News Flash

चार माजी मुख्यमंत्र्यांच्या चार तऱ्हा

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असतानाच राज्याच्या चार माजी मुख्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. शरद पवार यांनी आपण लोकसभा

| October 28, 2013 01:07 am

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असतानाच राज्याच्या चार माजी मुख्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. शरद पवार यांनी आपण लोकसभा लढणार नाही हे आधीच घोषित केले तर सुशीलकुमार शिंदेसुद्धा फारसे उत्सुक नाहीत. कोणत्याही मतदारसंघात मी लढतो, असे मनोहर जोशी सांगत असतानाच अशोक चव्हाणसुद्धा दिल्लीच्या राजकारणात जाण्याच्या मनस्थितीत आहेत.
लोकसभेत जाण्यात महाराष्ट्रातील नेत्यांना फारसा रस नसतो. पक्षाने लोकसभेत पाठविले तरीही त्यांचे लक्ष राज्यातच असते. लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने कोण लढणार वा कोणाचे पार्सल जबरदस्तीने दिल्लीला पाठविले जाणार याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे दोन माजी मुख्यमंत्री सध्या केंद्रात महत्त्वाच्या पदांवर आहेत. आगामी लोकसभा निवडणूक न लढता  राज्यसभेवर जाण्याचे शरद पवार यांनी स्वत:च जाहीर केले आहे. वास्तविक २००९च्या निवडणुकीतही पवार यांनी तसे बोलून दाखविले होते, पण शेवटी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी माढामधून निवडणूक लढविली, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले होते. या वेळी मात्र लोकसभेची निवडणूक लढवायची नाही यावर पवार ठाम आहेत.
शरद पवार यांच्याप्रमाणेच सुशीलकुमार शिंदे सुद्धा लोकसभा लढण्यास उत्सुक नाहीत. तसे त्यांनी जाहीर केले असून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनाही कळविले आहे. अर्थात, पक्षाने आग्रह धरलाच तर शिंदे  सोलापूरमधून पुन्हा लढू शकतात. शिंदे लढले तरच सोलापूरची जागा कायम राखणे शक्य होईल, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे.
शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी मात्र लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत. लोकसभा नसेल तर राज्यसभा द्या, पण काही तरी द्या, अशी त्यांची भूमिका आहे. दक्षिण मध्य-मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही हे लक्षात येताच मनोहरपंतांचे लक्ष ठाणे वा कल्याण या दोन मतदारसंघांकडे गेले. पण ठाण्याचे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी जोशी नको हा सूर आळवला. शेवटी राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी मतांचे गणित जुळते का याची सध्या चाचपणी जोशीसरांकडून सुरू असल्याचे कळते.
‘आदर्श’ घोटाळ्यात अडकल्याने मुख्य राजकीय प्रवाहापासून दूर गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण परत सक्रिय होण्यासाठी धडपडत आहेत. सीबीआयने सुशीलकुमार शिंदे यांना क्लिनचिट दिल्याने अशोकरावांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
राज्याच्या राजकारणात लगेचच संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याने दिल्लीत जावे, मग कधी पुढे संधी मिळाल्यास मुंबईत परतावे, हे त्यांचे गणित दिसते. यातूनच नांदेडमध्ये पक्षाने उमेदवारी दिल्यास लढण्याची त्यांची तयारी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 1:07 am

Web Title: four cms four sort
Next Stories
1 अंधेरीतील फिल्मालय स्टुडिओमध्ये तोडफोड
2 पवारांचे राहुल गांधींबाबतचे मत निवडणुकीनंतर बदलेल
3 जियाचा खून तिच्या ‘खूप जवळच्या’ व्यक्तीकडूनच!
Just Now!
X