06 March 2021

News Flash

लष्कराची एक फळीच संपविण्याचा कट

हेडलीच्या साक्षीतून लष्करी महाविद्यालयावरील हल्ल्याची योजना उघड

संग्रहित छायाचित्र

सूडासाठीच हल्ला..
हेडलीच्या साक्षीतून लष्करी महाविद्यालयावरील हल्ल्याची योजना उघड
‘आयएसआय’ व ‘लष्कर-ए- तोयबा’ या दहशतवादी संघटनांप्रमाणे ‘अल कायदा’लाही भारतात हल्ले करायचे होते. तसेच भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक फळीच नष्ट करण्याच्या हेतूने दिल्लीतील राष्ट्रीय लष्करी महाविद्यालयाला या हल्ल्यासाठी लक्ष्य करण्यात आले होते, असा गौप्यस्फोट पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन दहशतवादी आणि मुंबई हल्ल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड कोलमन हेडली याने शुक्रवारी विशेष न्यायालयासमोर केला. हा हल्ला केला तर भारत-पाक युद्धापेक्षाही कैकपटीने लष्करी अधिकाऱ्यांची जीवितहानी घडविता येईल, हा त्यामागचा हेतू होता, असेही हेडलीने सांगितले.
२६/११च्या खटल्यात माफीचा साक्षीदार म्हणून विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप हे ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे हेडलीची साक्ष नोंदवत आहेत. २६/११च्या हल्ल्यानंतर पुन्हा भारतात येण्याचे कारण काय, या विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना हेडलीने हा गौप्यस्फोट केला.
अल कायदाच्या अफगाणिस्तानातील म्होरक्या इलियास काश्मिरी याने भारतात जाऊन काही ठिकाणांची पाहणी करण्यास मला सांगितले होते. दिल्लीतील राष्ट्रीय लष्करी महाविद्यालय, पुष्कर, गोवा आणि पुण्यातील ‘छाबाड हाऊस’ आदी ठिकाणांचा त्यात समावेश होता. लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची फळीच उद्ध्वस्त करण्याचा कट काश्मिरीने रचला होता.

२६/११च्या हल्ल्याच्या आधी संपूर्ण जून महिना पाकिस्तानात असल्याचे हेडलीने सांगितले. यादरम्यान मेजर इक्बाल, मेजर अब्दुल-रहमान पाशा, झकी उर रहमान लख्वी यांच्यासोबत बैठक झाली. त्यात त्यांना हल्ल्याच्या कटाच्या अंतिम तयारीची माहिती दिली.
त्या वेळेस हा हल्ल्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणांची बारकाईने पाहणी झाली पाहिजे. पाकिस्तानातील हल्ल्यांच्या सूड उगवण्याच्या दृष्टीने हा हल्ला खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळेच कुठल्याही अडथळ्याविना हा हल्ला झाला पाहिजे असेही लख्वीने सांगितल्याचे हेडलीने खुलासा केला.

परतीचा मार्ग लख्वीमुळेच बंद
१० दहशतवाद्यांसाठी दोन प्रकारचे हल्ले निश्चित करण्यात आले होते. एक हल्ला ज्यात दहशतवाद्यांनी मरेपर्यंत लढायचे, तर दुसऱ्यात हल्ला करून पलायन करायचे आणि नंतर काश्मीरमध्ये जाऊन भारतीय सैन्याशी दोन हात करायचे. परंतु यातील दुसरा हल्ल्याची निवड केली तर दहशतवाद्यांचे लढण्यापेक्षा पलायन करण्यावरच लक्ष केंद्रीत राहील. त्यामुळे त्यांनी मरेपर्यंत हल्ला करण्याचा निर्णय लख्वीने घेतला, असे अबू काहफा याने सांगितल्याचा दावा हेडलीने केला. तसेच ब्रीच कॅण्डी येथील विलास वरके याच्या ‘मोक्ष’ या व्यायामशाळेत मे २००६ ते मे २००७ या वर्षांसाठी सदस्यत्व घेतले होते. तेथेच राहुल भटशी ओळख झाली. तो महेश भट नावाच्या चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तीचा मुलगा होता एवढेच माहीत होते.

..आणि अमेरिकेने निकम यांची मागणी उडवून लावली
माफीचा साक्षीदार म्हणून हेडलीची साक्ष शनिवारच्या सुनावणीत पूर्ण केली जाईल. मात्र त्यानंतर लगेचच त्याची उलटतपासणी सुरू होईल. शनिवारच्या सुनावणीत ती संपली नाही तर रविवारी सुनावणी घेण्याची विनंती अ‍ॅड्. निकम यांनी अमेरिकेच्या अ‍ॅटर्नी सारा यांना केली. मात्र आठवडाअखेरीस कामकाज करणार नाही आणि विनंती मान्य नसल्याचे सारा यांनी थेट सांगितले. त्यावर अमेरिकेने अशा प्रकारच्या कामकाजाबाबत हमी दिलेली आहे, अशी आठवण करून देण्याचा प्रयत्न निकम यांनी केला. त्यानंतरही शनिवार-रविवारी कामकाज न करणारच नाही यावर सारा ठाम राहिल्या. अखेर निकम यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे उलटतपासणी शनिवारच्या सुनावणीत संपली नाही, तर ती मंगळवारी होण्याची शक्यता आहे.

