`कशाला हवीय तुला मुलाखत? ये आपण गप्पा मारू! मुलाखत वगैरे काहीही नाही’ लोकप्रभा वर्धापनदिन विशेषांकासाठीच्या मुलाखतीसाठी फोन केल्यानंतर गानसरस्वती किशोरीताईंचे हे पहिले उत्तर होते. किशोरीताईंशी संवाद साधू शकतील अशी मंडळी एकाच हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच आहेत. त्यात आमच्या लोकसत्ताचे सहाय्यक संपादक व संगीत समिक्षक मुकुंद संगोराम यांचा समावेश होतो. किशोरीताईंचे मानसपुत्रच असलेले संगोराम आणि ताईंचे सुपुत्र बिभास दोघांशीही बोलणे झाले होते. बिभास मुलाखत रेकॉर्ड करणार होता. दोघेही तयार होते. पण होकार मिळवण्याची जबाबदारी माझ्यावरच होती. पाच मिनिटांच्या संवादानंतर अधिकृत होकार मिळाला. त्या होकाराचे मोल तेव्हाही खूप होते. सोमवारी रात्री किशोरीताईंचे देहावसान झाल्याची बातमी कळली आणि लोकप्रभाच्या वर्धापनदिन विशेषांकातील त्यांची मुलाखत अखेरचीच ठरली. त्यावेळेस गानसरस्वतीचा तो होकार किती अनमोल होता, ते लक्षात आले.

लोकप्रभातील त्या मुलाखतीसाठी किशोरीताईंनी तब्बल चार तास दिले. संगीतातील बारकावे, त्यांची भूमिका, त्या मागची असलेली साधना, सध्या शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात जे सुरू आहे त्याबद्दलची उद्विग्नता, शास्त्रीय संगीतावरची अढळ श्रद्धा, त्यांची परंपरा पुढे नेणारी तेजश्री अशा सर्वच गोष्टींवर ताई भरभरून व मनमोकळ्या बोलल्या. कधी संगीतातील बारकावे सांगताना आई झाल्या आणि आई व मुलाची माया कशी असते त्याचे उदाहरण देत त्यांनी रागाला असलेल्या वादीचं नातं उलगडून दाखवलं. संगीताची भाषा हा तर त्यांचा प्राण असलेला विषय. मुलाखतीतही त्या म्हणाल्या, संगीत ही भाषा आहे. त्यामुळे तिला भाषेची सर्व तत्त्व तेवढीच लागू होतात. मग व्याकरणंही येतंच. शास्त्रीय संगीत हेच आमचं व्याकरणं. अमुक एक चांगला मुलगी आहे, असं आपण म्हणतं नाही. ते सांगताना व्यक्त करताना भाषेचं व्याकरण पाळावचं लागतं. व्याकरणाची त्या शास्त्राची अवहेलना होऊ नये, हे सांगताना सद्यस्थितीविषयीच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होत्या. शास्त्राची अवहेलना झाली तर सत्याची प्रचिती येणार नाही, यावर त्या ठाम होत्या.

लोकप्रभातील त्या विशेष मुलाखतीत त्यांनी संगीत हे कसं परब्रह्माची प्रचिती देतं त्याचाच उलगडा केला. किशोरीताईंनी अखेरच्या क्षणापर्यंत केलेला रसशास्त्राचा अभ्यास हा या मुलाखतीचा गाभा होता. करुण रसातून आनंद ही अस्सल भारतीय रसशास्त्रातील संकल्पना असून ती आकळली तर गाणं परब्रह्मस्वरूप होणारं हे त्या सातत्यानं सांगत होत्या. त्या सांगण्यातील असोशी त्यांच्या शब्द आणि स्वरांतून जाणवत होती. संगीतातील खूप मुलभूत गोष्टी त्या सहज सांगत होत्या.

प्रत्येक रागाला एक मूल स्वर असतो. जे सांगायचे त्याची कल्पना त्यातून येऊ शकते. पण तो स्वर, म्हणजे सांगणे नव्हे. जे सांगायचं ते साकारण्यासाठी साधना लागते. प्रत्येक सुराचं एक कॅरेक्टर असतं, ते बदलत नाही. गंधार कधी मध्यम नाही होऊ शकतं. गंधार हा करुण आहे. करुण म्हणजे रडणं नव्हे. या करुणेत प्रेम, वात्सल्य असं सर्व काही येतं. आजच्या पिढीतील मुलांना हे शिकवलं पाहिजे, त्या सांगत होत्या.

करुणेची नानाविधं रूप किशोरीताईंनी या मुलाखतीत उलगडली. त्या म्हणाल्या, कुत्रं मेलं, म्हणून दुःखी असलेला साधकगायक गुरूकडे जातो. आज मन नाही रमत आहे, असं सांगतो. त्यावर गुरू म्हणतो. तो गेला, मग तू स्वतः काय करणांर? ते तर व्हायचंच होतं. साधकाने हेलावून जाऊ नये. संत रडत नाहीत कारण या जगात येणारा केव्हा ना केव्हा जाणारच, याच ज्ञान त्यांना झालेलं असतं. हे ज्ञान म्हणजे देखील करुणाच.

