भिवंडीतील अजयनगर परिसरातील एका कचराकुंडीत ३५० आधार कार्ड सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने प्रशासनाने त्वरीत याची दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबत भिवंडी उपविभागीय अधिकाऱ्यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

निवडणुकांमध्ये व इतर ठिकाणी आधार कार्डचा गैरप्रकार होण्याचा मोठा धोका असतो. ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणात आधारकार्ड आढळून आल्याने हा प्रशासनाचा गलथानपणा की एखाद्या बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या टोळीचा हा प्रकार आहे, याचा तपास घेतला जात आहे. याप्रकरणी आता उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांच्याकडून चौकशी सुरु आहे.