राज्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशी १६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले असून, २९६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. नाशिक शहरात रुग्ण वाढले आहेत.

दिवसभरात करोनाचे १६,४०८ नवे रुग्ण आढळले. राज्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ७ लाख ८० हजार झाली असून, सध्या १ लाख ९३ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात आतापर्यंत २४,३९९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

गेल्या २४ तासांत नाशिक शहर १०४९, जळगाव जिल्हा ७५५, पुणे शहर १६६३, पिंपरी-चिंचवड १०७२, सातारा ६१६, कोल्हापूर जिल्हा ९७४, नागपूर शहर ८३६ नवे रुग्ण आढळले.

मुंबईत १,२३७ नवे बाधित

* चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे मुंबईत बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाणही वाढले आहे. रविवारी १,२३७ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढली असून २०,३२५ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

* रविवारी १,२३७ नव्या रुग्णांची भर पडल्याने एकूण बाधितांचा आकडा १ लाख ४४ हजार ६२६ इतका झाला आहे. दिवसभरात ८५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ८१ टक्के, म्हणजेच १ लाख १६ हजार ३५१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

* मुंबईत रविवारी ३० जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा ७,६२३ इतका झाला आहे.

* मुंबईत आतापर्यंत ७ लाख ६२ हजारांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. दरदिवशीच्या चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले असून सरासरी नऊ हजार चाचण्या सध्या होत आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात दिवसभरात ३० रुग्णांचा मृत्यू

* जिल्ह्य़ात रविवारी १ हजार ४२७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्य़ात करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख २२ हजार ९६५ इतकी झाली आहे. दिवसभरात ३० जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ३ हजार ५१९ इतकी झाली आहे.

* रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये नवी मुंबईतील ४७६, कल्याण-डोंबिवली शहरातील ३६३, ठाणे शहरातील २०८, ठाणे ग्रामीणमधील १३७, मीरा-भाईंदरमधील १२५, अंबरनाथ शहरातील ४०, उल्हासनगर शहरातील ३४, बदलापूर शहरातील ३२ आणि भिवंडी शहरातील १२ रुग्णांचा समावेश आहे.

* जिल्ह्य़ात रविवारी ३० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीतील ११, ठाणे शहरातील ८, नवी मुंबईतील ५, अंबरनाथमधील ३ तर उल्हासनगर, मीरा-भाईंदर आणि ठाणे ग्रामीणमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.