लढा देऊन- उभारून ज्या पिढीने स्वातंत्र्य मिळवलं ती बहुतांश पिढी आता अस्तंगत झाली आहे. स्वातंत्र्य मिळत असतानाच्या काळात जी पिढी जन्माला आली तीदेखील आता स्वातंत्र्यासोबतच सत्तरीत पोहोचली. स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय यावर चर्वितचर्वण करताना ‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे’ यावरही आता कुणाचे दुमत राहिलेले नाही. त्यामुळे शाळांच्या निबंधांमधूनही हा विषय आता बाद झाला आहे. आता आपण राज्यघटना, घटनातत्त्वं, लोकशाही मूल्य या परिप्रेक्ष्यामध्ये पूर्वीपेक्षाही अधिक सजगतेने नव्या विचारांच्या माध्यमातून या विषयाला भिडू पाहतोय, ही झाली जमेची बाजू. हेच या ‘लोकप्रभा-स्वातंत्र्यदिन विशेष’चे प्रयोजन आहे.

सध्या एक विरोधाभासी वास्तवही पहायला मिळते आहे. समाजमाध्यमाच्या निमित्ताने मिळालेल्या व्यक्त होण्याच्या समान संधीमुळे प्रत्येकानेच व्यक्त होण्यास सुरुवात केली असून त्यात एकमेकांच्या स्वातंत्र्याचा अधिक्षेप आणि संकोच करताना इतरांच्या स्वातंत्र्यावर थेट गदाच आणली आहे. ते करताना केवळ स्वत:च्याच स्वातंत्र्याचं भान राहिलंय, इतरांच्या नाही.

our identity is hindu say rss chief mohan bhagwat
अभिमानाने म्हणा आपण हिंदू आहोत! सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन
freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Constitution of India
संविधानभान: संविधानाचे चिरंतन मूल्य
sindhudurg district collector ordered deepak kesarkar s to deposit pistols
केसरकरांना पिस्तूल जमा करण्याचे आदेश, सावंतवाडीतील २५० परवानाधारकांपैकी केवळ १३ जणांना नोटीसा

दुसरीकडे देशभरात गेल्या ७० वर्षांत प्रत्यक्ष घराघरांमध्ये कुटुंबांमध्येही खूप मोठे बदल झाले आहेत. ते जसे भौतिक आहेत तसेच ते त्यांच्या त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनांच्या बाबतीतही आहेत. पूर्वी अनेक घरांमध्ये एकच चपलेचा किंवा चांगल्या कपडय़ांचा जोड असायचा आणि मग अनेक भावंडं आलटून पालटून गरजेनुसार त्याचा वापर करायची. तिथून सुरू झालेला आपला प्रवास तुलनेने गरिबी असलेल्या घरातही दोन चपलांचे जोडइतपत येऊन ठेपला आहे. देशात अद्याप गरिबी असली तरी प्रचंड मोठय़ा प्रमाणावर वाढलेला मध्यमवर्ग, नवमध्यमवर्ग भौतिक प्रगती सहज सांगून जातो. हा तोच नवमध्यमवर्ग आहे, ज्याला असं वाटतं की, आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळायला हवं. त्यामुळे त्यांनी भरपूर सोयीसुविधा आणि तुलनेनं अधिक स्वातंत्र्यही पुढच्या पिढीला दिलं आहे, पण मग असं असताना, ही तरुण मुलं आत्महत्येचा मार्ग स्वीकारताना का दिसताहेत? काही चुकतंय का आपलं? आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलंय असं म्हणतो त्या वेळेस आपण त्यांना नेमकं काय दिलेलं असतं? निवडीचं स्वातंत्र्य? मनासारखं आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य? हे खरं स्वातंत्र्य आहे का?

आपण त्यांना जीवन असोशीने जगायला शिकवतो का? ते खरं स्वातंत्र्य आहे. मुलं आपल्या आई-बापाकडूनच सारं काही शिकत असतात. जे अनमोल आयुष्य मिळालंय ते जपणं, त्यातील सुख-दुख- वेदनेचा स्वीकार करतानाच त्या आयुष्याचा आदर करायला शिकणं म्हणजे खरं स्वातंत्र्य होय. मुलाबाळांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांना सारं काही करू देणं म्हणजे त्यांना दिलेलं स्वातंत्र्य नव्हे, तर आहे त्या अवस्थेत आयुष्यावर प्रेम करायला शिकवणं म्हणजे खरं स्वातंत्र्य. ते अंगी बाणवायचं तर सदसद्विवेकबुद्धी सतत सोबत असावी लागते, कारण तीच निर्णयस्वातंत्र्याचा आदर करण्यास शिकवते आणि योग्य मार्गही दाखवते. आई- बाबांच्या दृष्टीने महत्त्व त्यांच्या करीअरला आहे, कामाला आहे, की आयुष्याला, हे मुलांना कृतीतून कळलं तर त्यांच्यावर आयुष्य जगण्याच्या स्वातंत्र्याचे संस्कार नकळत होतील. यंदाचा स्वातंत्र्यदिन त्यासाठी सत्कारणी लावू या. आयुष्य जगायला शिकू या, स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ या!

विनायक परब @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com