नियतीचा फेरा मोठा विचित्र असतो याची जाणीव तितक्याच विचित्र आणि भयाण पद्धतीने त्यांच्या कुटूंबियांना, सहकलाकारांना आणि चाहत्यांना सुन्न करून गेली. पण ‘शो मस्ट गो ऑन’ हे कलाकारांचे जणू ब्रीदवाक्यच. त्यामुळेच आज आबा म्हणजेच आनंद अभ्यंकर आणि विघ्नेश म्हणजेच अक्षय पेंडसे यांच्या आठवणी मनात जागवत जड अंत:करणाने ‘मला सासू हवी’च्या टीमने चित्रीकरण सुरू केले.
एकाच मालिकेतील दोन कलाकार काहीही चूक नसताना अशा पद्धतीने अपघातात मरण पावावेत हा नियतीचा अजब फेराच म्हणावा लागेल. ते दोघे आमच्यातून निघून गेले आहेत हे मान्य करायला आमची मने अजून तयारच नाहीत. आज आम्ही मनात दु:ख असूनही चित्रीकरण सुरू केले आहे. पण त्या दोघांच्याही आठवणी सेटवर अजून जिवंत आहेत. अगदी मेकअप रूमपासून सेटपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांचे विनोद, त्यांचे हसणे सगळेसगळे आठवते आहे, अशा शब्दांत या मालिकेचे दिग्दर्शक महेश तागडे यांनी ‘लोकसत्ता’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘मला सासू हवी’ या मालिकेचा सोमवारचा भाग आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांना श्रद्धांजली वाहून सुरू झाला. पुढचा आठवडाभर त्यांच्या स्मृतींना वंदन करतच आमची मालिका सुरू होईल.
रविवारी या दोघांवरचा विशेष भाग दाखविण्याचा विचार असल्याचेही तागडे यांनी सांगितले. या दोघांच्या अशा अचानक जाण्याच्या धक्क्यातून आम्ही सावरलेलो नाही. त्यामुळे आता या दोघांची जागा कोण भरून काढणार याचाही विचार अद्याप केलेला नाही. परंतु, येत्या दोन दिवसांत निर्मात्यांशी चर्चा करून त्यानुसार निर्णय घेतला जाईल, अशी माहिती तागडे यांनी दिली.
आनंद अभ्यंकर यांचे जाणे जसे चटके लावणारे ठरले आहे तसाच नाताळच्या निमित्ताने त्यांच्यावर चित्रीत झालेला भागही प्रेक्षकांना असाच चटका लावून जाणारा ठरला आहे. या भागात सांताक्लॉजच्या रूपात येऊन आनंद वाटणाऱ्या अभ्यंकरांनाच जणू काळाने हिरावून घेतले आहे.
आनंदकाकांना आधी वाचवा!
अपघाताच्या क्षणी वाहनचालक सुरेश पाटील यांच्या मदतीने अक्षय पेंडसेची बायको दीप्ती हिने तिघांनाही बाहेर काढले. मात्र प्रसंगाचे भान राखत अक्षय तर गेलाच आहे परंतु, आनंद काकांना वाचवा असे परिचितांना दूरध्वनीवरून सांगून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न तिने केला. आपला नवरा आणि दीड वर्षांचा मुलगा प्रत्युश यांना गंभीर अवस्थेत पाहिल्यानंतरही धीरोदात्तपणे या प्रसंगाला सामोरे जात आनंद अभ्यंकरांना वाचविण्यासाठी दीप्ती पेंडसे हिने प्रयत्न केले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘अक्षय आनंदा’चा अखेरचा आविष्कार
नियतीचा फेरा मोठा विचित्र असतो याची जाणीव तितक्याच विचित्र आणि भयाण पद्धतीने त्यांच्या कुटूंबियांना, सहकलाकारांना आणि चाहत्यांना सुन्न करून गेली. पण ‘शो मस्ट गो ऑन’ हे कलाकारांचे जणू ब्रीदवाक्यच. त्यामुळेच आज आबा म्हणजेच आनंद अभ्यंकर आणि विघ्नेश म्हणजेच अक्षय पेंडसे यांच्या आठवणी मनात जागवत जड अंत:करणाने ‘मला सासू हवी’च्या टीमने चित्रीकरण सुरू केले. एकाच मालिकेतील दोन कलाकार काहीही चूक नसताना अशा पद्धतीने अपघातात मरण पावावेत हा नियतीचा अजब फेराच म्हणावा लागेल.

First published on: 26-12-2012 at 05:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay and anand last show