01 October 2020

News Flash

पाटय़ांची गंमतजम्मत

अशीच एका शहरात ‘डॉ. रा. त्रि. कुंभकर्ण’ अशी पाटी पाहिली. न राहवून त्यांना आत भेटायला गेलो..

खानदेशातल्या एका शहरात एके ठिकाणी एका डॉक्टरांच्या बंगल्यावर पाटी होती : ‘येथे धंदा चालत नाही.’ आश्चर्य वाटून आत जाऊन त्यांना भेटलो. तेव्हा ती पाटी लावण्याच्या कारणाचा उलगडा झाला. ते घर गावातल्या ‘तसल्या’ वस्तीच्या ऐन टोकाला होते. लोक रात्री-बेरात्री येऊन त्यांचे दार ठोठावत असत. म्हणून शेवटी त्यांना ही पाटी लावावी लागली होती.

काही दिवसांपूर्वी एका राजकीयदृष्टय़ा जागरूक शहरात (हल्ली सगळी शहरं कशानं तरी का होईना, जागरूक असतात. तिथे राहणारे नागरिक मात्र कायम झोपलेले असतात.) भर चौकात एक भलामोठा फलक लागला होता. कुठल्या तरी युवा नेत्याने (‘नेता म्हणजे जो जनतेचं सगळं नेतो!’ असा तर अर्थ या समस्त नेत्यांना अभिप्रेत नाहीये ना? काही युवा नेते तर आपल्या वडिलांनी कष्टाने घडवलेली त्यांची स्वत:ची कारकीर्दच सर्वनाशाकडे नेताना दिसतात!) आपले घर नवीन केले त्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारा मजकूर त्या फलकावर होता. त्या फलकाबद्दल आणि त्याच्या राजकीय हेतूबद्दल काहीही टीकाटिप्पणी इथे करायची नाहीए. पण या अशा मजकुराचं प्रयोजन काय, हे शोधण्यात खरी गंमत आहे.

नुसत्या पाटय़ांचीच यादी लांबवाल तितकी लांबू शकते. विशेषत: पुण्यातल्या आणि इतर शहरांतल्या पाटय़ा! त्यावर आता इतकं लिहून झालेलं आहे, की त्या मजकुरावर उद्या काही काहीजण साहित्य संमेलनांचे अध्यक्षही होऊ शकतील. काहीही न लिहिता जर काही जण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत, तर आता इतपत लेखनही अध्यक्षपदासाठी पुरेसे ठरावे. त्यात हल्ली साहित्यालाही इतके फाटे फुटले आहेत, की त्या पदासाठी लेखन हा मापदंड उरलाच नाहीये. तुम्ही कुठे राहता आणि तुमची जातजमात कोणती यावर चर्चा वजा वादविवाद होऊन असंख्य संमेलनांचे आयोजन हल्ली होऊ लागले आहे. त्यामुळे साहित्य आणि साहित्यिक व अध्यक्ष यांचे बेसुमार पीक आले आहे. त्यातले बरेचसे साहित्य वाचावेसेही वाटत नाही. मला तर आता असं वाटायला लागलंय, की या सगळ्या भाऊगर्दीत रेल्वेतल्या डब्यांमध्ये ज्या सूचना लिहिलेल्या असतात त्या लेखकालाही- प्रवास करणारा बहुजन समाज हा वाचक आहे या नात्याने- कधीतरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवायला मिळेल. हे असे होणार असेल तर मग आपण आजूबाजूला जो मजकूर झळकताना पाहतो त्यातली मजा घेतली तर? साहित्यातल्या माजलेल्या (माफ करा! ‘मानलेल्या’ असं लिहायचं होतं. पण आता खोडायला जवळ काही नाहीये, तेव्हा राहू दे!) टीकाकारांच्या दृष्टीने जरी तो सवंग मनोरंजनाचा प्रकार असला तरी वाचायला मजा येते. ‘ऑटो’ हा शब्द बऱ्याच वेळा दुकानावर ‘अ‍ॅटो’ असा लिहिलेला आपण पाहतो. हा उच्चार बरोबर आहे असं त्या लिहिणाऱ्याला वाटतं, की ज्याचं ते दुकान आहे त्याला तसा साक्षात्कार होतो?

