आपल्याला ठाऊक आहे की मुंबईत गाडी चालवणं म्हणजे काय दिव्य असतं. खासकरून सकाळच्या किंवा रात्रीच्या वेळात. अशात मुंबईतली सर्वात गजबजलेली जागा म्हणजे दादर. रोज संध्याकाळी दादरच्या अनेक रस्त्यांवर गर्दी असतेच. अशात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांची मर्सिडिझ कार डबल पार्किंग करून उभी केली होती. अनेक वाहनचालकांनी गाडीच्या चालकास गाडी पुढे घेण्याची विनंती केली असता त्यांने अगदी मग्रुरीमध्ये उत्तर दिले. ‘मॅडम शॉपिंगसाठी गेल्या आहेत,’ असं सांगत या चालकाने गाडी हलवण्यास नकार दिला. चालकाने ही आडमुठी भूमिका घेतल्याने रानडे रोडवर वाहतूक कोंडी झाली.
यानंतर अनेकांनी या कारवर कारवाई होईल की नाही? असा प्रश्न सोशल मीडियावरून विचारला. त्यानंतर चुकीच्या पद्धतीने गाडी पार्क केल्याने मुंबई वाहतूक पोलिसांनी चारशे रुपयांचा दंडही चालकाला आकारला. फक्त चारशे रूपयांचा दंड आकाराल्यानेही काही जण नाराज झाले. दरम्यान जयदत्त क्षीरसागर यांच्या या कारला अनेकदा दंड आकारला गेला आहे. मात्र एकदाही वसुली झालेली नाही अशी माहिती समोर आली आहे. मुक्त पत्रकार अमोल परचुरे यांनी यासंदर्भात दुसऱ्यांदा फेसबुक पोस्ट लिहून ही बाब समोर आणली आहे. अमोल परचुरेंनी ट्विटरवर केलेल्या पोस्टवर Sneal Arnold Gomes यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. ४ मार्च २०१७ पासून मुंबई पोलिसांनी या कारवर तब्बल आठवेळा दंड आकारण्यात आला आहे. मात्र तो दंड घेण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.
pic.twitter.com/w0KQsItGtE
— Sneal Arnold Gomes (@sneal_gomes) March 29, 2019
ही मर्सिडिझ कार आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या मुलाच्या नावे म्हणजेच रोहितच्या नावे आहे असेही समजते आहे. एका लोकप्रतिनिधीकडून आणि त्याच्या मुलाकडून असे वर्तन अपेक्षित नाही. आता याबाबत सोशल मीडियावरही आवाज उठवला जात आहे. असे झाल्यावर तरी दंड वसुली होईल का? हा प्रश्न आहे, तसेच आमदाराच्या जागी एखाद्या सामान्य माणसाने अशी चूक केली असती तर त्या माणसाला दंडवसुली शिवाय सोडण्यात आले असते का? असाही प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातो आहे.