News Flash

गनिमाशिवाय..

अवघ्या ४०-५० हजारांमध्ये मिळणाऱ्या ड्रोनच्या हल्ल्यात आपण काहीशे कोटींचे लढाऊ विमान गमावले असते.

image credit : PTI

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

रविवार, २७ जून २०२१ जम्मू येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर पहाटेच्या सुमारास प्रत्येकी पाच किलो स्फोटकांसह दोन ड्रोन हल्ले झाले आणि सैन्यदलांची झोप उडाली. खरे तर यात नवीन किंवा अनपेक्षित काहीच नव्हते. कारण गेली चार वर्षे नौदल, हवाई दल आणि पायदळाशी संबंधित सामरिक तज्ज्ञ याचा इशारा सातत्याने देत होते. प्रश्न एवढाच होता की, आपल्याकडील हल्ला केव्हा होणार? छुपे युद्ध तर आहेच पण हा गनिमी कावा असल्याचाही उल्लेख या निमित्ताने झाला. महत्त्वाचे हे की, यात गनिम दिसत नाही तो अदृश्य आहे. एवढेच काय तर ड्रोन हे आकाराने एवढे लहान असते, शिवाय ते कमी उंचीवरून उडते की, अनेकदा रडार यंत्रणेच्या कक्षेतही येत नाही. आलेच तर मोठा पक्षी आहे असेच वाटते आणि ड्रोन आहे, याची जाणीव होईपर्यंत ते जवळही पोहोचलेले असते. ही अदृश्य भीती आहे. जम्मूच्या हल्ल्यात आपले फार नुकसान झालेले नसले तरी भविष्यात काय होऊ शकते याची चुणूक नक्कीच पाहायला मिळाली आहे. हा हल्ला अनेक अर्थानी सामरिकशास्त्रात आपल्याकडील नवे पर्वच म्हणावा लागेल. कारण आजवर केवळ छुप्या राहिलेल्या युद्धाला आता अदृश्य गनिमाचे परिमाण लाभले आहे ते शत्रूच्या दृष्टीने अतिशय स्वस्त, ध्वस्त करण्याची अधिक क्षमता असलेले, मनुष्यबळ वाचविणारे आणि नेमका हल्ला घडवून आणणारे असे आहे. तर आपल्या दृष्टीने परतवून लावण्यासाठी आर्थिकदृष्टय़ा  खर्चीक, प्रयत्नांची पराकाष्ठा पाहणारे, डोळ्यात तेल घालून नजर ठेवायला लावणारे आणि आपल्यासाठी भरपूर उपद्रवमूल्य असलेले असे आहे. त्यामुळे आता युद्धातील सर्वच परिमाणे बदलली आहेत. महत्त्वाचे म्हणजे परिस्थिती समतुल्य राहिलेली नाही. दहशतवाद्यांकडे अतिशय स्वस्त आणि घुसखोरी करण्यात पटाईत, नेमका हल्ला करणारी आणि त्यांच्या बाजूने मनुष्यहानीची शक्यता शून्य असणारे तंत्रज्ञान आहे. आणि पलीकडच्या बाजूस नुकसानीची शक्यता मोठी व हल्ला परतावण्याची काठीण्यपातळी वाढविणारे असे समीकरण झाले आहे.

आजवर युद्धतंत्रामध्ये अनेकदा असे लक्षात आले आहे की, तंत्रज्ञानातील कूसबदल हा भविष्याची दिशा ठरवतो. ड्रोनहल्ला हा अशा प्रकारचा कूसबदल आहे. खरे तर याची कल्पना आपल्याला आधीच यायला हवी होती. कारण

४ ऑगस्ट २०१८ रोजी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांवर हल्ला करण्यासाठी त्याचा वापर झाला. त्या वेळेस त्याची चुणूक मिळाली होती. त्या वेळेस अचानक झालेल्या हल्ल्याने सैनिकांची अगदीच पळापळ झाली. आपल्याकडे महाकुंभसारख्या ठिकाणी असे काही झाले तर? आजवरच्या अनेक दुर्घटनांमध्ये आपल्याकडे असे लक्षात आले आहे की, चेंगराचेंगरीत मृत्यू होणाऱ्यांची संख्याच शेकडय़ांच्या घरात असते. एलफिन्स्टन रेल्वेपुलाच्या दुर्घटनेनंतर तर  रेल्वेपुलावरही चेंगराचेंगरी नको म्हणून पोलीस ठेवावे लागतात. तिथे बाकीचे काय?

आपले भाग्यच की, या हल्ल्यामध्ये आपल्या कोणत्याही लढाऊ विमानांची हानी झाली नाही. स्फोटके हवाई दलाच्या इमारतीच्या छपरावर फुटली. त्या जागी एखादे लढाऊ विमान असते तर अवघ्या ४०-५० हजारांमध्ये मिळणाऱ्या ड्रोनच्या हल्ल्यात आपण काहीशे कोटींचे लढाऊ विमान गमावले असते. एवढा हा फटका जबरदस्त असता. आता यातून घ्यावयाचा धडा घेतानाही आपल्याला वेळ दवडून चालणार नाही. दहशतवाद्यांना आता हिमालय ओलांडून येण्याची, बर्फ केव्हा वितळेल याची वाट पाहात बसण्याची आणि त्यासाठी माणसांना प्रशिक्षण देण्याची या सर्व गरजा संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वस्तातील भेदक मार्ग हाती आला आहे. त्यामुळे आता आपल्यालाच या अदृश्य भीतीविरोधात कंबर कसून उभे राहावे लागणार आहे. गरज आहे असे हल्ले परतवून लावण्यासाठी कमी खर्चीक नवोन्वेषी तंत्रज्ञानाच्या शोधाची!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2021 3:35 am

Web Title: two drones used for attack on indian air force base in jammu zws 70
Next Stories
1 देर आये..
2 लांडग्यांना चाप!
3 गोष्टी युक्तीच्या चार!
Just Now!
X