अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र विषय बंधनकारक न ठेवण्याच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा निर्णय गुणवत्तेवर विपरित परिणाम करणारा असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी गणित आणि भौतिकशास्त्राचा सखोल अभ्यास गरजेचा असून त्यासाठी हे विषय शालेय स्तरावर अभ्यासणे अत्यावश्यकच आहेत,’ असे मत प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना व्यक्त केले. ‘एआयसीटीई’चा निर्णय हा मागे घेऊन जाणारा आणि चुकीचा असल्याची टीका संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडिओ) माजी प्रमुख आणि नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी केली आहे.

गेल्या आठवड्यात, एआयसीटीईने पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रता निकषांमध्ये बदल केला. गणित, भौतिकशास्त्र हे विषय अकरावी, बारावीच्या स्तरावर अभ्यासण्याचे बंधन शिथील करून तीन विज्ञान विषय घेऊन बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्याथ्र्यांनाही अभियांत्रिकी प्रवेशाची मुभा दिली. या निर्णयावर झालेल्या टिकेनंतर परिषदेने पात्रता निकष निश्चित करण्याची जबाबदारी राज्यांवर किंवा विद्यापीठांवर सोपवली. मात्र, नियम पूर्णपणे मागे घेतला नाही. त्यामुळे राज्यांनी स्विकारल्यास बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र न घेणाऱ्या विद्याथ्र्यांना अभियांत्रिकीला प्रवेश मिळू शकतो. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व्यवस्थेत लवचिकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे परिषदेने सांगितले.’ मात्र लवचिकतेचे हे धोरण काळजीपूर्वक हाताळण्याची आवश्यकता आहे, असे मत राघवन यांनी व्यक्त केले आहे.

‘विज्ञान-तंत्रज्ञान शाखांबाबतचा दृष्टिकोन अद्ययावत करण्याची गरज आहे. डॉक्टर्सही गणिताचा अभ्यास करतात. जीवशास्त्रात काम करायचे मग गणित का अभ्यासू अशी भूमिका नुकसान करणारी आहे. अभियांत्रिकीच्या विद्याथ्र्यांना संपूर्ण एक वर्ष गणित आणि भौतिकशास्त्राचा पाया पक्का करण्यासाठी राखून ठेवले तरच हा निर्णय योग्य ठरेल. अभियांत्रिकीचे नियमित विषय आणि गणित, भौतिकशास्त्राचे मार्गदर्शन वर्ग एकावेळी करणे शक्य नाही,’ असे  मत सारस्वत यांनी व्यक्त केले आहे.