”अमेय तू निशाच्या बाजूला बसलास तर बरं होईल”, भक्तीने क्लासच्या पिकनिकवेळी बसमध्ये चढताना अमेयला सांगितलं.

”हो..अमेय. बस ना”, भक्तीच्या विनंतीवर अंकित, प्रणाली आणि कुणाल यांनी सहमती दर्शवली.

भक्ती, अंकित, प्रणाली, कुणाल, निशा आणि अमेय हे सहा जणं यांची इयत्ता बारावीपासून चांगली गट्टी होती. मित्र परिवार तसा मोठा होता, पण हे सहा जण एकाच क्लासला जायचे. त्यामुळे या सहा जणांचा तसा ‘ग्रुप’ तयार झाला होता. वर्षभरातच सहा जणांमध्ये जोड्याही जुळल्या. भक्तीच्या हृदयाचं कनेक्शन अंकितशी जोडलं गेलं होतं, तर कुणालने प्रणालीचं मन जिंकलं होतं. निशा आणि अमेय यांच्यात तसं काही नव्हतं. अमेय स्मार्ट होता, त्यात चंचल. कॉलेजात सुंदर मुलगी दिसली की याचं सुरू.. त्यामुळे अमेय कमिटमेंट वगैरेच्या भानगडीत पडला नव्हता.

”अमेय..तसंही तू नाही बसलास तर दुसरं कोणतरी निशाच्या बाजूला बसण्यापेक्षा तू बसलास तर बरं होईल. तिला कंपनी मिळेल”, अंकितने अमेयला म्हटलं.

अंकित तसा अमेयच्या जवळचा. त्यामुळे अमेयने ऐकलं.

कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात असतानाची ही क्लासची पिकनिक होती. गेल्या वर्षापर्यंत पिकनिकमध्ये हंगामा करण्यासाठी बसची सर्वात शेवटची सहा जणांची सीट अडवण्यासाठी धडपड करणारे हे सहा जण यंदा आपापल्या ‘पार्टनर’सोबत बसले होते. अंकितसोबत भक्ती आणि कुणालसोबत प्रणाली. त्यामुळे निशा एकटी पडली होती. निशाला वाईट वाटू नये म्हणून या सर्वांची अमेयकडे विनवणी करण्यासाठीची ही धडपड सुरू होती. अर्थात अमेयला ते कळलं होतं, पण त्याने समजून घेतलं. बसमध्ये शिरल्यानंतर अमेय निशाच्या बाजूला जाऊन बसला.

”अे..बघ ना अमेय यांनी शेवटची सिट पकडण्याऐवजी हे पुढे बसलेत.”, निशा अमेयला म्हणाली.

”हो..ना. मागे एकत्र बसलो असतो तर किती मज्जा करत आली असती”, अमेय म्हणाला.

”हे..असंच होतं. त्यांना आता त्यांचे लाइफपार्टनर मिळाले ना..आता हे पुढे असंच करणार”, निशाने टोमणा मारला.

”अगं मग आम्ही कुठे अडवलंय तुला..तू ही शोध की तुझा लाइफपार्टनर”, निशाच्या पुढच्या सिटवर बसलेल्या प्रणालीने म्हटलं.

”हाहाहा..हिला कोण मिळणारए..”, अमेयने थट्टा केली.

”अे..राहूदेत तू बोलू नकोस..तू तुझं बघ..कोण नवीन मुली आल्यात का आणि तुला किती भाव देतायत ते”, निशाने अमेयला म्हटलं.

बसमध्ये सर चढले आणि उपस्थिती तपासल्यानंतर बस सुरू झाली. सरांनी या सहा जणांना असं बाजूबाजूला बसलेलं पाहिल्यानंतर त्यांनाही कुणकुण लागली होती. पण क्लासचे सर तसे वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणारे नव्हते. पिकनिक आहे करू देत ज्याचं त्याचं त्याला एन्जॉय, असं त्याचं म्हणणं. त्यामुळे पिकनिकच्या दिवशी सूट होती. पण अभ्यासावेळी अजिबात हलगर्जीपणा ते खपवून घ्यायचे नाहीत.
बस जशी सुरू झाली तसा सर्वांनी एकच कल्ला सुरू केला..

”गणपती बाप्पा मोरया..” काय ”बोल बोल जागे वाले की..” अशा जयघोषात पिकनिकला सुरूवात झाली. पुढे गाण्यांच्या भेंड्या सुरू झाल्या. प्रत्येक जण एन्जॉय करत होता. झांज, डफ सगळी व्यवस्था केली होती.

