नवउद्यमी उद्योजकांना अर्थसाहाय्य पुरवून प्रोत्साहित करणारे महेश मूर्ती यांच्याकडे शुक्रवारी खार पोलिसांनी चौकशी केली. गेल्या महिन्यात खार पोलिसांनी मूर्ती यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला होता.

चौकशी व तपासासाठी मूर्ती यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केल्याचे आदेश मूर्ती यांनी सादर केले. त्यानंतर चौकशी करून त्यांना सोडण्यात आले, अशी माहिती ‘परिमंडळ -९’चे पोलीस उपायुक्त परमजितसिंग दहिया यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी मुंबई पोलिसांनी मूर्ती यांना अटक केल्याची माहिती दिली होती. त्यावर मूर्ती यांनी ट्वीटद्वारे अटकेचे वृत्त फेटाळून अटकपूर्व जामिनावर असल्याचे स्पष्ट केले. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तक्रारदार महिलेविरोधात उच्च न्यायालयात याचिका केली असून निकाल आपल्या बाजूने लागल्याचा दावाही त्यांनी केला.

काही महिन्यांपूर्वी मूर्तीकडून आक्षेपार्ह, अश्लील लघुसंदेश, प्रत्यक्ष संवादातील द्वैअर्थी शब्दप्रयोग, स्पर्श या अनुभवाबाबत अनेक महिलांनी समाजमाध्यमांवर आपापले अनुभव जाहीर केले होते. यापैकी दिल्लीतील एका महिलेने राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. महिलेने सादर केलेल्या पुराव्यांवरून आयोगाने मूर्तीवर कठोर कारवाई करावी, अशी शिफारस करणारे पत्र राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाला लिहिले. त्यानंतर हे प्रकरण चौकशी व तपासासाठी खार पोलिसांकडे आले. खार पोलिसांनी आयोगाकडे तक्रार करणाऱ्या महिलेला मुंबईत बोलावून घेतले. तिचा तपशीलवार जबाब नोंदवण्यात आला. पुराव्यांदाखल मूर्तीनी धाडलेले आक्षेपार्ह संदेश या महिलेने खार पोलिसांसमोर सादर केले. त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधानातील ३५४ आणि ५०९ या कलमान्वये गुन्हा नोंदवला होता.