्यापक तत्त्वाशी जोडलं जाणं, हाच त्यांचा एकमेव हेतू आहे. आता क्रिया हा शब्द स्वतंत्र मानला तर त्यातून सत्क्रियेचं सूचन होतं आणि क्रिया व भक्ती हे शब्द एकत्र पाहिले तर क्रियाशील भक्तीचं सूचन होतं. आता भक्ती वाढविणारी सत्क्रियाच इथं अभिप्रेत असली पाहिजे. अशी सत्क्रिया कोणती? आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये साधकानं काय काय करावं, याचं बरंच मार्गदर्शन आलं आहे. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकात ते अगदी स्पष्टपणे आणि नेमकेपणे सांगितलं आहे. ‘‘प्रभाते मनीं राम चिंतीत जावा। पुढें वैखरी राम आधी वदावा।’’ म्हणजे या मार्गावर वाटचाल सुरू करताना मनात कामाचं, कामनांचं चिंतन नको, तर रामाचं चिंतन करा आणि पुढे जे वैखरी जग आहे, व्यक्त जग आहे त्याचा आधी म्हणजे पाया हा रामच आहे, याची जाणीव ठेवून जगात वावरा, असं तिसऱ्या श्लोकात सांगितलं आहे. हा थोर सदाचार आहे, श्रेष्ठ सदाचार आहे, असंही स्पष्ट म्हटलं आहे. दुसऱ्या श्लोकात समर्थ सांगतात की, ‘‘जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।।’’ म्हणजे संतजनांनी ज्या गोष्टी निषेधार्ह ठरवल्या आहेत त्या करू नयेत आणि त्यांनी ज्या गोष्टींचं समर्थन केलं आहे त्या गोष्टी कराव्यात. तेव्हा या धारणेनुसारचं आचरण हीच खरी सत्क्रिया आहे. या आचरणानुसारची जी भक्ती आहे तीच क्रियाशील भक्ती आहे.

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 2:34 am

Web Title: samarth ramdas philosophy 130
Next Stories
1 २२७. तत्त्वसार
2 २२६. वज्र-कुसुम : २
3 २२५. वज्र-कुसुम : १
Just Now!
X