करुणेची ही असंख्य रूपं गुरू आणि कुशल शिक्षकाच्या भूमिकेतून किशोरीताईंनी लोकप्रभाच्या वाचकांसाठी उलगडली. प्रत्येक रागाचा एक महत्त्वाचा सूर असतो. तो करुणातला कोणता रंग दाखवतो आहे हे साधक गायकाला ओळखता यावं लागतं. त्यासाठी साधना महत्त्वाची असते, असे त्या म्हणाल्या. सूर सातच नव्हे असंख्य असतात त्यांना आपण श्रूती म्हणतो. गंधाराचा संवादी निषाद असतो. निषाद आला की गंधार सांगतो तेच जे सांगायचं असतं, पण वेगळ्या पद्धतीने. आपल्या संगीतात वर्णन नाही. गुलाबाची अनुभूती आल्यानंतर मनाची जी अवस्था होते, ती सूर सांगतो.

रागाची मांडणी स्पष्ट करताना किशोरीताईंनी लग्नाच्या स्वागत समारंभाचे उदाहरण दिलं. महत्त्वाची वधू असते पण मी तिची आजी विविध नाती सांभाळते. येणाऱ्या प्रत्येकाशी संवाद साधते. त्यात नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात, मंत्रीसंत्री असतात. व्यक्ती एकच असतं. पण तिचे प्रत्येकाशी असलेले संबंध वेगवेगळे असतात व प्रतिक्रियाही वेगळी असते. ती व्यक्ती त्यावेळेस तिचं कर्तव्य बजावत असते. ते कर्तव्य म्हणजेच संगीताचं शास्त्र. गोष्टी सोप्या करून सांगण्याची किशोरीताईंची हातोटी विलक्षण होती आणि त्याचा प्रत्यय या मुलाखतीमध्ये क्षणोक्षणी येत होता. फक्त शास्त्रीय संगीत कळणाऱ्यांनाच नव्हे तर तुझ्या सामान्य वाचकालाही कळेल असं बोलेन असा शब्द किशोरीताईंनी दिला होता, तो त्यांनी काटेकोरपणे पाळला!

करुणेचंच एक रूप सत्य हे असतं हे सांगताना किशोरीताईंनी मधू मागशी माझ्या सख्यापरी या कवितेचं उदाहरण दिले. त्या म्हणाल्या संध्याछाया भिवविती हृदया या ओळींमध्ये दिसतं, जाणवतं ते दुःख नाही तर ती सत्याची प्रचिती असते.

किशोराताई म्हणाल्या होत्या, जे अनुभवसिद्ध सांगायचं आहे त्याच्याशी एकरूप झालं की परब्रह्मापर्यंत पोहोचता येतं. अशी परब्रह्म्याची अनुभूती किशोरीताईंनी रसिकांना आजवर अनेकदा दिली आहे. अलीकडे पुण्यात झालेल्या मैफिलीत गायलेल्या बहादुरी तोडीवर त्या बेहद्द आनंदी होत्या. त्याचा उल्लेख करतानाही तो आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. त्या म्हणाल्या, अनेकदा गायल्यानंतरही मोकळं वाटत नव्हतं. फ्रीडम जाणवत नव्हतं. मग मी त्या बहादुरीलाच शरण गेले आणि विनवणी केली… किती गं तू मायाळू. मग मी माध्यम झाले आणि तिने माझ्याकडून तिला गावून घेतले. संगीत ही अमृताची पूजा असते, ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेली. तिला करुणेचा स्पर्श झाला की, ती परब्रह्माप्रत घेऊन जाते.

अगदी गेल्याच आठवड्यात एक प्रश्न मनात आला आणि किशोरीताईंना फोन केला. बुद्धाची बोधिप्राप्ती, ज्ञानप्राप्ती म्हणजेच निर्वाण. तुम्ही म्हणताय करुणा म्हणजे ज्ञान सर्वप्रकारचं. मग बुद्धाची करुणा, ज्ञानदेवांनी सांगितलेली करुणा आणि निर्वाण सारं एकचं ना. त्यावर त्या म्हणाल्या, हा खूप महत्त्वाचा विषय आहे, बोलूया. आता ते बोलणं अधुरचं असणार. पण त्या मागचं महत्त्वाचं तत्त्व त्या सांगून गेल्या.

एरवी कोणत्याही कार्यक्रमात थोडी हालचाल झाली, किंवा कॅमेऱ्याचे फ्लॅश उडाले की, समाधीभंग होऊन अस्वस्थ होणाऱ्या किशोरीताईंनी संपूर्ण मुलाखतीदरम्यान गणेश शिर्सेकर या आमच्या छायाचित्रकाराचे फ्लॅश सहन केले, बिलकुल चिडल्या नाहीत. उलट मुलाखतीदरम्यान आलेली शेगावची कचोरी खाल्ली नाही म्हणून आईच्या मायेने त्याच्यावर रागावल्या. अर्थात गणेशनेही त्यांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने चित्रण केलं. त्यांची ही मुलाखतदेखील परब्रह्मस्वरूपाचा आनंद देणारीच ठरली. लोकप्रभा व लोकप्रभाचे रसिक वाचक कायम त्यांच्या ऋणात राहतील.

या मर्त्य भूलोकांत रसिकांना त्या सत्याप्रत नेऊन त्याची प्रचिती देणाऱ्या परब्रह्मस्वरूपिणि किशोरीताईंना भावपूर्ण आदरांजली!

vinayak-signature
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com
@vinayakparab