राज्यात करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ६० हजारांच्या आसपास असली तरी रुग्णवाढ हळूहळू स्थिरावणार असल्याचे संकेत आहेत. गेले काही दिवस मुंबईतील रुग्णसंख्या स्थिरावली असून, शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातही तुलनेने कमी रुग्णनोंद झाली. सध्या लागू असलेल्या निर्बंधांचे कठोरपणे पालन के ल्यास आठ ते दहा दिवसांमध्ये सकारात्मक चित्र दिसू शके ल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

राज्यात १ एप्रिलपासून गेल्या १६ दिवसांमध्ये साडेआठ लाख रुग्णांची भर पडली. प्रतिदिन ५० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात कठोर निर्बंध लागू करावे लागले. रुग्णसंख्या वाढत असली तरी ती स्थिरावत असल्याचे राज्य करोना कृती दलातील तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. राज्यातील दुसरी लाट ही अत्युच्च पातळीवर (पिक) गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हळूहळू रुग्णसंख्या कमी होत जाईल. विदर्भात अकोला, अमरावतीमधील रुग्णसंख्या मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. कठोर निर्बंधांनंतर तेथील रुग्णसंख्या कमी झाली. मुंबईतही गेल्या तीन-चार दिवसांत रुग्णसंख्या कमी होत आहे. हा कल कायम राहील, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राज्यात करोनाचे ६३,७२९ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ६३,७२९ नवे रुग्ण आढळले. दैनंदिन रुग्णसंख्येचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. याच काळात ३९८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या

६ लाख ३८ हजार उपचाराधीन रुग्ण आहेत. सर्वाधिक १ लाख १६ हजार रुग्ण हे पुणे जिल्ह््यातील आहेत.

राज्यातील रुग्णसंख्या काही प्रमाणात स्थिर होताना दिसत आहे. पुढील आठ ते दहा दिवस हा बदल कायम राहिला तर आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असे म्हणता येईल. सध्या लागू असलेले निर्बंध कटाक्षाने पाळत राहिल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल.

– डॉ. शशांक जोशी, कृती दलाचे सदस्य

मुंबई, पुण्यातील रुग्णसंख्या स्थिरावताना दिसत आहे. नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होऊन घरी जाणारे रुग्णही वाढले आहेत. पुढील आठ ते दहा दिवस हे चित्र कायम राहिले तर महाराष्ट्रासाठी ते दिलासादायक ठरेल.

– डॉ. अविनाश सुपे, कृती दलाचे सदस्य