News Flash

सफाईनंतरही नाले तुडुंब!

गेल्या वर्षी नालेसफाईमध्ये घोटाळा झाल्यामुळे यंदा नाल्याच्या सफाईकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे.

वांद्रे टर्मिनस येथील जलवाहिनीवर उभ्या असलेल्या झोपडय़ांलगतचा चमडावाडी नाला. (छाया : दिलीप कागडा)

स्थानिकांच्या बेजबाबदारपणामुळे साफ केलेल्या नाल्यांत कचऱ्याचा ढीग
दरवर्षी पावसाळा जवळ आला की, मुंबईच्या नालेसफाईचा मुद्दा पेटतो. राजकारण्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत आणि प्रशासनापासून ठेकेदारापर्यंत प्रत्येकालाच नालेसफाईचे वेध लागतात. दरवर्षी सफाईचे अनेक दावे केले जातात. त्यातले काही खरे ठरतात तर अनेक पावसाच्या पहिल्या फेरीतच वाहून जातात. या पाश्र्वभूमीवर मुंबईतील नालेसफाईचे वास्तव मांडणारी ही वृत्तमालिका..
प्रसाद रावकर / प्राजक्ता कसले, मुंबई
वांद्रे टर्मिनसजवळील इंदिरा गांधी नगरातून जाणाऱ्या भल्यामोठय़ा जलवाहिनीवरच उभ्या असलेल्या झोपडपट्टीमुळे चमडावाडी नाल्याची पार दैना झाली आहे. दहा दिवसांपूर्वी पालिकेने साफसफाई केल्यानंतरही पुन्हा हा नाला कचऱ्याने तुडुंब भरला आहे. पालिकेने तळापासून गाळ न उपसल्याचा झोपडपट्टीवासीयांचा आरोप आहे. मात्र नाल्यांमध्ये कचरा भिरकावण्याचे प्रकार थांबत नाहीत, तोवर ही परिस्थिती बदलण्याची चिन्हे नाहीत, असा पालिकेचा दावा आहे. मात्र एकंदर परिस्थिती पाहता या नाल्यामुळे इंदिरा गांधीनगर आणि आसपासचा परिसर पावसाळ्यात जलमय होण्याची शक्यता आहे.
वांद्रे टर्मिनस येथून भलीमोठी तानसा जलवाहिनी शहरात प्रवेश करते. या जलवाहिनीवरच दुतर्फा दुमजली झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. ही जलवाहिनी ठिकठिकाणी फोडून त्यातील पाण्याचा झोपडपट्टीवासीयांना अनधिकृतपणे पुरवठा केला जात आहे. पाच महिन्यांपूर्वी पालिकेने जलवाहिनीवरच्या काही झोपडय़ा हटविल्या होत्या. मात्र काही दिवसांमध्येच पुन्हा जलवाहिनीवर झोपडय़ा उभारण्यात आल्या आहेत. या झोपडपट्टीमध्ये दुकाने आणि छोटय़ा कारखान्यांचाही समावेश आहे. या जलवाहिनीला खेटूनच चमडावाडी नाला पुढे जातो. या झोपडय़ांमधील सांडपाणी याच नाल्यात सोडले जाते. तसेच काही झोपडय़ांमध्ये शौचालये बांधण्यात आली असून मलयुक्त पाणीही नाल्यातच विसर्जित केले जात आहे.
गेल्या वर्षी नालेसफाईमध्ये घोटाळा झाल्यामुळे यंदा नाल्याच्या सफाईकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. पालिका अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन दहा दिवसांपूर्वी चमडावाडी नाल्यातील कचरा उपसून बाहेर काढला होता. मात्र आजघडीला पुन्हा नाला कचऱ्याने तुडुंब भरला आहे. कपडय़ाच्या चिंध्या, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, नको असलेले लाकडी साहित्य आदी कचरा नाल्यात दिसू लागला आहे.
दहा दिवसांपूर्वी पालिकेचे कर्मचारी आले आणि त्यांनी नाल्यातील कचरा बाहेर काढला. पालिकेचे कामगार वरवरचा कचरा काढतात आणि तळाशी गाळ तसाच राहतो. पुन्हा कचरा वाहत येतो आणि तो गाळात अडकून बसतो, असा दावा काही रहिवाशांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. त्याच वेळी नाल्यात कचरा टाकण्याची सवय याला कारणीभूत असल्याचेही काही रहिवाशांनी मान्य केले.
चमडावाडी नाला हा जलवाहिनीला खेटून वाहात आहे. काही ठिकाणी जलवाहिनीला छिद्र पाडण्यात आले असून त्यातून येथील रहिवासी पाणी मिळवतात. परंतु, या छिद्रांमधून नाल्यातील दूषित पाणी जलवाहिनीत शिरल्यास जलशद्धीकरण केंद्रातून शुद्ध होऊन निघालेले पाणी अशुद्ध होण्याचा धोका आहे.

गाळ उचलण्याची गरज
दरवर्षी पावसाळ्यात धारावी परिसर जलमय करणाऱ्या धारावी मुख्य रस्त्यावरील जामा मशिदीसमोरील नाल्याची सफाई झाली आहे. तळापासून उपसलेल्या गाळाचे ढीगच्या ढीग नाल्यालगत ठेवले आहेत. हा गाळ तातडीने उचलण्याची गरज आहे. अन्यथा पाऊस सुरू झाल्यास पुन्हा हा गाळ नाल्यात वाहून जाण्याची भीती आहे. नाल्याला खेटून उभ्या असलेल्या झोपडय़ांमधील सांडपाणी आणि मलयुक्त पाणी नाल्यातच सोडण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावरील मलवाहिन्यांना झोपडपट्टय़ांतील शौचालये वाहिनीने जोडण्याची गरज आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 5:20 am

Web Title: bmc cleaned sewer at bandra terminus again waste heap
टॅग : Sewer
Next Stories
1 यांचा पत्ता: ग्रँट रोड स्थानक, फलाट क्र. १
2 ६ जूनची घटिका भरली तरी अभ्यासक्रम गुलदस्त्यात!
3 गर्भवती, अर्भकांच्या ‘सुपोषणा’ची योजना लालफितीत
Just Now!
X