राज्य मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब
मुंबई : मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाचे ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नामांतर करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती शिवसेनेचे विधिमंडळ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
५५ हजार ३३५ कोटी रुपये खर्चाच्या आणि मुंबई-नागपूर या शहरांमधील ७१० किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’चा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्य़ांतील २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जातो.
या महामार्गावर २४ ठिकाणी मेगासिटी उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पातील भूसंपादनासह बहुतांश अडथळे दूर होऊन प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर या महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, तर या प्रकल्पास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली होती. त्यामुळे वाद टाळण्यासाठी फडणवीस यांनी या महामार्गाच्या नामांतराचा प्रस्ताव काही काळासाठी बाजूला ठेवला होता.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली. त्याला काँग्रेसचे नितीन राऊत आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी पाठिंबा दिला. त्यानुसार नामांतरावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून आता पुढील प्रक्रिया प्रशासन करेल आणि लवकरच या महामार्गावर बाळासाहेबांचे नाव झळकेल, असे शिंदे यांनी सांगितले.
झाले काय?
मंगळवारी ‘लोकसत्ता’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच नाराज झालेल्या भाजपने या महामार्गास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी केली होती. भाजपने आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या मार्गास डॉ. आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी केली, तर आधी महामाार्गाची बांधणी पूर्ण करा, मग नामांतराचा विचार करण्याची सूचना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. नामांतराच्या या प्रश्नावरून शिवसेनेची कोंडी करण्याची खेळी भाजप खेळत असतानाच शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला विश्वासात घेत एकाच फटक्यात या महामार्गाच्या नामांतरावर शिक्कामोर्तब केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2019 4:16 am