राज्यात करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची वेळ येऊ नये, यासाठी गर्दी टाळणे, मुखपट्टीचा वापर करणे, समारंभ साधेपणाने साजरे करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जनतेला केले. निर्बंध शिथिल करताना लागू असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा आदेशही त्यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला.

राज्यातील करोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांशी दूरचित्रसंवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वरिष्ठ अधिकारी आणि कृती दलाचे सदस्य उपस्थित होते. राज्यात सार्वजनिक ठिकाणी करोना नियमांचे कठोरपणे पालन होताना दिसत नाही. गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाय योजण्याची आवश्यकता व्यक्त करतानाच, आंदोलने, सभा, मिरवणुकांना परवानगी देऊ नये, असा आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुखांना दिले. राज्यात ठिकठिकाणी विवाह समारंभांमध्ये उपस्थितांच्या मर्यादेचे पालन होताना दिसत नाही. म्हणूनच विवाह समारंभांमध्ये गर्दी होणार नाही आणि उपस्थितीबाबत मार्गदर्शक नियमांचे पालन होते काही नाही, याची यंत्रणांनी खातरजमा करावी, अशी सूचनाही ठाकरे यांनी केली.

मधल्या काळात करोनाची रुग्णसंख्या घटल्याने जनतेत बेफिकिरी वाढली. त्यातूनच करोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. मुखपट्टी न वापरणे किंवा अन्य नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, असा स्पष्ट आदेशही मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिला. निर्बंध शिथिल करावेत म्हणून विविध व्यावसायिक संघटनांनी सरकारकडे नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते. या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना या आश्वासनाची आठवण करून द्यावी. विविध समारंभ, सामाजिक कार्यक्र म, पाटर्य़ा कु ठल्याही नियमांचे पालन न करता होत आहेत. त्यास आळा घालण्याच्या सूचना देण्यात आल्या. उपाहारगृहे, हॉटेल्सच्या वेळा वाढवून दिल्या, परंतु या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत नाही. या ठिकाणी प्रशासनाच्या पथकांनी भेटी देऊन कारवाई करावी, असेही अधिकाऱ्यांना बजाविण्यात आले. सभागृहे, विवाहस्थळे या ठिकाणी मुखपट्टी किं वा अन्य नियमांचे पालन होत नाही, अशा सभागृहांचा थेट परवाना रद्द करण्याची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले.

चाचण्यांची संख्या पुन्हा वाढविण्यात यावी. करोनाचा संसर्ग वाढत असलेल्या ठिकाणी एके का रुग्णामागे संपर्कातील २० व्यक्ती शोधून त्यांच्या चाचण्या कराव्यात, अशाही सूचना करण्यात आल्या. करोना नियंत्रणासाठी जिल्हा पातळीवर देण्यात आलेल्या निधीचा ३१ मार्चपर्यंत वापर करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

राज्यात ३,६६३ नवे रुग्ण

* राज्यात गेल्या २४ तासांत ३,६६३ नव्या रुग्णांची नोंद. ३९ करोनाबाधितांचा मृत्यू .

* दैनंदिन सरासरी रुग्ण – नोव्हेंबर (४,७७५), डिसेंबर (३,८९३), जानेवारी (२,९७३), १ ते १५ फेब्रुवारी (२,९२६). यापैकी १० ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सरासरी ३५८१ रुग्णांची भर.

* अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्य़ांमध्ये आठवडाभरात रुग्णवाढीचा वेग वाढला.