राज्यातील अन्य भागांप्रमाणे मुंबईतही करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. करोनाचा हा फैलाव रोखण्यासाठी ठाकरे सरकारकडून नागरिकांवर मास्क लावण्याची सक्ती केली जात आहे. बाहेर फिरताना नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क लावावेत, यासाठी दंडाची आकारण केली जातेय. महापालिका या दंड आकाराणीतून लाखो रुपयांची कमाई करत आहे. गर्दी असलेल्या सार्वजनिक ठिकाणी मार्शल्सची संख्या देखील वाढवण्यात आली आहे.

आठवडा अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. नागरिकांनी करोना रोखण्यासाठी आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे, अन्यथा लॉकडाउनचा कटू निर्णय घ्यावा लागेल, असा त्यांनी इशारा दिला. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री वारंवार लॉकडाउनचे इशारे देत आहेत.

अस्लम शेख यांच्या लॉकडाउन इशाऱ्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक टि्वट केले आहे. “मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी, मास्क लावला नाही तर लॉक डाउन करावा लागेल, असे सांगितले. हाच सल्ला त्यांनी जरा भेंडी बाजार आणि बेहराम पाड्यात पण द्यावा किमान स्वतःच्या मतदार संघात एक चक्कर तरी मारावी” असे संदीप देशपांडे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

काय म्हणाले अस्लम शेख

“रुग्णसंख्या वाढत आहेत, हे मान्य करावं लागेल. आवाहन करूनही लोक ऐकत नाहीयेत. आता आम्ही कारवाईही सुरू केली आहे. लग्नासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी घेतली जाते. पण, प्रत्यक्षात ३०० ते ४०० लोकांना बोलवतात. अशा लोकांवर कारवाई सुरू केली आहे. नाईट क्लबवरही कारवाई सुरू केली आहे. सरकारनं नियमावली ठरवून दिली आहे, तरीही ज्या रेस्टॉरंटमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश दिला जातो, त्यांच्यावरही कारवाई सुरू केली आहे. त्यांचे परवाने रद्द केले जातील. सरकार म्हणून जे करणं शक्य आहे, ते आम्ही करतोय. पण, मुंबईकरांना परत लॉकडाउन बघायचा नसेल, तर त्यांनी स्वतःची आणि कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे” असं सांगत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी परिस्थिती बिघडल्यास लॉकडाउन लागू करण्याचे संकेत दिले आहेत.