लसीकरणासाठी येणारी बालके, कुटुंब नियोजनासाठी येणारी दाम्पत्ये आणि तापाच्या रुग्णांना वाऱ्यावर सोडून महिला दिनी दांडी मारून सहलीला गेलेल्या नऊ डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी पालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांना सुट्टीची बक्षिसी दिली. त्यामुळे आपले कुणीच काही बिघडवू शकत नाही अशा तोऱ्यात या डॉक्टर मिरवत आहेत.
धारावी, दादर परिसरातील नऊपैकी सात आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी महिला दिनाच्या दिवशी दांडी मारून नेरळ येथे सहलीला गेल्या होत्या. त्यांच्यासोबत प्रसवोत्तर केंद्रातीलही दोन डॉक्टर होत्या. तत्पूर्वी त्यांनी महिला दिनी सुट्टी मिळावी, अशी मागणी आरोग्य अधिकारी बडगिरे यांच्याकडे केली होती. परंतु एकाच दिवशी सर्वाना सुट्टी देता येत नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी सुट्टी नाकारली होती. त्यामुळे या डॉक्टरांनी दांडी मारून बिनधास्तपणे नेरळ गाठले. मौजमजा करून त्या सायंकाळी मुंबईत परतल्या. आणि मग या दिवसाचा खाडा होऊ नये यासाठी त्यांनी वरिष्ठांची मनधरणी केली.
या प्रकरणाची सुरुवातीला गंभीर दखल घेणाऱ्या बारगिरे यांनी आता सहा जणींना नैमित्तिक सुट्टी, तर तिघींना पर्यायी रजा मंजूर केली. महिला दिनी सामूहिक दांडी मारून नऊ डॉक्टर सहलीला गेल्याबाबत पालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. अरुण बामणे यांना विचारणा करण्यात आली होती. महिला दिनी आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर जागेवरच होते, असे डॉ. बामणे यांनी स्पष्ट केले होते. मग आता या नऊ डॉक्टरांना अचानक रजा कशी काय मंजूर करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
रुग्णांना वाऱ्यावर सोडून मौजमजा करण्यासाठी सहलीला गेलेल्या डॉक्टरांना शासन करण्यात येईल अशी आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती. परंतु अचानक या डॉक्टरांना रजा मंजूर करून प्रशासन त्यांच्या पाठिशी कसे काय उभे राहिले, असा प्रश्न पालिका वर्तुळात उपस्थित करण्यात आला आहे.