दामूनगराला आगीने विळखा घातल्यानंतर आता येथील अडीच हजार कुटुंबांना सावरण्यासाठी हजारो मदतीचे हात सरसावले आहेत. स्वयंसेवी संस्था, राजकीय नेते आणि लोखंडवाला भागातील रहिवाशांनी पीडित कुटुंबांना अन्न, कपडे, जेवण, गरम कपडे, ब्लँकेट, घरातील गरजेच्या वस्तू पुरविण्यास सुरुवात केली आहे. पण डोक्यावर छत नसताना या वस्तूंचे काय करायचे, असा प्रश्न पीडितांसमोर ठाकला आहे. आगीची घटना घडून तीन दिवस उलटले तरी सरकारकडून पीडितांच्या राहण्याची सोय करण्यात आलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ २५ हजाराची मदत येणे अपेक्षित असताना फक्त ३,८०० रुपयांचा धनादेश देण्यात आल्याने दामूनगरवासींयाच्या मनात राग आहे.

आगीच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी पीडितांची तात्पुरती सोय जवळच्याच लोखंडवाला मैदानामध्ये करण्यात आली होती. परंतु आपल्या झोपडीवरचा ताबा जाऊ नये म्हणून ही कुटुंबे आगीने बेचिराख झालेल्या मूळच्या ठिकाणी राहात आहेत. आंघोळीच्या व शौचालयाच्या सुविधा नसल्याने आमची गैरसोय होत असल्याचे लक्ष्मी कांबळे यांनी सांगितले. रात्री वीजेची सोय नसतानाही अंधारात ही कुटुंबे येथे राहात आहेत. काही संस्थांनी मुलांसाठी मोफत वह्य़ा व पुस्तकांची सोय केल्याने ती शाळेत जाऊ लागली आहेत.
लग्न त्याच दिवशी..
येथील पाखरे कुटुंबीयांनी मुलीच्या लग्नासाठी केलेली सर्व तयारी आगीत भस्मसात झाली. लग्नासाठीचा बस्ता, दागिने, वस्तूंची राखरांगोळी झाली. परंतु येथील बौद्ध विहारात २० डिसेंबर या ठरलेल्या तारखेलाच लग्न करणार असल्याचे गौतम पाखरे यांनी सांगितले.
कपडय़ांचे ढीग
आगीने दामूनगरवासीयांची घरे बेचिराख झाल्यानंतर ठिकठिकाणाहून लोक मदतीसाठी पुढे आले. कित्येक लोकांनी पीडितग्रस्तांसाठी कपडय़ांची मदत देऊ केली, पण या मदतीतील फाटके व टाकाऊ कपडे न स्वीकारल्याने दामूनगर भागात ठिकठिकाणी कपडय़ांचे ढीग जमा झाले आहेत.
मदतीसाठी २ तास रांगेत
स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दिवसाला येथे ५००० व्यक्तींच्या जेवणाची सोय होते आहे. नव्याने संसार उभा करण्यासाठी महिला कपडे, भांडय़ांची जमवाजमव करीत आहेत. परंतु काही ठिकाणी घराच्या पंचनाम्याची पावती घेऊन दोन तास रांगेत तिष्ठत उभे राहावे लागते आहे, असे संगीता गायकवाड या महिलेने सांगितले. काहींना मदत मिळते तर काही रिकाम्या हाताने परततात.