अभिनेता सलमान खान ‘हिट अँड रन’ प्रकरणाची अंतिम सुनावणी सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. न्यायमूर्तींकडून निकालपत्राचे वाचन करण्यात येते आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी न्या. ए. आर. जोशी यांनी नोंदविलेल्या निरीक्षणामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. हिट अँड रन प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार हवालदार आणि सलमान खानचे तत्कालीन अंगरक्षक दिवंगत रवींद पाटील यांची साक्ष लावण्यात आलेल्या आरोपांसंदर्भातील कायद्यातील तरतुदींनुसार ग्राह्य धरता येणार नाही, असे उच्च न्यायालायने म्हटले आहे. रवींद्र पाटील यांचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला. पण मृत्यूआधी सलमानप्रकरणी न्यायालयात त्यांनी साक्ष नोंदवली होती. यामध्ये सलमान खान मद्यप्राशन करुन गाडी चालवत असल्याची माहिती पाटील यांनी दिली होती. पण, आता त्यावर न्यायालायने वेगळे निरीक्षण नोंदविले आहे.
त्याचबरोबर सलमान खानच्या गाडीचा अपघात होण्यापूर्वी टायर फुटला की अपघातानंतर फुटला, याबद्दलही न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे अपुरे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सरकारी पक्षाने टायर फुटण्याचा तांत्रिक अहवाल त्यावेळी घ्यायला हवा होता, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
हिट अँड रनप्रकरणी रवींद्र पाटील यांनी दिलेली साक्ष सरकारी पक्षाची बाजू भक्कम होण्यासाठी महत्त्वाची ठरली होती. मात्र, त्यावरच न्यायालयाने आता वेगळे निरीक्षण नोंदविले आहे. रवींद्र पाटील हे १३ वर्षांपूर्वी सलमानसोबत त्याच अपघातग्रस्त कारमध्ये होते. रवींद्र पाटील हे सलमानचे अंगरक्षक म्हणून त्या कारमध्ये होते. सलमानच्या कारने पदपथावर झोपलेल्यांना चिरडलं, त्यावेळी रवींद्र यांनीच वांद्रे पोलिसांत याबाबतची माहिती दिली होती. त्यामुळे रवींद्र हे या खटल्यातील मुख्य साक्षीदार होते.