ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट’; खाद्यपदार्थ मागवण्यासाठी अ‍ॅप

सुहास जोशी

विक्रेता आणि ग्राहक यांचा कमीत कमी संपर्क यावा यासाठी मॉलमध्ये डिजिटल माध्यमांचा वापर वाढत असून ग्राहकांना मॉलमधील दुकानांतून ऑनलाइन खरेदी करण्यास आकर्षित करण्यासाठी काही मॉलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट माध्यमाच्या वापरास सुरुवात झाली आहे, तर अनेक ठिकाणी फूड कोर्टसाठी क्यू.आर. कोड, अ‍ॅपचा वापर करण्यास प्राधान्य दिले जात आहे.

लोअर परळ येथील फिनिक्स मिल्स मॉलमधील दुकानांसाठी ग्राहकांना घरच्या घरी बसून व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटच्या माध्यमातून खरेदीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर सी वूड्स येथील ग्रॅण्ड सेंट्रल मॉल, ठाणे येथील कोरम मॉल व्यवस्थापनाकडून यासाठी सध्या तयारी सुरू आहे. ऑगस्टमध्ये मॉल सुरू झाल्यानंतर पहिल्या महिन्यात ग्राहकांचा साधारण ५० टक्के  प्रतिसाद मिळाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही ठिकाणी सप्टेंबरमध्ये ग्राहकांचे प्रमाण थोडे कमी झाले होते. अद्यापही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्याबाबत ग्राहकांच्या मनात संदेह असेल तर त्यावर मात करण्यासाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर वाढवला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टाळेबंदीत चार महिन्यांनंतर ऑगस्टमध्ये मॉल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. बहुतांश मॉलमध्ये अ‍ॅपद्वारा पूर्वनोंदणी करूनच प्रवेश देण्याची पद्धत स्वीकारली गेली. अनेक मॉलमध्ये डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहाराचा पर्याय स्वीकारला. आता दोन महिन्यांनंतर याचा वापर आणखी वाढत असून व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट, फूड कोर्टसाठी क्यू.आर. कोड आणि अ‍ॅपचा वापर केला जात आहे.

आभासी डिजिटल मदतकक्ष

व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटच्या माध्यमातून ग्राहकांना आभासी डिजिटल मदतकक्ष उपलब्ध करून दिला जात असल्याचे फिनिक्स मिल मॉलच्या प्रवक्त्यांनी सांगितले. या माध्यमातून कोणत्याही दुकानातून खरेदी करून आर्थिक व्यवहार डिजिटल माध्यमातून पूर्ण केल्यानंतर मॉलमध्ये किंवा तेथे प्रवेश न करताही एका ठरावीक ठिकाणाहून या वस्तू मिळवता येतील, अशी सुविधा दिली जात आहे. तर काही दुकानांनी घरपोच वस्तू पाठविण्याची सुविधादेखील देण्यात येत आहे.

अ‍ॅपद्वारे खाद्यपदार्थाची मागणी

राज्यात ५ ऑक्टोबरपासून उपाहारगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर मॉलमधील फूड कोर्टही कार्यरत होणार आहेत. ऑर्डर देण्यासाठी ग्राहकाने टेबलावरील क्यू.आर. कोड स्कॅन केल्यावर संपूर्ण फूड कोर्टचा मेन्यू मोबाइलवर मिळणार असून, अ‍ॅपद्वारे हवे ते खाद्यपदार्थ मागविता येतील. अशा प्रकारची सुविधा फिनिक्स, कोरम, विवियाना अशा मॉलमध्ये कार्यरत होणार असल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले.