जनमानसात अनेक धर्म, पंथ प्रचलित असतात. कालौघात त्यातील काही टिकतात तर काहींचा ऱ्हास होतो. पण जाता जाता हे धर्म- पंथ काही गोष्टींची आठवण आपल्या परंपरेमध्ये मागे ठेवून जातात. मग कधी ती आठवण कथा- दंतकथांमध्ये सापडते तर कधी ती एखाद्या विधी अथवा उपचारांमध्ये. भारतीय परंपरा, संस्कृती ही सर्वाना सामावून घेणारी संस्कृती आहे. त्यामुळे इथे संमीलित होताना, जुनी आठवण सोबत घेत पुढे जाण्याची परंपरा असल्याचे  गेल्या काही वर्षांमध्ये संशोधकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच आता संशोधनाच्या नव्या आधुनिक परंपरेमध्ये कधी नव्हे एवढे महत्त्व मौखिक परंपरेला प्राप्त झाले आहे. शिवाय समाजातील वेगवेगळ्या प्रथा- परंपरांकडेही आता संशोधकांचे लक्ष गेले आहे.
यापूर्वी संशोधक काम करीत त्या वेळेस केवळ पुरावे मग ते लेखी असतील किंवा पुरातत्त्वीय त्यांचाच आधार प्रामुख्याने घेतला जात असे. मग अशा वेळेस प्रचलित कथा, दंतकथा, लोकसंगीत, लोकगीते, लोकनृत्ये याकडे संशोधक ढुंकूनही पाहात नसत. किंबहुना या कथा- दंतकथांमध्ये अवास्तवताच अधिक असल्याने त्याचा शास्त्रीय संशोधनाला काहीही आधार नाही किंवा उपयोग नाही, असे मानले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांत संशोधनाच्या क्षेत्रात आलेल्या नव्या प्रवाहांनी खूपच वेगळी उकल केली असून आता संशोधकांचे जग या नव्या प्रकारच्या संशोधनाकडे वेगळ्या व चांगल्या नजरेने पाहू लागले आहे. जुन्या किंवा ऱ्हास झालेल्या परंपरांचा मागोवा या लोकपरंपरेतील खोलवर रुजलेल्या गोष्टींमधून विज्ञानाचीच शास्त्रीय पद्धत वापरून घेता येतो, असे संशोधकांच्या लक्षात आले. मग कुणा संशोधकाला मौखिक परंपरांचा शोध घेताना लोकगीतामधून कान्हेरीचा किल्ला आणि कान्हेरी मातेच्या संदर्भावरून पुन्हा कान्हेरीला जाण्याची ऊर्मी मिळाली आणि त्यातूनच कान्हेरीच्या किल्ल्याचे अवशेषही सापडले किंवा मग कान्हेरीला मंदिराचे अवशेषही सापडले. संशोधनाच्या या नव्या पद्धतीने आता जगभरातील संशोधकांमध्ये एक नवा उत्साह आला आहे.
आजवर आपणही आपल्याकडच्या परंपरांची अशीच लोकसंस्कृती म्हणून हेटाळणी केली आहे. कधी त्यांच्याकडे जादूटोणा करणारे संप्रदाय म्हणून पाहिले आहे तर कधी अवास्तव कथा- दंतकथांचे आगार म्हणून त्यांना दुर्लक्षित केले आहे. म्हणूनच या खेपेस दत्त जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या भूमीत खोलवर रुजलेल्या या संप्रदायाशी संबंधित सर्व बाबींचे दस्तावेजीकरण करण्याचा प्रयत्न ‘लोकप्रभा’ने केला आहे.
डॉ. रा. चिं. ढेरे सरांसारख्या संशोधकांनी दत्त संप्रदायावर चांगले संशोधन केले, मात्र आता या नव्या संशोधन पद्धतीच्या अंगाने यावर संशोधन होणे आवश्यक आहे. दत्त संप्रदायाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात बौद्ध व भागवत आणि शैव परंपरेच्या छेदमार्गावर संमीलकाचे काम केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. मात्र त्यावर फारसे संशोधन झालेले नाही. हे काम झाले तर राज्याच्या जुन्नरादी आणि सोलापुरादी विशिष्ट भागामध्ये या संमीलनाचे जे वेगळे रूप पाहायला मिळते, त्याच्या मुळाशी जाता येईल. त्यासाठी दत्त संप्रदायाची कास पकडून तिथपर्यंत पोहोचावे लागेल.. अशी एक नव्हे तर अनेक कोडी या संशोधनातून उलगडत जातील. त्यासाठी दत्त संप्रदायाच्या अनेकविध बाबींचा समावेश असलेला ‘लोकप्रभा’चा हा ‘दत्त विशेषांक’ निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.
01vinayak-signature
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com
Twiter – @vinayakparab