माझ्या ओळखीचे एक प्राध्यापक भाषा शुद्धीकरण तज्ज्ञ आहेत. ते तसे आहेत हे फक्त त्यांनाच वाटते. ते काही वर्षांपूर्वी निवृत्त झाले. आता भाषेचे पुढे काय होणार, या चिंतेने त्यांची झोप उडाली. ते विचित्र वागू लागले. घरच्यांना कळेना- आता यांना नव्याने कसे सहन करायचे? बरं, तसे ते बऱ्यापैकी पैसे बाळगून होते. मुलं त्यांच्यासारखी नसल्यामुळे उत्तम नोकरी-व्यवसायात होती. वडील जवळपास नसतील तर उत्तम असं त्यांना वाटून गेलं. त्यांची बायको विविध गुणग्राहक स्पर्धेत परीक्षक म्हणून नाव कमावून होती. शिवाय ‘टाकाऊतून टिकाऊ’ छापाच्या कलाकृती झोपडपट्टीतल्या मुलांना शिकवायला ती नटूनथटून जात असे. हे सगळं बघून मी त्यांना एक युक्ती सांगितली. ‘रंगाचे डबे विकत घ्या. एक ब्रश घ्या बरोबर. आणि जिथे जिथे म्हणून तुम्हाला ‘अ‍ॅटो’ असा शब्द दिसेल तिथे जाऊन तो ‘ऑटो’ असा रंगवून टाका. भाषेची शुद्धता आता तुमच्याच हाती आहे,’ अशी एक चावीही त्यांना मारली. अत्यंत आनंदाने ते निघाले. त्याहून अधिक आनंदाने त्यांच्या घरच्यांनी त्यांना निरोप दिला. मुलाने आणि मुलीने खर्चायला भरपूर पैसेही दिले. या प्रकल्पाला सुरुवात कुठून करायची, असा प्रश्न पडला. आपला जन्म ज्या ठिकाणी झाला तिथून सुरुवात करायची असं शेवटी त्यांनी ठरवलं.

आजही ते कुठल्या तरी जिल्ह्यत दिसतात असं ऐकून आहे. त्यांच्या एका ई-मेलमध्ये त्यांनी लिहिलंय की, हे ‘ऑटो’करण आपल्याला वाटते तितके सोपे काम नाहीए. या कामासाठी सुशिक्षित माणसांचे प्रचंड पाठबळ लागेल. त्याचबरोबर या प्रकल्पाला आर्थिक मदतही मोठय़ा प्रमाणात गरजेची आहे. कारण बऱ्याच वेळा नुसता एक शब्द रंगवून घ्यायला दुकानदार तयार होत नाहीत. शेवटी सगळे दुकान रंगवून द्यावे लागते. त्याला बरेच कष्ट पडतात आणि रंगही बराच लागतो. शिवाय काही काही दुकानदार ज्यांनी ‘ऑटो’ करून घेतले होते ते पुन्हा ‘अ‍ॅटो’ करून द्या, अशी मागणी करू लागले आहेत. कारण ‘ऑटो’ या शब्दाने त्यांच्या गिऱ्हाईकांना वाटतंय की, हे आता पूर्वीचे दुकान राहिलेले नाही.. इथे काहीतरी वेगळेच विकले जातेय.

अशीच एका शहरात ‘डॉ. रा. त्रि. कुंभकर्ण’ अशी पाटी पाहिली. न राहवून त्यांना आत भेटायला गेलो.. त्यांच्या नावाचा उलगडा व्हावा म्हणून! डॉक्टर फारच दिलखुलास होते. त्यांनी हसत हसत खुलासा केला. म्हणाले, ‘‘आडनाव माझ्या हातात नव्हतं. वडिलांचं नावही मी ठेवायचा प्रश्न नव्हता. आता माझे नाव ठेवताना  त्यांनी विचार करायला हवा होता.’’

‘हिटलर सोनावणे’ असं नाव एका वकिलाच्या पाटीवर वाचलं तेव्हा त्याबद्दल विचारायलाही मी गेलो नाही. एकदा असाच एक माणूस भेटायला आला. ‘मला सिनेसंगीताची अत्यंत आवड आहे. पण मी एक वेगळाच प्रकार शोधून काढलाय,’ असं म्हणाला. येऊन त्याने आपलं कार्ड दिलं. त्यावर लिहिलं होतं- ‘वेगळ्या गाण्यांचा जनक’! ‘म्हणजे काय?’ असं विचारल्यावर तो एकदम गायलाच लागला. ‘रामे नवजी राको जगका..’ असे त्याच्या गाण्याचे शब्द होते. चाल मला ओळखीची वाटली. संपूर्ण गाणं त्याने म्हणून एकदाचं संपवलं आणि मला म्हणाला, ‘अशी चारशे गाणी आहेत माझ्याकडे.’ ‘अशी म्हणजे कशी?’ या प्रश्नावर तो म्हणाला, ‘मी गाणी उलटी म्हणतो. आत्ता ऐकलंत ते ‘मेरा जीवन कोरा कागज..’ हे गाणं होतं. माझ्या या उलट गाण्यांचे कार्यक्रम तुम्ही गावोगावी ठेवा आणि बक्कळ पसा कमवा.’ त्याने अत्यंत विश्वासाने माझ्यापुढे प्रस्ताव मांडला. मी अत्यंत निगरगट्ट होऊन ‘कल्पना चांगली आहे. पण याला योग्य असा दिग्दर्शक पाहिजे,’ असे सांगितले. त्याने ‘कोण हा कार्यक्रम बसवून देईल?’ असा पुढचा प्रश्न टाकला. मी त्या माणसाला चंद्रकांत कुलकर्णी आणि विजय केंकरे यांचे नंबर दिले आणि माझ्या मागचा ससेमिरा सोडवला. आता त्याने त्या दोघांना फोन केला की नाही, हे दोघांनाही विचारायची हिंमत मला आजतागायत झालेली नाही आणि होणारही नाही.

