आपलं राजकारण सुरु राहिल पण बांगड्या घातल्यासारखे शब्दप्रयोग करुन टीका करणं बंद केलं पाहिजे, असा टोला शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. तसेच अशा पद्धतीच्या टीकेसाठी तुम्ही माफी मागितली पाहिजे असंही आदित्य यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते फडणवीस

एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन फडणवीस यांनी शिवसेनेवर जाहीर भाषणामध्ये टीका केली. आझाद मैदान येथे मंगळवारी पार पडलेल्या भाजपाच्या राज्य सरकारविरोधातील आंदोलनामध्ये फडणवीस बोलत होते. “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पक्षाने बांगड्या घातल्या असतील पण आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. भाजपाला जशास तसे उत्तर कशा पद्धतीने देतात हे ठाऊक आहे. आमच्यामध्ये तेवढे सामर्थ्य आहे,” अशी टीका फडणवीस यांनी शिवसेनेवर केली होती.

आदित्य यांचा टोला

फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेच्या वृत्ताची बातमी ट्विट करत आदित्य यांनी फडणवीस यांना सुनावले आहे. ट्विटवरुन फडणवीस यांना टॅग करत आदित्य यांनी या बांगड्या घातल्या आहेत या वक्तव्याबद्दल माफी मागावी असं म्हटलं आहे. “देवेंद्र फडणवीसजी, सामान्यपणे मी टीकेला उत्तर देत नाही. मात्र या बांगड्या घातल्या आहेत टीकेबद्दल तुम्ही माफी मागायला हवी. सर्व शक्तीशाली, सामर्थ्यवान महिला बांगड्या घालतात. आपलं राजकारण सुरु राहिलं पण आपल्याला अशापद्धतीने टीका करणं बंद केलं पाहिजे. माजी मुख्यमंत्र्यांनी अशी टीका करणे अपमानास्पद वाटतं,” असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आदित्य यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी आदित्य यांची मागणी योग्य असल्याचं म्हटलं आहे तर काहींनी सामानामधून कशापद्धतीचे टीका होते याकडे आदित्य यांचे लक्ष वेधलं आहे.