शिवसेनाप्रमुखही लक्ष्य होते..
* दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा कट ‘एलईटी’तर्फे रचला जाऊ शकतो म्हणून शिवसेनाभवनातील उद्धव ठाकरे यांच्या जनसंपर्काची जबाबदारी पाहणारे राजाराम रेगे याच्याशी सलगी केल्याचा खुलासाही हेडली याने या वेळेस केला.
* मुंबई हल्ल्यासाठी विविध ठिकाणांची पाहणी करताना आपण दादर येथील शिवसेना भवनालाही भेट दिली होती. वास्तविक शिवसेना भवनाविषयी मलाही उत्सुकता होती.
* २००६-०७ या काळात मी ही भेट दिली. तसेच त्याचे आतून-बाहेरून चित्रीकरणही केले. मात्र भविष्यात शिवसेनाभवनवर हल्ल्याचा वा बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा कट ‘एलईटी’तर्फे रचला जाऊ शकतो, असे मला वाटले. त्यामुळेच रेगे यांच्याशी सलगी वाढवण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले.

कुटुंब सल्लागार हाफीज
दहशतवादी कारवायांचे आदेश देणारा ‘एलईटी’चा म्होरक्या हाफीज सईद हा पती-पत्नीतील वाद सोडवणाचेही काम करत असल्याचा खुलासा हेडलीने केला. पहिली पत्नी शाजिया हिने सईद याची चारवेळा भेट घेण्याबाबत अ‍ॅड्. निकम यांनी हेडलीला विचारणा केली.
त्या वेळेस मी तिला घटस्फोट देणार होतो. त्यामुळे तिने हाफीजकडे धाव घेत याबाबत तक्रार केली. तसेच तिला घटस्फोट न देण्यासाठी आणि घरी परत नेण्यासाठी मला बजावण्याची विनंती तिने त्यांच्याकडे केली होती. त्यानंतर हाफीजने मला बोलवून तिला घटस्फोट न देण्याची आणि घरी परत घेऊन जाण्यास सांगितले. मात्र ‘एलईटी’च्या कारवायांमध्ये व्यग्र असल्याचे सांगितल्यावर हाफीजने विरोध केला नसल्याचे हेडलीने स्पष्ट केले. विशेष म्हणजे २६/११च्या हल्ल्यानंतर शाजियानेच हेडलीला ई-मेल करून हल्ला यशस्वी झाल्याबाबत अभिनंदन केले होते हेही या वेळेस उघड झाले.

धागा सापडला..
* अजमल कसाबसह ज्या दहा दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला त्या सगळ्यांच्या मनगटावर लाल-पिवळा धागा बांधलेला होता.
* या धाग्याचा धागा हेडलीच्या साक्षीमध्ये शुक्रवारी सापडला. सिद्धीविनायक मंदिराची विशेष पाहणी करण्याचे आदेश ‘एलईटी’तर्फे देण्यात आली होती.
ल्लत्यामुळे मंदिराची पाहणी केल्यानंतर मंदिराच्या बाहेरील एका दुकानातून हे १५-२० लाल-पिवळ्या रंगाचे धागे खरेदी केल्याचा खुलासा हेडलीने केला. हे धागे घेण्याची कल्पना आलीच होती.
* हूद धर्मीयांमध्ये हे धागे मनगटांवर बांधतात. त्यामुळे मुंबईत दहा दहशतवाद्यांना सहजी घुसखोरी करता यावी आणि त्यांच्यावर संशय घेऊ नये यासाठी मनगटावरही हे धागे बांधण्याचे लख्वी आणि साजिद मीर यांना सुचवले होते.
* या धाग्यांमुळे ते हिंदू असल्याचे सगळ्यांना वाटेल, असेही त्यांना सांगितले. त्या दोघांनाही ते पटले. त्यामुळेच दहशतवाद्यांच्या मनगटावर लाल-पिवळ्या रंगाचे धागे बांधलेले होते, असा खुलासा हेडलीने केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2016 2:48 am

Web Title: bal thackeray national defence college on let hit list david headley
टॅग : Bal Thackeray
Next Stories
1 आठ युवा वक्त्यांची अंतिम लढत रविवारी
2 वैद्यकीय व दंत ‘सीईटी’ स्थगित
3 ‘जेंडर बजेट’च्या माथी पुरुष शौचालयांचा भार!
Just Now!
X