शक्य तितकेच थर रचण्याचा संकल्प

दहीहंडी उत्सवात रचल्या जाणाऱ्या उंच मानवी मनोऱ्यांवरून पडून होणारे अपघात कमी करण्यासाठी आता दहीहंडी पथकांनीच पुढाकार घेतला आहे. यावर्षी सर्व गोविंदा पथकांनी शून्य अपघाताचा निर्धार केला आहे. यासाठी जास्तीत जास्त सराव करून सरावात जेवढे शक्य होतील तेवढेच थर रचण्याचा मानस पथकांनी केला आहे.

दरवर्षी दहीहंडीदरम्यान अपघात होऊन गोविंदा तरुण जखमी होण्याचे प्रमाण वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर दहीहंडी मनोऱ्यांवर उंचीचे बंधन आणताना सुरक्षा उपायांचीही सक्ती करण्यात आली. मात्र ही सक्ती चुकीची असल्याचा गोविंदा पथकांचा दावा आहे. यासंदर्भात न्यायिक लढा सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा उच्च न्यायालयाकडे सोपवला आहे. यामुळे आता र्निबध उठवण्याच्या गोविंदा पथकांच्या आशा वाढल्या आहेत. सराव करून थर रचणाऱ्या गोविंदा पथकांच्या अपघातांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. असे असतानाही यावर्षी सर्व गोविंदा पथकांना शून्य अपघाताचा निर्धार करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष किरण पाटील यांनी सांगितले.

‘सरावामुळेच आम्ही नऊ थर रचू शकलो आहोत. यामुळे आज मुंबईत उत्सवाच्या एक ते दोन महिने आधीपासून सराव सुरू होतात. परिणामी अपघातांचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. गेल्या काही वर्षांतील अपघातांचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की बहुतांश अपघात सराव न करता किंवा मद्यधुंद अवस्थेत थर रचणाऱ्यांचे होतात. याचबरोबर बेशिस्तपणे वाहने चालवणाऱ्यांचे अपघात होतात. याचा परिणाम सराव करून शिस्तीने उत्सव साजरा करणाऱ्या गोविदांना सहन करावा लागतो,’ असे पाटील यांनी सांगितले. यामुळे यावर्षी आम्ही सर्वच गोविंदा मंडळांना जास्तीत जास्त सराव करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सरावादरम्यान जेवढे थर रचणे शक्य होतात तेवढेच थर रचावेत, असेही सांगत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.