वातानुकूलित गाडीमुळे सर्वसामान्य गाडय़ांच्या फेऱ्यांवर गदा येत असल्याने मध्य रेल्वेने ठाणे ते वाशी-पनवेल या तुलनेने कमी गर्दीच्या ट्रान्स हार्बर मार्गावर आपली पहिली वातानुकूलित लोकल चालविण्याची योजना आखली आहे. डिसेंबपर्यंत ही सेवा सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे. मात्र यासाठी सामान्यांच्या फेऱ्यांना कात्री लागणार असल्याने हे नुकसान प्रथम श्रेणीचा एक डबा कमी करून भरून काढण्यात येणार आहे.
दोन वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेवर मुंबईतील पहिली वातानुकूलित लोकल सुरू करण्यात आली. ही गाडी आल्याने पश्चिम रेल्वेवरील सर्वसाधारण लोकलच्या दररोज होणाऱ्या १२ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. वातानुकूलितचे भाडे परवडत नाही आणि आधीच्या गाडीचा पर्यायही रद्द झाल्याने प्रवासी वातानुकूलित गाडीविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. वातानुकूलितच्या १२ फेऱ्यांपैकी केवळ चारच फेऱ्यांना सध्याच्या घडीला प्रवाशांकडून पूर्ण क्षमतेने प्रतिसाद आहे. पश्चिम रेल्वेचा हा अनुभव पाहता मध्य रेल्वे प्रशासनाने वेगळीच योजना आखली आहे.
मध्य रेल्वेने ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-पनवेल या तुलनेने कमी गर्दीच्या मार्गावर पहिली वातानुकूलित लोकल चालविण्याची योजना आखली आहे. सध्या ट्रान्स हार्बरवर एकूण १२ लोकलच्या २६४ फेऱ्या चालविण्यात येतात. संपूर्ण वातानुकूलित लोकलचा समावेश केल्यास पश्चिम रेल्वे प्रवाशांप्रमाणेच ट्रान्स हार्बर प्रवाशांच्याही सर्वसाधारण फेऱ्या रद्द होणार आहेत. आधीच या मार्गावर मर्यादित फेऱ्या आहेत. त्यात आहे त्या फेऱ्याही रद्द झाल्यास प्रवाशांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. म्हणून मध्य रेल्वेने आपली ‘रणनीती’ बदलली आहे.
वातानुकूलित गाडीमुळे इतर फेऱ्या कमी कराव्या लागणार आहेत. प्रवाशांचे हे नुकसान साध्या गाडय़ांमधील प्रथम श्रेणीचा एक डबा कमी करून भरून काढण्याचा विचार आहे. हा डबा सर्वसाधारण श्रेणीकरिता खुला केला जाईल.
बदल असे..
* डिसेंबरपासून ट्रान्सहार्बरवरील प्रवाशांना वातानुकूलित गाडीचा पर्यायही उपलब्ध होईल. त्याच वेळी इतर सर्वसाधारण गाडय़ांमधील प्रथम श्रेणीचा एक डबा कमी करून प्रवाशांचे नुकसान भरून काढले जाईल.
* बारा डब्यांच्या एका साध्या लोकलमध्ये प्रथम श्रेणीचे तीन आणि सामान्य नऊ डबे असतात. त्यात महिला, अपंग आणि सामान डब्यांचाही समावेश आहे.
* तीन प्रथम श्रेणीच्या डब्यांपैकी एका डब्याला सामान्य डबा केल्यास साधारणपणे ३०० प्रवाशांची सोय होईल. त्यामुळे फेऱ्या कमी झाल्या तरी सामान्य लोकलमधील प्रवासीक्षमता वाढेल.