अमेय तसा खूप उत्साही. सीटवर गुडघ्यावर बसून त्याचं गाणं गाणं..सुरू होती. अंताक्षरीत गाण्याचा शेवटचा शब्द आला की पटकन गाणं बोलून तो रंगत वाढवायचा. खूप धम्माल करत होता.

”अमेय आपल्या टीममध्ये आहे तोवर आपल्याला चिंता नाही”, भक्ती म्हणाली.

”हो..ना अमेय कशी काय इतकी पटकन गाणी सुचतात तुला”, भक्तीच्या बॉयफ्रेंडने म्हटलं.

”अरे..हम हम हैं..इस दुनिया में हमसा ना कोई”, अमेय मोठ्या तोऱ्यात म्हणाला.

”हो..का..राहू देत. जरा का चांगलं म्हटलं ना याच्याबद्दल की याचं झाल लगेच सुरू..” भक्ती मुद्दाम म्हणाली.

”जाऊ देत ग..मला तुम्ही ओळखलंच नाहीत”, अमेय पुन्हा तोऱ्यात म्हणाला.

”ओह..प्लीज अमेय..इतकाही ग्रेट नाहीएस तू..उगाच झाडावर चढू नकोस”

”माहितीय मला..थँक्यू” अमेयने त्याच तोऱ्यात रिप्लाय दिला.

अंताक्षरीची धम्माल सुरूच होती. सर्वजण मज्जा करत होते. इतक्यात निशाला मळमळू लागलं. तिला गाडी लागते हे तिच्यासह मित्रमंडळींनाही ठावूक होतं. निशाने खबरदारी म्हणून गोळीही घेतली होती. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. निशाला उलटी होणं सुरू झालं. खिडकीतून बाहेर डोकं काढून ती सुरूच झाली. अमेय तिच्या होता. त्याने तिचं डोकं धरून तिला मदत केली. पाणीही दिलं.

”निशा..ठिक आहेस ना..हे घे पाणी पी..एकदा चूळ भर” अमेयने निशाला सावरत तिच्याकडे पाण्याची बाटली पुढे केली.

निशा चूळ भरल्यानंतर पाणी प्यायली आणि स्वत:ला सावरलं.

”निशा एक काम तर तू झोप आता थोडा वेळ”, अमेय निशाला म्हणाला.

”हो..चालेल”

”तुला काही हवंय का?”

”नको..मी जरा झोपते, मग बरं वाटेल”

”ओके..झोप”

निशा खिडकीजवळ सिटवर डोकं टेकून निवांत डोळे बंद करून झोपी गेली. अमेय देखील तिच्या बाजूला शांत बसला होता.
थोड्यावेळाने पुन्हा अंताक्षरीला सुरूवात झाली. पण यावेळी अमेय सीटवरच शांत बसला होता. त्याला आता काहीच करता येणार नव्हतं. कारण झोपत निशाने तिचं डोकं अमेयच्या खांद्यावर टेकवलं होतं. पुढे अमेय महाबळेश्वर येईपर्यंत अंताक्षरी वगैरे सर्व विसरून त्याच्या सिटवर बसून होता. त्याने निशाला अजिबात उठवलं नाही. शांत झोपू दिलं.

”निशा अगं उठ..पोहोचलो आपण”, भक्तीने निशाला उठवण्याचा प्रयत्न केला.

निशाला हळूवार जाग आली.

”अरे बापरे पोहोचलो पण, मला काहीच कळलं नाही.”

”ते सोड..आता कसं वाटतंय तुला?”, भक्तीने विचारलं.

”बरं वाटतंय..”

”डोकं दुखतंय का?”, अमेय म्हणाला.

”नाही”

”ओके..चल मग आता उतर तू..मी बॅग घेतो तुझी”

भक्ती निशाला घेऊन निघाली. अमेय स्वत:सोबतच निशाची बॅग घेऊन खाली उतरला.
सर्व फ्रेश झाले आणि अर्ध्यातासाच्या विश्रांतीनंतर भटकंतीला सुरूवात झाली.

”अगं..निशा तुझ्या उलटी प्रकरणामुळे बिचाऱ्या अमेयची वाट लागली.”, भक्ती निशाला म्हणाली.

”का गं..काय झालं?”

”अगं तू..झोपलीस आणि डोकं अमेयच्या खांद्यावर ठेवलं होतंस..मग काय त्याला हलताच आलं नाही..अगदी महाबळेश्वर येईपर्यंत.”

”अगं..मग उठवायचं ना मला.”

”मी म्हटलं होतं त्याला..की थोड्यावेळासाठी उठवू निशाला आणि मी तुझ्याजागेवर बसते. तू अंकितच्या बाजूला बस.”

”मग?”