खानदेशातल्या एका शहरात एके ठिकाणी एका डॉक्टरांच्या बंगल्यावर एक पाटी होती : ‘येथे धंदा चालत नाही.’ बरं वाटलं! कारण आज डॉक्टरीचा व्यवसाय झाला आहे. पूर्वीचे हळुवार इंजेक्शन देणारे, रात्री-बेरात्री आपल्या घरी येणारे, घरच्यांना धीर देणारे, पेशंट जर लहान मूल असेल तर ते कुठच्या वर्गात आहे, त्याचा अभ्यास कसा चालला आहे याचेही ज्ञान असणारे डॉक्टर आता लोप पावलेत. अशा परिस्थितीत ‘येथे धंदा चालत नाही’ अशी ठळक पाटी दिसली. खूप बरं वाटलं. आत जाऊन त्यांना भेटलो तेव्हा त्या पाटीचा उलगडा झाला. ते घर गावातल्या ‘तसल्या’ वस्तीच्या ऐन टोकाला होते. लोक रात्री-बेरात्री येऊन त्यांचे दार ठोठावत असत. म्हणून शेवटी त्यांना ही पाटी लावावी लागली.

एकदा असाच फिरत असताना एका घरावर लिहिलेलं वाचनात आलं.. ‘दिव्य लोलकातून भविष्य पाहून मिळेल.’ मला राहवलं नाही. मी वाहनाचे पैसे चुकते केले आणि त्या घराच्या दारावर जाऊन थडकलो. आत गेलो. भविष्य पाहायचे आहे असं सांगितलं. लोलकाचा मालक घराच्या आतल्या भागात मान फिरवून ओरडला, ‘पाणी पाठवा जरा! आणि लोलक आणा!’

एक स्त्री लोलक घेऊन आली आणि  त्या माणसाला विचारती झाली, ‘जेवणार कधी?’

‘आत्ता नाही सांगता येणार.’ त्याने उत्तर दिले.

आणि मी उलट पावली त्या घराबाहेर पडलो. ज्याला स्वत:च्या जेवणाची वेळ सांगता येत नाही तो माझं भविष्य ते काय सांगणार?

कोपरगाव की नेवासे- कुठे ते आठवत नाही; पण एका सलूनमध्ये ‘अठरा रुपयांत राजेश खन्ना बनवून देऊ..’ असं लिहिलं होतं. अठरा रुपयांत? म्हणजे सुपरस्टारपद आणि शिवाय डिंपल? आत जाऊन केस कापावेत आणि राजेश खन्ना बनावं असं वाटलं. पण नाही गेलो. कारण नुकतेच केस कापले होते. मुंबईला परत आलो आणि चार महिन्यांत अमिताभ बच्चन सुपरस्टार झाला. त्यानंतर कदाचित त्या सलूनमध्ये अमिताभ बच्चन बनवून मिळत असणार. किती पशात, ते मात्र माहीत नाही. कारण तिथे जायचा योगच आजवर आलेला नाही. पण गेलो तर त्याला नक्कीच विचारेन, की अशी कुठली युक्ती आहे- ज्यामुळे इतक्या कमी पशांत तुम्ही सुपरस्टार घडवता? आणि खरंच, राजेश खन्ना तुमच्याकडे आला होता का?

‘हेकण्या! अशी हाक मारल्यास नंतर होणाऱ्या परिणामांस आम्ही जबाबदार नाही..’ अशी पाटी एका दुकानावर लिहिली होती. ती वाचली आणि बाजूच्या दुकानात चौकशी केली. पाटीवाल्या दुकानाच्या मालकाच्या डोळ्यांत थोडा दोष होता. त्या भागात अशा माणसाला ‘हेकणा’ म्हणतात.

‘हाक मारली तर परिणाम काय होतो?’ मी विचारलं.

‘‘मालक आतून बेचकीतून खडे मारतात. आणि त्यांचा नेम चांगला आहे. एक-दोन टवाळ मुलांनी चालत्या रिक्षातून अशा हाका मारल्या होत्या. रिक्षाची काच फोडली त्यांनी.’’ बाजूच्या दुकानदाराने उत्तर दिले.

एका घरावर पाटी वाचली : ‘आम्ही अमर आहोत. आत येऊ नये.’ विचारायची अजिबात घाई नाहीये मला. अमर आहेत ते.. कधीही विचारू शकतो, नाही का? नको. लवकरात लवकर विचारलं पाहिजे. कारण आपण अमर नसतो ना!

sanjaydmone21@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2018 1:01 am

Web Title: article about interesting text display on boards
Next Stories
1 रूपजी कोकणात आला त्याची गोष्ट..
2 कल्पनेतली ‘गोष्ट’
3 कथा केशवरावाची..
Just Now!
X