विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गंभीर प्रकार उघड

राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करता यावे यासाठी मुंबई विद्यापीठ इतके घायकुतीला आले आहे, की शिक्षकांबरोबरच अध्ययनाशी काडीचाही संबंध न आलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही परीक्षा विभागात उघडउघड उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी पाचारण केले जात आहे. मूल्यांकनाच्या दर्जाशीच तडजोड करणाऱ्या या गंभीर स्वरूपाच्या गैरप्रकारामुळे विद्यापीठाची प्रतिष्ठा जपली जाणार असली तरी वर्षभर जीव तोडून अभ्यास करणाऱ्या गुणी विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर मात्र पाणी पडणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ‘दूर व मुक्त अध्ययन संस्थे’त (आयडॉल) साहाय्यक संचालक (शैक्षणिक) या पदावर काम करीत असलेले संजय रत्नपारखी यांचा कुठल्याही विषयाच्या अध्ययनाशी कधीही संबंध आलेला नाही. मात्र त्यांनी २५ आणि २६ जुलैला राज्यशास्त्र एमएच्या (भाग २) विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासल्या आहेत. ‘खुद्द विद्यापीठाकडून मूल्यांकनाबाबत पत्र आल्याने संस्थेशी असलेल्या बांधिलकीपोटी आपण दोन दिवस उत्तरपत्रिका तपासल्या,’ असे स्पष्टीकरण रत्नपारखी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिले.

आपण मूल्यांकन करण्यास तयार आहोत, असे कळविल्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून रत्नपारखी यांना मूल्यांकन करण्यासाठी लॉगइन आयडीही देण्यात आला. त्यानंतर त्यांनी सलग दोन दिवस परीक्षा विभाग व आयडॉलमधील उत्तरपत्रिका मूल्यांकन केंद्रांवर हजेरी लावून उत्तरपत्रिका तपासल्या. परीक्षा विभागातील केंद्रावर सकाळी ११ ते २ आणि दुपारी ३ नंतर आयडॉलच्या केंद्रावर जाऊन रत्नपारखी यांनी उत्तरपत्रिका तपासल्याचे पुरावे ‘लोकसत्ता’च्या हाती लागले आहेत. रत्नपारखी यांनी एमएच्या ‘स्टेट पॉलिटिक्स’ या विषयाच्या उत्तरपत्रिका तपासल्याचे या पुराव्यांवरून स्पष्ट होते.

मुळात रत्नपारखी यांचे आयडॉलमधील काम प्रशासकीय स्वरूपाचे आहे. त्यांची तिथली नेमणूकच शिक्षकेतर कर्मचारी म्हणून झाली होती. त्यांनी राज्यशास्त्र या विषयात ‘पीएचडी’ केले आहे, परंतु अध्ययन कधीच केलेले नाही. सध्या त्यांच्या कामाचे स्वरूप महाविद्यालयांमधील आयडॉलच्या केंद्रांवर वर्गाचे नियोजन करणे, संदर्भ साहित्य लिहिणाऱ्यांकरिता कार्यशाळांचे आयोजन करणे या स्वरूपाचे आहे. त्यामुळे रत्नपारखी यांना मूल्यांकनाच्या कामासाठी कसे बोलावले गेले, त्यांच्या नावाला कुणी मान्यता दर्शविली, मूल्यांकनाचे काम देण्यापूर्वी त्यांचे नियुक्ती पत्र तपासले गेले नाही का, नियम धाब्यावर बसवून आणखी किती अपात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्याकडून मूल्यांकन केले जात आहेत, असे अनेक प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित होत आहेत.

राज्यपालांनी दिलेल्या ३१ जुलैच्या मुदतीत काम करण्याकरिता विद्यापीठ कुठल्या थराला जाऊन मूल्यांकनाचे काम करत आहे, हेही या गैरप्रकारामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. याआधीही उत्तरपत्रिका मूल्यांकनाकरिता दिला जाणारा युजरनेम, वन टाइम पासवर्ड (ओटीपी) काही शिक्षक दुसऱ्यांना देऊन त्यांच्याकरवी उत्तरपत्रिका तपासत असल्याचा संशय काही प्राध्यापकांनी व्यक्त करत राज्यपालांकडे तक्रार केली होती. तसेच आपल्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांकडूनही उत्तरपत्रिका तपासून घ्या, अशा प्रकारच्या सूचना विभागप्रमुखांना दिल्या जात असल्याची काही शिक्षकांची तक्रार आहे. त्यातच हा गंभीर प्रकार समोर आल्याने या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी जोर धरते आहे.

माहिती घेऊन खुलासा

मूल्यांकनाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा संचालक यांच्याकडून पात्र शिक्षकांची यादी विद्यापीठाकडे जाते. म्हणून आयडॉलच्या संचालिका अंबुजा साळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘मी सध्या शैक्षणिक कामातच खूप व्यस्त असून परीक्षा विभागाला मूल्यांकनाकरिता कुणी यादी दिली याची मला माहिती नाही. ते माझ्या कामाच्या चौकटीत बसतही नाही. तसेच माझ्याकडे ही यादी तपासण्याकरिता पुरेसा वेळही नाही,’ असे सांगून आपली जबाबदारी झटकली. परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शिक्षकांची पात्रता तपासून त्यांची मूल्यांकनाच्या कामाकरिता नियुक्ती करण्याचे काम विषयाचे प्रमुख (अधिष्ठाता) आणि संबंधित अभ्यास मंडळाचे अध्यक्ष करतात. त्यामुळे मला माहिती घेऊनच यासंबंधी खुलासा करता येईल.

शिक्षकेतर म्हणून विद्यापीठाचाच निर्वाळा

मी साहाय्यक संचालक (शैक्षणिक) या पदावर काम करत असल्याने शिक्षक या गटात मोडतो, असा दावा रत्नपारखी यांनी दोन वेळा केला होता. माझे काम शैक्षणिक स्वरूपाचे असल्याने आपल्याला शिक्षक समजण्यात यावे, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र त्यावर विद्यापीठानेच समिती नेमून त्यांचे पद शिक्षकेतर कर्मचारी म्हणूनच ग्राह्य़ धरावे, असा निर्वाळा दिला आहे, हे विशेष.

परीक्षा विभागात खुद्द विद्यापीठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. तर इतर मूल्यांकन केंद्रांवर काय परिस्थिती असेल याची कल्पनाच करायला नको. हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार असून त्याची चौकशी व्हावी.  – वैभव नरवडे, सदस्य, मुक्ता