News Flash

लोकसत्ता वृत्तवेध : शिवसेना व मित्रपक्षांच्या पालकमंत्र्यांवर अंकुश!

सहपालकमंत्री नेमून दोन मंत्र्यांमध्ये वाद होईल, अशी व्यवस्था करून ठेवली आहे.

देवेंद्र फडणवीस

सहपालकमंत्री म्हणजे पायात पाय

आपल्या मंत्र्यांकडे चांगली खाती नाहीत, अशी ओरड शिवसेनेकडून केली जात असतानाच पालकमंत्र्यांच्या जबाबदारीत फेरबदल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायात पाय घालून ठेवल्याची चित्र निर्माण झाले आहे. सहपालकमंत्री नेमून दोन मंत्र्यांमध्ये वाद होईल, अशी व्यवस्था करून ठेवली आहे.

पालकमंत्रीपदाला घटनात्मक वैधता काहीच नाही. फक्त जिल्ह्य़ांचे पालकत्व मंत्र्यांनी सांभाळावे या उद्देशाने हे पद तयार करण्यात आले. पालकमंत्री म्हणजे जिल्ह्य़ाचा अनभिषिक्त सम्राट होतो. कारण शासकीय योजना, अनुदान वाटप, शासकीय समित्यांवर नियुक्त्या, निधीवाटप आदी पालकमंत्र्यांच्या हाती असते. जिल्ह्य़ातील सारी शासकीय यंत्रणा पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यावर चालते.  आधीच्या आघाडी सरकारमध्ये काही पालकमंत्र्यांची एवढी मक्तेदारी वाढली की, मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेप या मंत्र्यांना सहन होत नसे. जिल्ह्य़ाचे राजकारणावर पालकमंत्र्यांला वर्चस्व प्रस्थापित करता येते. यामुळेच पालघर या नव्या जिल्ह्य़ाची निर्मिती झाल्यावर पालकमंत्रीपद कोणाकडे ठेवायचे यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वाद झाला. आघाडी सरकारमध्ये शेवटपर्यंत या पदावर कोणाची नियुक्ती झालीच नाही.

कोणाला झटका ?

परिवहनमंत्री दिवाकर रावते हे शीघ्रकोपी म्हणून प्रसिद्ध. त्यांच्याकडील परभणी आणि नांदेड या दोन जिल्ह्य़ांची पालकमंत्रीपदे काढून घेताना आता उस्मानाबाद जिल्ह्य़ाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या जिल्ह्य़ाचे सहपालकमंत्रीपद राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्याकडे सोपविण्यात आले. दोघेही जिल्ह्य़ाच्या बाहेरील. यवतमाळ जिल्ह्य़ाचे पालकमंत्रीपद आतापर्यंत शिवसेनेचे संजय राठोड यांच्याकडे होते. त्यांना या जिल्ह्य़ाचे सहपालकमंत्रीपद म्हणजेच त्यांचे महत्त्व कमी करून भाजपच्या मदन येरावार यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले. शेजारील वाशिमच्या पालकमंत्रीपद राठोड तर सहपालकमंत्रीपद येरावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळच्या तुलनेत वाशिम अगदीच छोटा जिल्हा आहे. शिवसेनेचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्य़ाच्या सहपालकमंत्रीपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथे पालकमंत्री शिवसेनेचे विजय शिवतारे आहेत. म्हणजेच शिवसेना आणि शेतकरी संघटनेच्या दोन राज्यमंत्र्यांमध्ये अधिकारांवरून विसंवाद निर्माण होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.  माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे वर्चस्व असलेल्या जळगाव जिल्ह्य़ाच्या पालकमंत्रीपदी मंत्रिमंडळातील क्र. २ चे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची नियुक्ती करण्यामागील उद्देश स्पष्ट आहे. खडसे यांच्या कलाने जिल्ह्य़ाची यंत्रणा वाकू नये, अशी व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी केल्याचे मानले जाते.  सहपालकमंत्रीपद निर्माण करण्यामागचा उद्देश स्पष्ट झालेला नाही, पण राजकीयदृष्टय़ा अधिकारांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. यवतमाळ या भाजपकडे नव्याने आलेल्या पालकमंत्र्यांच्या जोडीला सहपालकमंत्री नेमण्यात आला आहे. उर्वरित शिवसेनेच्या ताब्यातील पालकमंत्र्यांच्या जिल्ह्य़ांमध्येच गोंधळ घालण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2016 3:08 am

Web Title: cm devendra fadnavis curb on shiv sena and allies party guardian minister
Next Stories
1 एआयसीटीई ‘धृतराष्ट्रा’च्या भूमिकेत?
2 फरारी असलेल्या दोन ‘मृत’ आरोपींना जिवंत दाखवल्याचा आरोप
3 महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष हा अखिलेश यादव यांच्या बाजुने: अबु आझमी
Just Now!
X