मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांना काहीजण धमकावण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही सत्तेत येऊन चार वर्षे झाली, या चार वर्षात कुणीही उत्तर भारतीयांना धमकावण्याची हिंमत केली नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. मुंबईतील वाकोला येथे उत्तर भारतीयांच्या लोक महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक या सगळ्यांचीही उपस्थिती होती. याच मंचावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

आता उत्तर भारतीय हे मुंबईचेच झाले आहेत, महाराष्ट्राच्या विकासात उत्तर भारतीयांचीही महत्त्वाची भूमिका आहे असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसंच उत्तर भारतीय हे आता उत्तरप्रदेशचे नसून ते मुंबईकर आणि महाराष्ट्राचेच रहिवासी झाले आहेत असेही ते म्हटले आहे.

योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश बनवलं. मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात उत्तर प्रदेश दिवस साजरा होतो. मात्र ही पहिली वेळ आहे ज्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर आहेत. संपूर्ण देशात जशी मराठी माणसे सापडतात तसेच उत्तर भारतीयही असतात. उत्तर भारतीय समाजाला धमकावण्याचा प्रयत्न काहीजण करत होते. मात्र चार वर्षात कोणालाही धमकावण्याची हिंमत झालेली नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. आता या अप्रत्यक्ष टीकेला राज ठाकरे उत्तर देणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.