नियामकाच्या तांत्रिक अज्ञानाचा फटका ; आता पुनर्मूल्यांकनाची प्रतीक्षा

मुंबई विद्यापीठातील ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या गोंधळामुळे सर्वच निकाल रखडलेले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असतानाच विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागातील सुमारे १५ पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना नियामकाच्या तांत्रिक अज्ञानाचा फटका बसला आहे. नियमकाकडून गुण देण्याच्या प्रक्रियेत चूक झाल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर १ अथवा शून्य गुण दाखविले जात आहेत. आता या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यात येणार असून त्याचा निकाल येईपर्यंत त्यांना वाट पाहावी लागणार आहे. यामुळे या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार कायम राहणार आहे. मुंबई विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागातील पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात पहिल्या वर्षांत ७० पेक्षा जास्त टक्के गूण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एक गुण देण्यात आला आहे. तर काही विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात आला आहे. हा निकाल पाहून निराश झालेल्या विद्यार्थ्यांनी विभागाचे प्रमुख संतोष गीते यांच्याशी संपर्क साधला. यानंतर त्यांनी परीक्षा विभागाकडे अर्ज करून या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे अशी विनंती केली आहे. मात्र ही चूक उत्तरपत्रिकांचे नियमन करणाऱ्या नियमाकाकडून झाल्याचे सूत्रांकडून समजते.

दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे नियमन करत असताना नवीन प्रणालीतील तांत्रिक बाब लक्षात न आल्यामुळे काही चुका झाल्या आहेत. मात्र हे विद्यार्थी उत्तीर्ण असून त्यांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यात यावे अशी विनंती करणारे पत्र विभागातर्फे परीक्षा विभागाला पाठविण्यात आल्याचे गीते यांनी सांगितले.

गुणांमध्ये फेरबदल करताना चूक

संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना ६० पैकी ४५ किंवा त्याहून अधिक गुण दिलेले आहेत. पण नियमन करत असताना गुणांमध्ये फेरबदल करण्याचा पर्याय निवडताना चूक झाली आणि वाढीव १ गुणाचीच नोंद निकालपत्रिकेत झाली. यामुळे हा सर्व गोंधळ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. नियमकाच्या तांत्रिक अज्ञानामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून त्यांना आता पुनर्मूल्यांकन होऊन त्याचा निकाल येईपर्यंत वाट पाहवी लागणार आहे. तोपर्यंत त्यांच्या अनेक संधी हुकणार आहेत. परीक्षा विभागाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत वेळीच योग्य ती कार्यवाही करावी आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिक्षणतज्ज्ञांकडून होत आहे.

वाणिज्य शाखेचा निकाल जाहीर

तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर वाणिज्य शाखेच्या सहाव्या सत्राचा निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आले आहे. रविवारी रात्री उशीरा सहाव्या सत्राचा निकाल जाहीर झाला. ६५९९२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ६५.५६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सर्वोच्च अशी ‘ओ’ श्रेणी मिळवण्यात ३८४ विद्यार्थ्यांना यश आले आहे. तर सात हजार ८६८ विद्यार्थ्यांना ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. ‘ब’ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १० हजार ९६८ इतकी आहे तर ‘क’ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ११ हजार ०८५ इतकी आहे. ‘ड’  आणि ‘ई’ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे सहा हजार ९५५ आणि ६४५ इतकी आहे. या परीक्षेत १९ हजार ८९७ विद्यार्थी नापास झाले आहेत. रविवारी रात्री वाणिज्य शाखेचा पाचव्या सत्राचा तसेच विधि शाखेचा पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या सहाव्या आणि सातव्या सत्राचा निकालही जाहीर झाला आहे. आत्तापर्यंत विद्यापीठाला ४७७ पैकी ४३२ निकाल लावण्यात यश आले आहे.