News Flash

४८४. रंग—संगती

हाडामांसाच्या देहाच्या डोळ्यांनी ते व्यापक तत्त्व आकळणार नाही.

तो सद्गुरू, ते परब्रह्म, ते व्यापक तत्त्व साध्या डोळ्यांनी किंवा स्वआकलनाच्या जोरावर उमगू शकत नाही. ‘दासबोधा’त समर्थ सांगतात, ‘‘अस्थींचा देहीं मांसाचा डोळा। पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा। तो ज्ञाता नव्हे आंधळा। केवळ मूर्ख।। दृष्टीस दिसे मनास भासे। तितुके काळांतरी नासे। म्हणोनि दृश्यातीत असे। परब्रह्म तें ।। परब्रह्म तें  शाश्वत। माया तेचि अशाश्वत। ऐसा बोलिला निश्चितार्थ। नाना शास्त्रीं।।’’ या हाडामांसाच्या देहाच्या डोळ्यांनी ते व्यापक तत्त्व आकळणार नाही. कारण हे डोळे या देहातच संकुचित देहभावानं रुतले आहेत. या देहसुखापलीकडचा विचार या मनाला करवत नाही, मग प्रत्यक्ष कृती ही तर फार पुढची गोष्ट झाली! मग अशा संकुचित देहभावात चिणलेल्या मला व्यापक तत्त्वाचं दर्शन काय होणार? या डोळ्यांना जे जे दिसतं आणि देहभावात रुतलेल्या मनाला जे जे भासतं ते काळाच्याच अधीन असतं आणि म्हणूनच ओसरतं. अशाश्वत मायेच्या आधारावरच तग धरून राहात असलेल्या मला शाश्वत तत्त्व उमगूच शकत नाही. जे उमगतं ते ते मायेच्याच पकडीत अलगद सामावतं! याच सत्याचं अधिक थेट वर्णन समर्थ ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १५०व्या श्लोकात करीत आहेत. प्रथम हा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे :

नसे पीत ना श्वेत ना श्याम कांहीं।

नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं।

म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे।

मना संत आनंत शोधूनि पाहें।। १५०।।

प्रचलित अर्थ : परब्रह्माचं वर्णन करता येत नाही. त्याच्याकडे निर्देश करता येत नाही. ते पीत म्हणजे पिवळे नाही, श्वेत म्हणजे पांढरे वा श्याम म्हणजे काळे नाही. ते व्यक्त म्हणजे सगुण वा अव्यक्त म्हणजे निर्गुण नाही. ते नीळ म्हणजे आकाशही नाही. सद्गुरुवचनी पूर्ण विश्वास ठेवल्यानेच ते आकळते. त्यानेच मुक्ती मिळते. त्यामुळे हे मना, त्या शाश्वत ब्रह्माचाच शोध घे.

आता मननार्थाकडे वळू. माणूस कळत-नकळत अध्यात्माच्या मार्गावर आला की आधी उघडय़ा डोळ्यांनी जगात देवाचा ‘शोध’ घेत असतोच. तो अनेक मंदिरं पालथी घालतो, तीर्थस्थळांना भेट देतो. कुठूनसं कळतं की, याच जागी हनुमंताचा जन्म झाला होता, या जागी वनवासात असताना प्रभू सीतामातेसह निवास करीत होते, याच जागी विष्णूचं पाऊल उमटलं आहे.. तर अशा जागी जाऊनही तो दर्शन घेत असतो. बाहेरचा हा ‘शोध’ सुरू असतानाच आपल्या अंतरंगातही तो हा शोध सुरू करतो. कारण बाहेर चराचरात असलेला तो भगवंत आपल्या हृदयातही अंशरूपानं आहेच, असं आपण ऐकलं, वाचलं असतं; पण ना चराचरात भरून असलेला देव दिसतो, ना आपल्या आतला देव दिसतो. पण एक मात्र होतं. माणसाला काही तरी ‘दिसल्याशिवाय’ त्याचं समाधान होत नाही, त्याची खात्री पटत नाही. म्हणूनच मिटल्या डोळ्यांनी तो आतमध्येही काही तरी पाहण्याची धडपड करतो. आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे आणि काय नेमकं दिसणार आहे, हे माहीत नसतानाही तो पाहू लागतो आणि.. आणि त्याला कधी कधी रंग दिसतात! कधी काळाकुट्ट अंधार, कधी पिवळाधम्म प्रकाश, कधी लाल, तर कधी निळा.. देवाच्या दर्शनाची ही सुरुवात आहे का? ते विराट परब्रह्म दिसण्याची ही सुरुवात आहे का? आपल्या आध्यात्मिक प्रगतीची ही चिन्हं आहेत का? हे संकेत आहेत का? असे प्रश्नही त्याच्या मनात येतात. काहींना मात्र खात्रीच वाटते की, आपली प्रगतीच सुरू आहे; पण या ‘दर्शना’च्या अनुषंगानं समर्थ मात्र या श्लोकात सांगतात की, ‘‘नसे पीत ना श्वेत ना श्याम कांहीं। नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं।’’ बाबा रे, ते तत्त्व ना पिवळं आहे, ना पांढरं, ना काळं.. ते साकार किंवा निराकार किंवा त्यापलीकडील अवकाशातच फक्त आहे, असंही नाही!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 1:07 am

Web Title: samarth ramdas philosophy 347
Next Stories
1 ४८३. शब्द-रवंथ
2 ४८२. वर्णनातीत
3 ४८१. आधार
Just Now!
X