भगवानगडाच्या पायथ्यावरून केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेले वक्तव्य दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना चांगलेच महागात पडताना दिसत आहे. महादेव जानकर यांनी अश्लाघ्य भाषा वापरून विधिमंडळ सदस्यांचा अवमान केला असून राज्यपालांकडे त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच धनगर समाजाला आरक्षणाच्या नादी लावून स्वत: मंत्रिपद उपभोगत असल्याची जहरी टीकाही त्यांनी जानकर यांच्यावर केली. जानकर हे मुख्यमंत्र्यांचे ‘लॉयल’ चमचे असल्याचा टोलाही त्यांनी या वेळी लगावला. दरम्यान, जानकरांनी केलेले वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. सोलापूर येथे एका कार्यक्रमासाठी आल्यानंतर ते बोलत होते. शाहु, फुलेंच्या महाराष्ट्राला अशी भाषा शोभत नसल्याचे ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये असेही आवाहन त्यांनी या वेळी केले. महादेव जानकर तीन दिवसानंतर या विषयावर आपली प्रतिक्रिया देणार असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिले आहे.
जानकरांनी मुख्यमंत्री व सभागृहाचा अपमान केला आहे. त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले. मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. त्यामुळे येत्या १४ तारखेला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत हा विषय मांडणार आहोत. जानकरांनी मंत्रिपदाची शपथ घेताना घेतलेल्या गोपनियतेच्या शपथेचा भंग केला आहे. त्यांना बडतर्फ करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करताना ते म्हणाले, ही विचारांची लढाई आहे. शरद पवारांनी आमच्यावर चांगले संस्कार केले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये. तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ही एकट्या राष्ट्रवादीची नसून सत्ताधाऱ्यांचीही आहे. मंत्र्याच्या तोंडातून जेव्हा शिव्यांची भाषा येते. तेव्हा जनक्षोभ बाहेर येणारच अशी पुस्तही त्यांनी जोडली. हे अविचारी मंत्र्याने केलेले अविचारी वक्तव्य असल्याचे म्हटले. आमच्या नेत्याच्या विरोधात कुणीही बोलावे आणि आम्ही गप्प बसावे असे कधीच होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.