भविष्यातील समीकरणांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेला इशारा

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती व्हायची असेल, तर भाजप केंद्रात आणि राज्यात शिवसेना मोठा भाऊ या जुन्या सूत्रानुसार होणे शक्य नाही. आता भाजप केंद्रात व राज्यातही मोठा भाऊ आहे, हे शिवसेनेने लक्षात घेतले, तरच युती होईल, असे परखड मतप्रदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले.

सत्तेत असल्याने यशाचे श्रेय घ्यायचे आणि अपयश आल्यास टीकेचे धनी किंवा वाटेकरी व्हायचे नाही, ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका योग्य नसल्याचा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. कृषी क्षेत्रातील आर्थिक गुंतवणूक गेल्या तीन वर्षांत तिपटीने वाढवून शेतकऱ्यांना दिलेल्या  कर्जमाफीमुळे पुढील काळात त्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण खचितच कमी होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात कोणतीही अडचण नसून बांधकाम जानेवारीत सुरू होईल, अशी ग्वाही देत कोरियन कंपनीला ८५ टक्क्यांपर्यंतही हिस्सा गुंतविण्यास परवानगी देण्याचा विचार सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या सत्ताग्रहणास ३१ ऑक्टोबरला तीन वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारच्या विविध क्षेत्रांतील कामगिरीचा विस्तृत तपशील देत अनेक मुद्दय़ांवर दिलखुलासपणे ‘मार्मिक’ विवेचन केले. ‘सातत्याने पडणारा दुष्काळ, शेतकरी आत्महत्या व अन्य अनेक आव्हाने होती. मराठा, धनगर आरक्षण, मोर्चे, शेतकऱ्यांची आंदोलने, कर्जमाफी अशा अनेक गंभीर प्रश्नांवर आम्ही यशस्वीपणे तोडगा काढला. कठीण आर्थिक परिस्थितीचा मुकाबला करीत लाखो कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प राज्यात सुरू केले. त्यातून कृषी, औद्योगिक व सर्वच क्षेत्रांतील विकासाला गती दिली,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.