|| प्रसाद रावकर

मुंबई : टाळेबंदीची संधी साधून ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मोठ्या गृहसंकुलांना नोटीस बजावण्यास मुंबई महापालिकेने सुरुवात केली आहे. नोटीस बजावल्यानंतरही कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यास टाळाटाळ करणाऱ्या संकुलांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याच्या विचारात पालिका आहे.

मुंबईमध्ये दररोज साधारण नऊ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. कचऱ्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळापेक्षा अधिक जागेवर उभी असलेली गृहसंकुले आणि प्रतिदिन १०० किलो कचरा निर्माण होत असलेलेली संकुले, मॉल, हॉटेलना कचऱ्याची स्वत:च विल्हेवाट लावणे बंधनकारक करण्यात आले. पालिकेने अनेक गृहसंकुलांशी संवाद साधत ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचे विनंतीसत्र सुरू केले. त्यानंतर मुंबईतील बहुसंख्य मोठ्या गृहसंकुलांनी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीला सुरुवात केली.

मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत असलेली गृहसंकुले, मॉल, हॉटेलची संख्या ३,१२५ आहे. यापैकी १,६१९ संकुलांनी खतनिर्मितीला सुरुवात केली होती. तथापि, टाळेबंदीत १,६१९ पैकी काही सोसायट्यांमधील खतनिर्मिती बंद पडली आहे.

टाळेबंदीत खतनिर्मिती बंद

टाळेबंदीत अनेक  गृहसंकुलांनी बाहेरच्या व्यक्तींना इमारतीच्या आवारात प्रवेश बंदी केली. परिणामी, बहुसंख्य गृहसंकुलांमध्ये कचऱ्यापासून खतनिर्मिती बंद पडली आहे. टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल झाल्यानंतर मुंबईतील कचऱ्याचे प्रमाण ५,४०० मेट्रिक टनावर पोहोचले आहे. काही गृहसंकुलांनी खतनिर्मिती बंद पडल्यामुळे वाढता कचरा पालिकेला डोकेदुखी बनण्याची चिन्हे आहेत. ही बाब लक्षात घेत पालिकेने आता विभाग स्तरावरून कचऱ्यापासून खतनिर्मिती न करणाऱ्या गृहसंकुलांना  नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.