21 November 2019

News Flash

इजिप्तचा कांदा बाजारात; ग्राहकांची मात्र पाठ

दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून कांदा आयात

(संग्रहित छायाचित्र)

दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून कांदा आयात

पुणे : कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी इजिप्तचा कांदा आयात करण्यात आला असून पुण्याच्या मार्केटयार्डातील बाजारात इजिप्तमधील कांदा विक्रीसाठी दाखल झाला आहे. मात्र, इजिप्तच्या कांद्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. घाऊक बाजारात इजिप्तमधील कांद्याला फारशी मागणी नसल्याची परिस्थिती आहे.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात दोन दिवसांपूर्वी इजिप्तचा मुंबईमार्गे आलेला ५० टन कांदा दाखल झाला. इजिप्तच्या कांद्याला हॉटेल व्यावसायिक तसेच खानावळ चालकांकडून थोडी मागणी आहे. इजिप्तचा कांदा आकाराने मोठा असला तरी आतून पोकळ आहे. त्यामुळे या कांद्याला भाव मिळाला नाही.

घाऊक बाजारात इजिप्तच्या कांद्याला दहा किलोमागे २५० ते २८० रुपये असा भाव मिळाला आहे. २०१७ मध्ये घाऊक बाजारात इजिप्तच्या कांद्याची आवक झाली होती. त्या वेळी दहा किलो इजिप्त कांद्याला ३४० रूपये असा भाव मिळाला होता. देशांतर्गत कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी यंदा इजिप्तचा कांदा बाजारात दाखल झाला आहे. गेल्या दोन दिवसांत कांद्याची अपेक्षेएवढी  विक्री झालेली नाही तसेच या कांद्याला फारशी मागणीही नाही. या कांद्याचा आकार मोठा असून एका किलोमध्ये फक्त ४ ते ५ कांदे बसतात. ग्राहकांनी इजिप्तच्या कांद्याकडे पाठ फिरवली असल्याचे मार्केटयार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

इजिप्तमधील कांदा उत्पादकांचे नुकसान:

तीन वर्षांपूर्वी मार्केटयार्डातील घाऊक बाजारात इजिप्तमधील कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता. त्या वेळी इजिप्तमधील कांद्याला चांगले भाव मिळाले होते. यंदा मात्र इजिप्तमधील कांद्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने तेथील कांदा उत्पादकांना नुकसान सोसावे लागणार आहे.

पंधरा दिवसांत कांद्याचे दर नियंत्रणात

येथील घाऊक बाजारात जुना तसेच काही प्रमाणात नवीन कांद्याची १०० ट्रक आवक झाली. जुन्या कांद्याची खेड, जुन्नर, संगमनेर, अहमदनगर, आंबेगाव, मंचर आणि शिरूर भागातून आवक झाली. जुन्या कांद्याला दहा किलोला २६० ते ३२० रुपये असा भाव मिळाला आहे. सध्या नगर जिल्ह्य़ातील श्रीगोंदा तालुक्यातून नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. येत्या पंधरा दिवसात मोठय़ा प्रमाणावर नवीन कांद्याची आवक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कांद्याचे भाव नियंत्रणात येतील, असे घाऊक बाजारातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

First Published on October 22, 2019 12:42 am

Web Title: egyptian onion entered in pune market in for sale zws 70
Just Now!
X