News Flash

परीक्षेची औपचारिकता

विद्यापीठांकडून अहवाल सादर; आज निर्णयाची शक्यता

(संग्रहित छायाचित्र)

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील विद्यापीठांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली असून बहुतेक विद्यापीठे नावापुरत्याच परीक्षा घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे परीक्षा होणार असल्या तरी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची ‘परीक्षा’ होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यातील बहुतेक विद्यापीठांनी परीक्षांबाबतचा अहवाल शासनाला सोमवारी सादर केला. ऑनलाइन परीक्षांचा पर्याय बहुतेक विद्यापीठांनी प्राधान्याने स्वीकारला आहे. बहुपर्यायी प्रश्नपत्रिकांचा पर्याय अमरावती विद्यापीठ वगळता सर्वच विद्यापीठांनी स्वीकारला आहे. मात्र, त्यातही ५० पैकी २५ प्रश्नांचीच उत्तरे देणे, विद्यार्थ्यांना आधीच प्रश्नसंच देणे, परीक्षा घेण्याची, प्रश्नपत्रिका काढण्याची जबाबदारी पूर्णपणे महाविद्यालयांवर सोपवणे अशा पळवाटा विद्यापीठांनी काढल्या आहेत. अनेक विद्यापीठांनी २० ते ५० गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी राखीव ठेवले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या दोन वर्षांच्या परीक्षा महाविद्यालयाच्या स्तरावरच होतात आणि अंतिम वर्षांच्या परीक्षाही आता महाविद्यालयांवर सोपवत विद्यापीठाने हात झटकल्याचे दिसत आहे. त्याबाबतची नियमावली विद्यापीठाने सोमवारीही महाविद्यालयांना पाठवली नाही. अमरावती विद्यापीठाने मात्र दोन तासांच्या कालावधीची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बहुतेक विद्यापीठांनी ऑनलाइन माध्यमाला प्राधान्य दिले असले तरी गरजेनुसार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन परीक्षा देण्याची मुभा देण्याची भूमिका विद्यापीठांनी घेतली आहे. ज्या भागांतील विद्यार्थ्यांकडे इंटरनेट सेवा नाही, घरी इलेक्ट्रॉनिक उपकरणे नाहीत, तांत्रिक किं वा कौटुंबिक अडचणी आहेत अशा विद्यार्थ्यांची परीक्षा जवळच्या महाविद्यालयांत घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे विविध विद्यापीठांतील अधिकाऱ्यांनी सांगितले. विद्यापीठांनी सादर केलेल्या अहवालांवर मंगळवारी अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे उच्चशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

गैरप्रकारांबाबत विचारच नाही

विद्यार्थ्यांना घरातून ऑनलाइन परीक्षा देण्याची मुभा देताना परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी काय करणार याबाबत अनेक विद्यापीठांकडे अद्याप स्पष्ट उत्तर नाही. मात्र, विद्यार्थी एकत्र, पुस्तके  पाहून, चर्चा करून उत्तरे लिहू शकतील या सर्व शक्यतांचा विद्यापीठांनी विचार करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने प्रश्नपत्रिकांची रचना असणे आवश्यक आहे, असे मत एका माजी कुलगुरूंनी व्यक्त के ले. विद्यार्थ्यांना प्रश्नसंचही आधी द्यायचा, सरधोपट प्रश्न काढायचे, त्यातही खूप वैकल्पिक पर्याय द्यायचे आणि परीक्षे दरम्यानचे वातावरणही अनियंत्रित ठेवायचे अशा परिस्थितीत परीक्षांचे गांभीर्य राहणार, का असाही आणखी एक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

‘एसएनडीटी’ विद्यापीठाची तयारी

आमच्या बहुतेक विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षा मार्चमध्ये झाल्या होत्या. अंतिम लेखी परीक्षा ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून घेण्यात येईल. एकूण ५० गुणांची परीक्षा असेल. त्यासाठी ३० पैकी २५ प्रश्न विद्यार्थिनींनी सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील. अपवादात्मक स्थितीत काही विद्यार्थिनींना ऑनलाइन परीक्षा देणे शक्य न झाल्यास त्यांना ऑफलाइन परीक्षेचा पर्याय दिला जाईल. सर्व शाखांच्या परीक्षा १ ऑक्टोबरपासून सुरू होतील, असे कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी स्पष्ट केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

अंतिम वर्ष परीक्षांचे नियोजन सुरू आहे. परीक्षांसाठी ऑनलाइन आणि प्रत्यक्ष (ऑफलाइन) अशा दोन्ही पर्यायांचा परिस्थितीनुसार अवलंब करण्यात येईल. बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका असतील. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहेत, ते ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देऊ शकतील. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध नाहीत, ते ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देऊ शकतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या दोन्ही विद्यापीठांच्या प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान, आधीच्या सत्रातील विषय राहिलेल्या (बॅकलॉग) विद्यार्थ्यांची परीक्षा १ ते ९ ऑक्टोबर आणि अंतिम वर्षांच्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा १० ते ३१ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येईल. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवावे लागणार नाही. तर प्रयोगवहीचे (जर्नल) गुण, प्रात्यक्षिक परीक्षा किं वा तोंडी परीक्षा अशी गुणरचना करता येऊ शकते. परीक्षांच्या आयोजन प्रक्रियेत महाविद्यालयांना सहभागी करून घेतले जाणार आहे. परीक्षांबाबत चर्चा, नियोजन सुरू आहे. येत्या तीन ते चार दिवसांत संपूर्ण आराखडा निश्चित होईल.

– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या ५ ते २९ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येईल. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक येत्या दोन दिवसांत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल. महाविद्यालयांना गुगल फॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याची सूचना देण्यात आली आहे. ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येईल. ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी सुविधा उपलब्ध नसणाऱ्या विद्यार्थ्यांना अपवादात्मक परिस्थितीत ऑफलाइन परीक्षा देता येईल. परंतु त्याचे कारण विद्यार्थ्यांना गुगल फॉर्ममध्ये नमूद करावे लागेल. प्रात्यक्षिक परीक्षांसाठी कोणती पद्धत निवडावी याचा निर्णय महाविद्यालयांच्या प्राचार्यानी घ्यायचा आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

विद्वत परिषद आणि परीक्षा मंडळाच्या बैठकांनंतर नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षांची परीक्षा १ ते १८ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन घेण्याचा निर्णय झाला आहे. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून घेतली जाणार असून एकूण ५० गुणांची असेल. उर्वरित ५० गुण महाविद्यालयाच्या स्तरावर दिले जातील. एका तासात विद्यार्थ्यांना दोन गुणांचा एक प्रश्न याप्रमाणे ५० प्रश्न दिले जातील. त्यातील २५ प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी द्यायची आहेत. ज्या भाागात ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्य असेल तिथे ऑफलाइन परीक्षांची सुविधाही दिली जाणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते २५ सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन पद्धतीनेच होतील.

– डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

अभियांत्रिकी शाखा वगळता इतर सर्व शाखांची महाविद्यालयाच्या स्तरावर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयात परीक्षा देता येईल. ज्यांना त्यांच्या महाविद्यालयापर्यंत पोहोचणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील महाविद्यालयातून परीक्षा देण्याची मुभा दिली जाईल. दोन तासांच्या कालावधीत दहा पैकी तीन प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांन लिहायची आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन पद्धतीने १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अभियांत्रिकीची परीक्षा ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून घेण्यात येईल.

– डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलगुरू.

गोंडवाना विद्यापीठ

सर्व अभ्यासक्रमांची परीक्षा ऑनलाइन होणार असून ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांना पुन्हा एक संधी दिली जाणार आहे. बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून दीड तासांच्या कालावधीत (९० मिनिटे) परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांना ९० प्रश्न दिले जातील. त्यापैकी ८० प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी द्यायची आहेत. प्रत्येक प्रश्नाला एक गुण मिळणार आहे. २० गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी महाविद्यालय स्तरावर दिले जातील. प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते २५ सप्टेंबरदरम्यान ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दीड लाखाहून अधिक परीक्षार्थीची १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन परीक्षा होणार आहे. ५० गुणांची एक तासाची परीक्षा होणार असून बहुपर्यायी प्रश्नपत्रिका काढण्यात येणार आहे. कोणी विद्यार्थी परीक्षेविना राहणार नाही याची काळजी घेतली जाणार असून जवळच्या महाविद्यालयात किंवा महाराष्ट्र ज्ञान मंडळाच्या (एमकेसीएल) केंद्रातील सुविधेचा लाभ परीक्षार्थीना घेता यावा असे नियोजन करण्यात येत आहे. अगदीच आवश्यकता भासल्यास अपवादात्मक स्थितीत ऑनलाइन परीक्षा देता येत नसेल तर जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकारी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने परीक्षा घेण्यात येईल.

– डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याची तयारी विद्यापीठ करत आहे. ३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान सर्व विद्याशाखांच्या अंतिम वर्षांच्या होतील. विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय खुले ठेवण्यात आले आहेत. या परीक्षेची प्रश्नपत्रिका बहुपर्यायी स्वरूपाची असेल. या विद्यापीठात विज्ञान व अन्य शाखांच्या विद्यार्थ्यांंची प्रात्याक्षिक परीक्षा पूर्वीच घेण्यात आलेली आहे. परीक्षेच्या नियोजनासंबंधी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राचार्यांची जिल्हानिहाय बैठक मंगळवारी होणार आहे.

– प्राचार्य किशोर गंगाखेडकर, सदस्य, परीक्षा मंडळ

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. जेथे तांत्रिक अडचणी येतील तेथे ऑफलाइन परीक्षांचा पर्याय स्वीकारला जाईल. महाविद्यालयीन स्तरावर ऑफलाईन परीक्षांची व्यवस्था करण्यात येईल. परीक्षांचे नियोजन, प्रश्नपत्रिका काढणे हे विद्यापीठ स्तरावर होईल. महाविद्यालयांना स्थानिक प्रशासन, पोलीस, आरोग्य विभागाशी समन्वय साधावा लागेल. प्रात्यक्षिक परीक्षेचे मूल्यमापन मौखिक पध्दतीने ऑनलाइन होईल. विद्यार्थ्यांंना प्रत्यक्ष बोलावले जाणार नाही. त्यांना ‘पीपीटी’ किंवा तत्सम ऑनलाइन माध्यमातून सादरीकरणाचा पर्याय वापरता येईल. याबाबत शासनाला सोमवारी अहवाल सादर करण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई विद्यापीठाची तयारी

* प्रात्यक्षिक परीक्षा १५ सप्टेंबरपासून, आधीच्या सत्रातील विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा (बॅकलॉग) २५ सप्टेंबरपासून, तर नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा १ ऑक्टोबरपासून सुरू होईल.

* विद्यार्थ्यांना बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील. परीक्षा महाविद्यालयाच्या स्तरावर होतील.

* शक्यतो ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या आणि प्रश्नसंच तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:41 am

Web Title: formalities of examinations from universities most universities submit reports abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 वैद्यकीय प्रवेशातील विभागानुसार आरक्षण रद्द
2 २९ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या
3 भांडवली बाजाराच्या आगामी प्रवासाचा वेध
Just Now!
X