27 September 2020

News Flash

‘आयना का बायना’, वाद काही मिटे ना!

‘पिपाणी’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी अनेकांचे मानधन थकवल्याची बातमी ताजी असताना आता ‘आयना का बायना’ या नवीन चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांनी आपली

| December 8, 2012 04:51 am

* संवाद लेखनाचे श्रेय चौघांच्या वाटय़ाला
* फसवणूक झाल्याचा सचिन दरेकर यांचा दावा

‘पिपाणी’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी अनेकांचे मानधन थकवल्याची बातमी ताजी असताना आता ‘आयना का बायना’ या नवीन चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांनी आपली फसवणूक केल्याचा दावा चित्रपटाचे संवाद लेखक सचिन दरेकर यांनी केला
आहे.
चित्रपटाचे संवाद आपण लिहिले असून श्रेय नामावलीत मात्र आपल्याबरोबरच अन्य तिघांची नावे आहेत. याबाबत आपल्याला आधी काहीच माहिती नव्हती आणि सर्व संवाद आपल्याकडूनच लिहून घेतले जातील, असे दिग्दर्शकाने स्पष्ट केले होते, असा दावा दरेकर यांनी केला आहे. तर, दरेकर निर्थक हा वाद उकरून काढत आहेत. चित्रपटाच्या संवाद लेखनात ज्यांचा वाटा आहे, त्यांना त्याचे श्रेय देणे आपल्याला योग्य वाटले, असा पवित्रा दिग्दर्शक समित कक्कड यांनी घेतला आहे.
‘आयना का बायना’ या चित्रपटाचे संवाद पुनलेखित करण्यासाठी समित कक्कड यांनी आपल्याशी संपर्क साधला. हे संवाद आधी हेमंत एदलाबादकर यांनी लिहिले होते. मात्र आपल्याला ते बदलून हवे आहेत, असे दिग्दर्शकाने आपल्याला सांगितले. सर्व संवाद आपण लिहिणार असू, तरच आपण हा चित्रपट हातात घेऊ, असे आपण दिग्दर्शकाला सांगितल्याचे सचिन दरेकर यांनी स्पष्ट केले. त्यावेळी दिग्दर्शकाने आपल्याला त्याबाबत खात्री दिली, मात्र लेखी करार करण्याच्या आपल्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा दावाही दरेकर यांनी केला आहे.
चित्रपटाच्या संगीतध्वनिफितीच्या अनावरणाच्या वेळी श्रेय नामावलीत आपल्यासह एदलाबादकर, भालचंद्र झा आणि प्रदीप राणे यांचीही नावे होती. त्या वेळी आपण आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर दिग्दर्शकाने तात्पुरती नवीन श्रेय नामावली तयार करून आपल्याला दिलासा दिला. मात्र अखेर चित्रपटात जूनीच श्रेय नामावली वापरली गेल्याचा दावा, दरेकर यांनी केला आहे.
दिग्दर्शकाने आपल्याला अशा प्रकारच्या श्रेय नामावलीची कल्पना दिली असती, तर आपण हा चित्रपट स्वीकारलाच नसता. मात्र नंतर आपले श्रेय चौघांबरोबर वाटणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपल्याकडे लेखी करार नसल्याने आपण काही करू शकत नाही, याची आपल्याला कल्पना आहे. मात्र या क्षेत्रात अनुभव असलेल्या माझ्यासारख्या माणसाबरोबरही असे होऊ शकते,
तर नवख्यांना कोण भाव देणार, असा प्रश्नही दरेकर यांनी केला
आहे.
समित कक्कड यांनी या
आरोपाला उत्तर देताना दरेकरांनी हा सगळा वाद मुद्दाम उकरून काढल्याचे म्हटले आहे. चित्रपट एवढा चांगला चालला असताना अशा प्रकारचा निर्थक वाद उकरून काढणे दुर्दैवी आहे. आपण दरेकर यांचे कोणतेही श्रेय हिरावले नसून ज्यांनी आपल्या चित्रपटात योगदान दिले आहे, त्यांना श्रेय देऊ केल्याचे कक्कड यांनी सांगितले. तसेच कोणताही लेखी करार केला नसल्याने दरेकर अशा प्रकारचे वक्तव्य करू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.    

अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या नियमावलीप्रमाणे कोणताही चित्रपट प्रदर्शित करताना संवाद लेखकाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ असणे आवश्यक असते. मात्र बहुतांश निर्माते हे प्रमाणपत्र घेतात का, महामंडळाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मला हा वाद वाढवायचा नाही़  मात्र माझ्यावर झालेला अन्याय मांडायचा आहे. पाहिजे.
सचिन दरेकर
(संवाद लेखक)

दरेकर यांच्यावर कोणताही अन्याय झालेला नाही. मात्र ज्यांनी माझ्या चित्रपटासाठी दोन सिन लिहिले असतील, त्यांनाही श्रेय देणे आवश्यक होते. त्यामुळे माझ्या दृष्टीने या आरोपात काहीच तथ्य नाही. त्याचप्रमाणे चित्रपटाला एवढा चांगला प्रतिसाद मिळत असताना अशा नकारात्मक गोष्टींवर चर्चा करण्याची गरजही मला वाटत नाही.
समित कक्कड
(दिग्दर्शक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2012 4:51 am

Web Title: ayana ka bayna debate not solved
टॅग Debate,Entertainment
Next Stories
1 मीटर कॅलिब्रेशनला अखेर अधिकृत मुदतवाढ
2 मी जुंदाल नव्हे तर झैबुद्दीन!
3 ‘गेट वे’जवळील समुद्रात नौका आढळल्याने खळबळ
Just Now!
X