विशेष मथितार्थ
विनायक परब – twitter – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

चांद्रयान-दोनच्या यशापयशाच्या चर्चाना सध्या देशभरात ऊत आला आहे. आपल्याकडे हे असेच होते. एखादी गोष्ट किंवा मुद्दा चर्चेत आला की, सर्व देशवासीय त्यावर लागलीच व्यक्त होऊ लागतात. एक तर प्रत्येक गोष्टीवर व्यक्त झाल्यानंतर आपल्याला देशकर्तव्यच पार पाडल्यासारखे वाटते आणि आपण प्रत्येक गोष्टीत अधिकाराने व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टींशी आपला फारसा संबंध नाही त्या गोष्टी तरी त्या क्षेत्रातील व्यक्तींपुरत्या सोडून द्याव्यात. चांद्रयान-दोनचे यश इस्रो म्हणते तसे ९५ टक्के यशस्वी असे आहे की, आपल्याला विक्रम व्यवस्थित उतरवण्यात अपयश आले म्हणून त्याला अपयश म्हणायचे यावर घनघोर चर्चा सुरू आहे. सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे की, हा विज्ञानाचा प्रांत आहे, इथे प्रयोग होत असतात. लौकिकार्थाने यशापयशात मूल्यमापन इथे होत नाही. प्रयोगातून शिकणे आणि पुढे जाणे असते. याहीशिवाय महत्त्वाच्या असतात त्या प्रयोग करताना अनाहूतपणे हाती आलेल्या गोष्टी. त्यांचे मोल हे अनेकदा प्रयोगाच्या लौकिक उद्दिष्टांपेक्षाही खूप मोठे असते.

उपग्रह तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधील प्रयोगांनी आज आपले आयुष्य व्यापले आहे आणि त्याची साधी कल्पनाही आपल्यापैकी अनेकांना नाही. सकाळी उठून वापरल्या जाणाऱ्या टुथब्रशपासून ते रात्रीच्या झोपेपर्यंत आपण वापरत असलेल्या ८५ टक्क्यांहून अधिक गोष्टी या उपग्रह तंत्रज्ञानातून आलेल्या आहेत. मोबाइल, वॉशिंग मशीन त्याचप्रमाणे मोबाइलमध्ये वापरले जाणारे ब्लूटूथ हे सारेच्या सारे उपग्रह तंत्रज्ञानामधून आले आहे. यांना स्पिनऑफ तंत्रज्ञान असे म्हटले जाते. वैज्ञानिक प्रयोगांनी आणि खास करून अंतराळविज्ञानाने आपले जीवन सुखकर केले आहे. अनेकदा असाही प्रश्न केला जातो की, वाडा, जव्हार-मोखाडय़ात कुपोषण सुरू असताना काहीशे कोटी रुपये या उपग्रह तंत्रज्ञानावर खर्च करावेत का? त्याचे उत्तर म्हणजे स्पिनऑफ तंत्रज्ञानामधून हाती आलेल्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. पूर्वी आपल्याकडे आगीत होरपळलेल्या व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण खूप मोठे होते. मात्र उपग्रह तंत्रज्ञानाच्या एका अपयशी प्रयोगामधून एक विशिष्ट प्रकारचा फोम तंत्रज्ञांच्या हाती आला आणि असे लक्षात आले की, त्याचा वापर भाजलेल्या जखमांवर होऊ शकतो. भाजलेल्या जखमांमधून जंतुसंसर्ग खूप वेगात होण्याची आणि जखमा चिघळण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे जखम उघडी राहणे हे जंतुसंसर्गासाठी अतिशय धोकादायक असते. आणि ती जखम बंद केली की, चिघळण्याची शक्यता असते. त्यामुळे ती बंदही करता येत नाही. चिघळल्यामुळे किंवा मग जंतुसंसर्गामुळे प्राण गमावण्याची खेप आलेल्या भारतीयांची संख्या खूप मोठी होती. मात्र भारतीय तंत्रज्ञांना आलेल्या एका अपयशी प्रयोगामधून एक विशिष्ट प्रकारचा फोम हाती आला आणि संशोधकांना असे लक्षात आले की, त्याचा वापर भाजलेल्या – होरपळलेल्या त्वचेवर करता येऊ शकतो. त्यामुळे जखम झाकली जाते मात्र तो फोम त्वचेला चिकट नाही. त्यामुळे जखमेचे रक्षण जंतुसंसर्गापासून होते आणि आतमध्ये जखम वेगात बरी होण्यास मदत होते. त्या फोमचा उपयोग भाजलेल्या जखमा झालेल्या व्यक्तींच्या उपचारांसाठी यशस्वीरीत्या करण्यात आला. शेकडोंचे प्राण तर वाचलेच मात्र त्याचवेळेस इतर देशांनाही भारताचा हा प्रयोग लक्षात आल्यानंतर त्यांनी भारताकडून हा फोम, त्याचे तंत्रज्ञान घेतले आणि भारताला परकीय चलनही मिळाले. आता ज्या मूळ प्रयोगामध्ये अपयश आले त्या प्रयोगाला अपयशी म्हणणार की, तरीही यशस्वी? मुद्दा असा की, विज्ञान हे अशा प्रकारे प्रयोगांचे क्षेत्र आहे. इथे यश-अपयश असे नसते. त्यातून शिकणे आणि त्यातून हाती आलेल्या गोष्टींतून, मुद्दय़ांतून पुढे जाणे असते. त्यामुळे विज्ञानाच्या क्षेत्राला इतर क्षेत्रांच्या यशापयशाची परिमाणे लावताना पूर्ण विचार करणे आवश्यक असते. अंतराळाच्या क्षेत्रासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या सैनिकांसाठी सीमारेषेवरही करत असतो. मात्र यातील प्रत्येक बाब आपल्यासमोर येत नाही एवढेच.