”तुला उगाच जाग येईल..झोप मोड होईल आणि डोक दुखू नये म्हणून अमेय नको म्हणाला.”
अमेयच्या वागणुकीमुळे निशाच्या मनात त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला होता. ती लगेच अमेयकडे धावत गेली. तो त्याच्या एका मित्रासोबत गप्पा मारत उभा होता.

”अमेय..ऐक ना..”, निशा म्हणाली.

”बोल ना..निशा”

”जरा इकडे येना..बोलायचंय.”
अमेय निशाजवळ आला. निशा पुढे चालू लागली. अमेयपण तिला जॉईन झाला.

”बोल ना..काय झालं?”

”थँक्यू आणि सॉरी..अमेय”, निशा म्हणाली.

”कशासाठी..?”

”मला केलेली मदत आणि माझ्यामुळे तुला येताना काहीच मजा करता आली नाही. एकाच जागी बसून राहावं लागलं म्हणून.”

”अच्छा ते होय..बसक्या..कर दी ना छोटी बात.”, अमेय म्हणाला.

”अरे..खरंच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती ती”

”सोड गं..होत असतं असं..थँक्यू वगैरे काय त्यात. ते जाऊ देत..भक्ती, अंकित, कुणाल, प्रणाली आहेत कुठे..? एकत्रच जाऊ ना टाईमपास करत सर्व पॉईंट्सवर..छान सेल्फी काढूत.”

”अरे..हो ते मागेच आहेत. चल जाऊ”

दोघांनी इतर चौघांना गाठलं. त्यांच आधीच एकमेकांसोबत सेल्फी घेणं तसं सुरूच होतं. पुढे गप्पा मारत हे सर्वजण निघाले. वेन्ना लेक, मॅप्रो गार्डन, टेबल लँड अशी ठिकाणांना भेट दिली. पण ती फिरताना भक्ती, अंकित आणि प्रणाली, कुणाल त्यांचे त्यांचे सेल्फी टिपण्यात व्यस्त होते. अमेय एकटा पडला होता. निशाने ते हेरलं होतं.

पुढे ‘एको पॉईंट’वर पोहोचलो. येथे आपण दिलेला आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू येतो असं म्हटलं जातं म्हणून त्याला ‘एको पॉईंट’ असं नाव होतं.

”अे..इथे आपण आपल्या लाइफ पार्टनरचं नाव मोठ्याने म्हटलं आणि आपलं मनापासून प्रेम असेल तर त्याचा एको इफेक्ट ऐकू येतो..असं म्हणतात.” प्रणाली म्हणाली.

अर्थात एको इफेक्टमुळे काही प्रेम वगैरे सिद्ध होत नसतं, हे सर्वांना ठावूक होतं. तरीसुद्धा आवड म्हणून प्रत्येकाने आवाज देणं सुरू केलं.

”कुणाल…”, असं प्रणाली मोठ्यानं म्हणाली आणि त्याचा प्रतिध्वनी ऐकू आला. प्रणाली भलतीच खूश झाली आणि कुणालला जाऊन मिठीच मारली. मग भक्तीलाही राहवेना.. तिनेही अंकितच्या नावं घेतलं, मग पुढे कुणाल आणि अंकितनेही अनुक्रमे प्रणाली व भक्तीचं नाव मोठ्याने म्हटलं.

”चल..अमेय तू ही आता ट्राय कर..”, प्रणाली अमेयला म्हणाली.
अमेय आधीच त्या चौघांचं प्रेम पाहून हिरमुसला होता.

”मी..कोणाचं नाव घेणार?” अमेय हिरमुसल्या भावात म्हणाला आणि काहीच बोलला नाही.

”अरे…म्हण रे काहीही..कोणाचंही नाव घे”

”छे..मला नाही ट्राय करायंच..माझी गर्लफ्रेंड असेल ना तेव्हा ट्राय करेन मी..आत्ता नको. इच्छा नाही.” असं म्हणून अमेयने नकार दिला.

”निशा..तू तरी प्रयत्न कर.” प्रणाली म्हणाली.

”अगं..प्रणाली ती तरी कुणाचं नाव घेणार.”, भक्तीचा हा रिप्लाय आल्या लगत निशाने मोठ्याने आवाज दिला…

”अमेय….”

सर्वांनी ताडकन निशाकडे पाहिलं. अमेयचे तर डोळेच चक्रावले.

निशाचं लक्ष त्या उंचच उंच डोंगराकडेचं होतं..आणि एको इफेक्टने आलेल्या ”अमेय..अमेय..” च्या प्रतिध्वनीत ती रमून गेली होती. डोळे बंद करून ती त्याचा अनुभव घेत होती.

(क्रमश:)

तीन फुल्या, तीन बदाम

© सर्व हक्क सुरक्षित