पुढील महिन्यापर्यंत काम पूर्ण केले जाणार

मुंबईचे प्रवेशद्वार आणि ऐतिहासिक वास्तू असलेल्या गेट वे ऑफ इंडियाचे आता डिजिटल स्वरूपात जतन केले जाणार आहे. अत्याधुनिक उपकरणे, कॅमेरे वापरून त्रिमितीय स्वरूपात गेट वे ऑफ इंडियांचे कायमस्वरूपी सवंर्धन केले जाणार आहे. सिगेट टेक्नॉलॉजी आणि सायआर्क या कंपन्यामार्फत पुढच्या महिन्यापर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

एकेकाळी मुंबईचे प्रवेशद्वार असणारे गेट वे ऑफ इंडिया हे मुंबईच्या प्रमुख आकर्षणापैकी एक आहे. ऐतिहासिक ठेवा असलेल्या या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व आहे. नैसर्गिक आपत्तीने होणारी नासधूस किंवा वातावरणामुळे होणारी झीज यामुळे मूळ आकारात बदल घडतात. म्हणूनच वास्तूचे डिजिटल स्वरूपात संवर्धन करत आहे, असे सिगेट टेक्नॉलॉजी कंपनीचे आशिया विभागाचे उपाध्यक्ष रोबर्ट यांग म्हणाले.

पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाअंतर्गत असलेल्या सिगेट टेक्नोलॉजी आणि सायआर्क यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ड्रोन कॅमेरे, टेरेस्टरियल स्कॅनिंगद्वारे एरियल सव्‍‌र्हे, लेझर आणि कस्टममेड कॅमेरे आदींचा वापर केला जाणार आहे. दररोज १० तास याप्रमाणे पाच दिवस हे काम केले जाणार आहे. यावेळी ३ ते ४ हजार छायाचित्रे काढण्यात येत आहेत.

प्रत्यक्ष वास्तूवर छायाचित्रे, सर्वेक्षण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारण ४ आठवडय़ांचा वेळ लागणार आहे. त्यानंतर डिजिटली संवर्धन झाल्याने पुढील पिढीला या वास्तूचा अनुभव कधीही घेता येईल, अशी ही माहिती ख्रिस्तोपर डॅन्ज यांनी दिली.

वारा, लाटेची धडक, मिठाचे पाणी यामुळे वास्तूच्या मागच्या बाजूची झीज होत आहे. त्यामुळे या वास्तूची प्रत्यक्ष संवर्धन योजना करण्यासाठी या डिजिटली संवर्धन केलेल्या माहितीचा उपयोग होणार आहे. सिगेट आणि सायआर्क ही माहिती पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाला विनामूल्य उपलब्ध करून देणार आहेत, अशी माहिती पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांनी दिली.