चांद्रयान-दोनसंदर्भात आणखीही एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण चांद्रयान-एक मोहिमेतील एक महत्त्वाची बाब समजून घ्यायला हवी. चांद्रयान-एकच्याही बाबतीत असेच झाले होते. सुमारे १० महिन्यांनंतर त्याच्याशी असलेला संपर्क संपुष्टात आला. मात्र तोवर महत्त्वाचे कार्य चांद्रयान-एकने पार पाडलेले होते. मात्र त्याचे निकाल हाती येण्यासाठी आपल्याला बराच काळ जावा लागला. कारण  चांद्रयान-एकवर असलेल्या यंत्रणा त्याच्या चंद्रभ्रमणादरम्यान सातत्याने गोळा केलेली माहिती पृथ्वीवर पाठवत होत्या. त्यातील एका माहितीचे विश्लेषण करताना भारतीय आणि नासाच्या संशोधकांना एका विवरामध्ये खोलवर बर्फाच्या स्वरूपामध्ये पाण्याचे अस्तित्व सापडले. जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी पाणी असणे हे सर्वात महत्त्वाचे होते. या २१व्या शतकामध्ये यापुढच्या काळात आणखी कितीही महत्त्वाचे शोध लागले तरी या शतकाच्या पूर्वार्धाच्या काळात चंद्रावर सापडलेले पाण्याचे अस्तित्व हा शोध ‘शतकातील महत्त्वाचा’च असणार आहे. मात्र तो जगासमोर येण्यासाठी माहितीवर शास्त्रीय प्रक्रिया करावी लागली आणि त्यासाठी एखाद्या गोष्टीचे अस्तित्व वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करण्यासाठी जो कालावधी लागतो, तो द्यावाच लागला. त्यामुळे चांद्रयानाचा संपर्क तुटल्याने पुढचे काम पृथ्वीपर्यंत पोहोचलेच नाही तरीही ती मोहीम अयशस्वी ठरली, असे म्हणता येत नाही. कारण चांद्रयान-एकने या शतकावर आपला ठसा निर्विवाद उमटवला.

याच उदाहरणातून दोन महत्त्वाच्या बाबी आपल्या लक्षात येतील. आजवर संशोधकांना पाण्याचे अस्तित्व का सापडले नव्हते? कारण आजवर पाठवलेल्या उपग्रहांच्या कॅमेऱ्यामध्ये खोल विवराच्या आतमधील चित्रण करण्याची क्षमता असलेले कॅमेरे नव्हते. अशा प्रकारच्या कॅमेऱ्याची निर्मिती हे महत्त्वाचे यश होते. त्याचा समावेश स्पिनऑफ तंत्रज्ञानामध्ये होतो. आता त्यासाठी वापरलेले दूरसंवेदक (सेन्सर्स) आणि कॅमेरा यांचा वापर आपल्याला त्यानंतर जगभरात विविध ठिकाणी होताना दिसतो आहे. महत्त्वाचे म्हणजे चांद्रयान-एकशी संपर्क तुटल्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर नासाच्या यानाने ते अद्यापही चंद्रभ्रमण करत असल्याचे पुरावे जाहीर केले. भविष्यात तंत्रज्ञान प्रगत झाले आणि पुन्हा त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यात यश आले तर? मुद्दा असा की त्यामुळे वैज्ञानिक यश हे ढोबळ यशापयशाच्या संकल्पनांच्या खूप पलीकडे असते.

भारतासारखा देश चांद्रयान- एक किंवा चांद्रयान- दोन सारखा अतिमहत्त्वाकांक्षी असा प्रकल्प हाती घेतो त्या वेळेस आणखीही एक महत्त्वाची गोष्ट त्यात सामावलेली असते. नासामधील संशोधकांसारखीच अतिशय उत्तम बुद्धिमत्ता असलेली अनेक संशोधक मंडळी आपल्याकडेही काम करत असतात. त्यांना आपण त्यांच्या योग्यतेएवढे वेतन किंवा सोयीसुविधा भारतात देऊ शकत नाही. मात्र तरीही कधी देशप्रेमाखातर ही मंडळी इथे राहतात. त्यांना आपल्याला आव्हानात्मक असे काम देता आले नाही तर मग ही मंडळी इतरत्र निघून जातात. चांद्रयान-एक आणि दोन हे दोन्ही आपले अतिमहत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत, वैज्ञानिकांच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणारे. कमीतकमी खर्चात सर्वोत्तम तंत्रज्ञानाची निर्मिती करणे हे नासाच्या वैज्ञानिकांनी भारतीयांकडून शिकावे, अशी टिप्पणीही नासाचे प्रमुख म्हणूनच जाहीररीत्या करतात.

विज्ञानाची झेप खूप मोठी आणि लांब पल्ल्याची असते. एखादी वैज्ञानिक घटना घडते त्या वेळेस म्हणूनच यश किंवा अपयश असे त्याचे वर्गीकरण करता येत नाही. राइट बंधूंनी जगातील पहिले विमान तयार केले. मात्र ते केवळ नऊ सेकंदांसाठीच उडले. अनेकांनी त्याचे वर्णन अयशस्वी प्रयोग, असे केले. मात्र त्यानंतर मानवाने उपग्रह अंतराळात पाठवणे, युरी गागरीन या पहिल्या मानवाचे अंतराळ जाणे आणि नील आर्मस्ट्राँग व बझ आल्ड्रीन यांनी चंद्रावर ठेवलेले पाऊल या साऱ्याची ती सुरुवात होती.. ते नऊ सेकंद ! तेच नऊ सेकंद नंतर माणसाला थेट चंद्रावर घेऊन गेले. त्यांनी अवकाश मानवासाठी खुले केले!